कांबळे, गोविंद भागा
गोविंग भागा कांबळे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चाफोळी यागावी झाला. पुढे त्यांचे कुटुंब ठाण्याला येऊन स्थायिक झाले. गोविंद कांबळे यांनी दि. ५ डिसेंबर १९४६ रोजी भारतीय भूसेनेच्या सातव्या, महार रेजिमेंटमध्ये सेवा करण्यास सुरुवात केली. १९६२ च्या चीन युद्धादरम्यान शीख लाइट इन्फन्ट्रीची एक कंपनी नेफा भागातल्या सेला येथे, आघाडीवर तैनात करण्यात आली होती. मागे परतणाऱ्या गढवाल रायफल्सच्या फलटणीस संरक्षण देण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. हवालदार गोविंद कांबळे याच शीख लाइट इन्फन्ट्रीच्या नेतृत्वाखाली, मध्यम पल्ल्याच्या मशिनगन तुकडीचे नेतृत्व करत होते.
दि. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी चिनी सैन्याने त्यांच्या कंपनीवर हल्ला चढवला. त्यांच्या दक्षिणेकडील फळी शत्रूच्या हल्ल्याने खचत चालली होती. अशा परिस्थितीत हवालदार कांबळे शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता या खंदकातून त्या खंदकात, असे फिरत मारा करत होते. हे करत असताना शत्रूच्या तोफगोळ्याचे स्फोट त्यांच्याजवळ झाला व त्यांच्या दोन्ही पायांत तोफगोळ्याचे तुकडे घुसून ते जवळपास निकामी झाले. अशा परिस्थितीही त्यांनी सरपटत एका खंदकाचा आसरा घेतला.
याच सुमारास त्यांच्या कंपनीस माघारी फिरण्याचा हुकूम मिळाला. हवालदार कांबळे यांनी त्यांच्या साथीदारांना माघारी पाठवले. व स्वतः मात्र त्यांच्या संरक्षणासाठी शत्रूवर मारा करीत राहिले. या चकमकीत त्यांना वीरमरण प्राप्त झाले; परंतु त्यांनी शत्रूला रोखून धरण्यात यश मिळविले. हवालदार कांबळे यांनी अद्वितीय शौर्य आणि निष्ठेचे प्रदर्शन करीत सर्वोच्च बलिदान दिले. या कामगिरीबद्दल त्यांना मरणोत्तर ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.