Skip to main content
x

कानिटकर, काशीबाई गोविंदराव

कृष्णराव बापट या वकिलाच्या घरात काशीबाईंचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न गोविंदराव कानिटकरांशी झाले. गोविंदरावांचे चुलते नारायण बापुजी कानिटकर हे कट्टर टिळकपंथीय होते. सनातन्यांच्या बाजूने सुधारकांवर टीका करण्याची संधी ते सोडत नसत. मात्र गोविंदरावांचा कल सुधारकांकडे राहिला. ‘आपल्या पत्नीने शिकायला हवे’ हा विचार ते तेव्हा बोलून दाखवत असत आणि प्रत्यक्ष लग्न झाल्यावर त्यांनी काशीबाईंना शिकवलेही. त्या काळात पति-पत्नी घरच्या वडीलधार्‍या मंडळींना न सांगता ‘प्रार्थना समाजा’च्या वा ‘मराठी ज्ञानप्रसारक सभे’च्या व्याख्यानांना जात असत. गोविंदराव कानिटकर मुन्सफ होते, त्यामुळे त्यांच्याबरोबर काशीबाईंना सभासंमेलनांना जावे लागे. रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई यांच्याशी काशीबाईंचा स्नेह राहिला. रमाबाई रानडे यांनी त्यांना शिक्षण घेण्यासाठी आणि पुढे सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यासाठी उत्तेजन दिले. गोविंदरावांना इंग्रजी व मराठी साहित्यात रस होता.

समानधर्मीयांची भेट-

तरुण हरि नारायण आपटेंशी ओळख झाल्यावर गोविंदरावांना समानधर्मी भेटल्याचा आनंद झाला. त्यांच्या वाङ्मयीन गप्पांमध्ये काशीबाईंना स्थान मिळू लागले. त्यांनी तिघांनी मिळून ‘मनोरंजन आणि निबंधचंद्रिका’ नावाचे नियतकालिक सुरू केले. काशीबाईंचे लेखन तिथे सुरू झाले. काशीबाई-गोविंदराव-हरिभाऊ हे परस्परांचे जवळचे स्नेही झाले. हरिभाऊंच्या ‘स्फुट गोष्टी’ आणि कादंबर्‍या ‘करमणूक’मधून प्रसिद्ध होत होत्या. गोविंदरावांबरोबर हरिभाऊही काशीबाईंना लेखनाला उत्तेजन देत होते. ‘शेवट तर गोड झाला’ (१८८९) हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. त्यानंतर ‘चांदण्यातील गप्पा’ (१९२१) हा कथासंग्रह लक्ष्मणशास्त्री लेले यांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. ‘शिळोप्याच्या गोष्टी’ हा तिसरा कथासंग्रह १९२८ साली प्रकाशित झाला. ‘रंगराव’ (१९०३), ‘पालखीचा गोंडा’ (१९२८) या कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. भारतातून अमेरिकेस जाऊन एम.डी.होऊन परत आलेल्या पहिल्या स्त्री-डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे १८८८ साली पुण्यात दुर्दैवाने निधन झाले. आनंदीबाईंची अमेरिकेतील मैत्रीण ‘कॅरोलिन डाल’ हिने ‘द लाइफ ऑफ डॉ.आनंदीबाई जोशी’ या नावाचे चरित्र इंग्रजीत लिहिले, ते लगेच १८८९ साली प्रसिद्ध झाले. चरित्रलेखनाची कोणतीही माहिती काशीबाईंना नसताना गोविंदरावांच्या आग्रहापुढे व मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘डॉ.आनंदीबाई जोशी: चरित्र व पत्रे’ हे चरित्र १८९१ साली लिहिले, तेव्हा त्या नेवाशाला राहत होत्या. त्यांना माहिती पुरवण्याकरिता स्वत: गोपाळराव जोशी त्यांच्याकडे येऊन राहिले होते.

काशीबाईंनी त्या काळातील मुंबईतील एक मातब्बर मासिक ‘मनोरंजन’मध्येही लेखन केले. १९१८ साली गोविंदरावांचे तर १९१९ साली हरिभाऊंचे निधन झाले. पण त्याआधी काही वर्षे कानिटकर दांपत्य आणि हरिभाऊ यांचे संबंध दुरावले होते. तत्कालीन सुशिक्षित नवतरुणी म्हणून हरिभाऊ काशीबाईंकडे पाहत. त्यांच्यात स्नेहभाव होता. हरिभाऊंच्या लिहिण्याच्या टेबलावर काशीबाईंचा फोटो होता व ‘आपल्या पत्नीने शिकावे म्हणून तिला चार शब्द सांगावेत’, असे हरिभाऊ काशीबाईंना नेहमी सांगत असत. त्या दोघांत पत्रव्यवहारही होता. काशीबाईंनी ‘हरिभाऊंची पत्रे’ (१९२९) या शीर्षकाने ती पत्रे संपादितही केली होती. हरिभाऊ आणि काशीबाई यांनी एकमेकांत करार केला होता. त्यांच्यापैकी जो कोणी आधी जाईल त्याच्यावर दुसर्‍याने मृत्युलेख लिहायचा. १९१९ साली हरिभाऊ गेले. त्याआधी ते आजारी असल्याचे काशीबाईंना कळलेही नाही. परंतु हरिभाऊंच्या मृत्यूनंतर काशीबाईंनी आपला शब्द पाळला. त्यांनी हरिभाऊंवर अप्रतिम मृत्युलेख लिहिला. काशीबाईंच्या कौटुंबिक जीवनात मात्र परिस्थितीचे घाले पडले. त्यांची लाडकी मुलगी ऐन तारुण्यात मृत्युमुखी पडली. गोविंदरावांशीही त्यांचे तितके पटेनासे झाले. त्यातच त्यांच्यावर जे.कृष्णमूर्तींच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी त्यांच्या ‘अ‍ॅट द फीट ऑफ द मास्टर’ या पुस्तकाचा ‘गुरुपदेश’(साधनचतुष्टय) या शीर्षकाने अनुवादही केला होता.

पुढे काशीबाईंचा मुलगा वाराणशीला गेला. स्वाभाविकच काशीबाईंना त्याच्याबरोबर महाराष्ट्रापासून दूर वाराणशीला जावे लागले. तिथे राहूनही त्यांनी वेळोवेळी लेखन केले. इकडील नियतकालिकांमध्ये ते प्रकाशितही होत  राहिले. ते प्राय: आजही असंग्रहित स्वरूपात नियतकालिकांच्या फायलींमध्ये पडून राहिले आहे. वाराणशीला त्यांनी विद्यापीठामध्ये अध्यापनाचे कामही केले. आपल्या उतारवयात त्यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले होते. १९०९पर्यंतच्या घटनांची नोंद दिसते. ते अपुर्‍या अवस्थेत राहिले होते. डॉ.सरोजिनी वैद्य यांच्याकडे त्यांच्या आप्तांनी ते सुपूर्त केल्यावर १९८० साली सरोजिनी बाईंनी १९०९ नंतरचे १९४८ पर्यंतचे म्हणजे काशीबाईंच्या मृत्यूपर्यंतचे चरित्र लिहून ते ‘कै. काशीबाई कानिटकर: आत्मचरित्र व चरित्र (१८६१ ते १९४८)’ या शीर्षकाने प्रकाशित केले.

अव्वल इंग्रजीच्या काळात स्त्री-शिक्षणाची सुविधा प्राप्त झाली असली, तरी स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात शिकत होत्या असा भाग नव्हता. काशीबाईंना गोविंदरावांनी शिकवले आणि त्या काळातील एक सुशिक्षित, बुद्धिमान स्त्री आणि लेखिका म्हणून त्यांच्याकडे समाज तेव्हा व नंतरही आदराने पाहत आला आहे. १९०४ साली पुणे येथे झालेल्या साहित्य संमेलनात उपस्थित असलेल्या त्या एकमेव स्त्री  होत्या.

- सुखदा कोरडे

 

कानिटकर, काशीबाई गोविंदराव