Skip to main content
x

कार्व्हालो, सिसिलिया फ्रान्सिस

राठी भाषक ख्रिस्ती समाजातील सिसिलिया कार्व्हालो यांचा जन्म वसईतील बरामपूर या गावी झाला. मेरी तिरेजा आणि फ्रान्सिस जॉन कार्व्हालो हे त्यांचे आई-वडील असून वडिलांच्या शेतकरी कुटुंबातल्या अनेक पिढ्यांनी शाळा पाहिलेली नव्हती. मात्र आई-वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे त्यांनी मुलांना शाळेत घातले. सिसिलिया मराठी व मानसशास्त्र ह्या विषयातील मुंबई विद्यापीठाची बी. ए. परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या (१९७७). त्यानंतर मराठी विषयात एम. ए. पूर्ण केले (१९७९). १९८०मध्ये त्यांनी  अप्पासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाला सुरुवात केली.

१९९२पासून आजपर्यंत वसईतील संत गोन्सालीस गार्सिया महाविद्यालयात अध्यापनाची नोकरी चालू आहे. दरम्यान १९८९ साली ‘पंडिता रमाबाईंचे साहित्य’ या विषयावर डॉ. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली एम. फिल. पूर्ण केले आणि १९९८ साली डॉ. उषा देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्ञानोदयमधील निबंध: निबंध वाङ्मयाचा पूर्वरंग (१८४२-१८७४)’ हा प्रबंध पूर्ण करून पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. मराठीचे अध्यापन केल्यामुळे आणि मराठी व अन्य भाषांतील साहित्य अभ्यासल्यामुळे त्यांच्या जाणिवा समृद्ध होत गेल्या. यातून विविध वाङ्मय प्रकारांतील उदंड लेखन त्यांच्या हातून घडले. पहिले पुस्तक, ‘अंतर्यामी’ हा कवितासंग्रह १९८५ साली प्रसिद्ध झाला. आज पावेतो ५ कवितासंग्रह, ३ ललित लेखसंग्रह, २ कथासंग्रह, २ संशोधनात्मक, ३ समीक्षासंग्रह, १ बालवाङ्मय, १ चरित्र, १ अनुवाद आणि २ संपादने अशी २० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले, ती अशी: ‘मोगर्‍याचा मांडव’ (ललित गद्य २०००), ‘मुठीतले आकाश’ (ललित गद्य २००५)  आणि ‘चांदणे निर्मळ शुभ्र’ (आस्वादनपर ग्रंथ २००८) याशिवाय १८ साहित्य पुरस्कार विविध संस्थांकडून मिळाले आहेत.२०१० साली सुशील सोशल फोरम तर्फेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या कविता स्त्री-जीवनाचा वेध घेणार्‍या असल्याने त्या थेट काळजाला भिडतात. त्यांच्या कथांमध्ये काव्यात्मकता डोकावते. कथांमध्ये येणारा निसर्ग कथावस्तू जिवंत करतो, तसेच कथांमधील पात्रांच्या तोंडी लोकभाषा येत असल्याने त्या वास्तवाचा प्रत्यय देतात. लेखनाशिवाय चित्रकला व संगीत यांची ही त्यांना आवड आहे. स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी कळकळ असल्यामुळे त्या  महिला विकास समुपदेशन केंद्र चालवतात आणि स्त्रियांसंबंधीच्या विषयांवर त्यांनी हजारांवर व्याख्याने महाराष्ट्रभर दिली आहेत. यातून संवेदनशील लेखिका म्हणून त्यांचे वेगळेपण लक्षात येते.

- अशोक बेंडखळे

कार्व्हालो, सिसिलिया फ्रान्सिस