Skip to main content
x

कात्रे, लक्ष्मण माधव

       क्ष्मण माधव कात्रे यांचा जन्म चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथे झाला. त्यांचे वडील माधव कात्रे हे तुरुंग खात्याचे महानिरीक्षक होते.लक्ष्मण कात्रे यांचे शिक्षण डेहराडून येथील डून विद्यालयात झाले. तेथील शिक्षणानंतर थेट प्रवेशप्रक्रियेतून ते ३ ऑगस्ट १९४४ रोजी वायुसेनेत दाखल झाले.

     ९ एप्रिल १९४५ रोजी त्यांना तेव्हाच्या ‘रॉयल इंडियन एअरफोर्स’मध्ये वैमानिक म्हणून नियुक्ती (कमिशन) मिळून ते वैमानिक अधिकारी झाले. २६ एप्रिल १९४७ रोजी त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती झाली. एप्रिल १९४८ ते ऑक्टोबर १९४८ या दरम्यान त्यांनी इग्लंडला जाऊन  ‘ऑल पर्पझ फ्लाइंग इन्स्ट्रक्टर्स कोर्स’ यशस्वीरीत्या पूर्ण केला. ते एक अत्यंत निष्णात व सफल उड्डाण प्रशिक्षक होतेे.

     करारी व्यक्तिमत्त्वाचे, प्रेमळ स्वभावाचे, खिलाडू वृत्तीचे, प्रसन्न चेहऱ्याचे लक्ष्मण कात्रे एक उत्तम फ्लाइट कमांडर, उत्कृष्ट कमांडींग ऑफिसर व सक्षम स्टेशन कमांडर होते. ते शिस्तप्रिय तसेच लोकप्रिय होते. कात्रे यांनी वायुसेनेच्या अनेक स्क्वॉड्रन्सचे कुशल व सफल नेतृत्व केले. १९७१मध्ये बांगलादेश युद्धात लढाऊ वैमानिक म्हणून  ते दिवसरात्र सक्रिय होते. अग्रिम मोर्च्यांवरील विमानतळांवरून उड्डाण करून, ते आपल्या वैमानिकांचे सक्षम नेतृत्व करत होते. त्यांचे धाडसी नेतृत्व व वैमानिकी कर्तृत्व वादातीत होते. हवाईयुद्ध योजना व उड्डाण रणनीती या बाबतींतील त्यांची कार्यक्षमता व दक्षता अद्वितीय होती.

     हैदराबादजवळील दिंडिगल येथील ‘एअरफोर्स अकॅडमी’चे कमांडंट म्हणून त्यांनी अद्वितीय योगदान दिले. उड्डाणासकट वायुसेनेच्या इतर शाखांच्या प्रशिक्षणार्थ सर्व आवश्यक सोयीसुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. जेट विमानांवर उच्च दर्जाचे प्रशिक्षण सुरू केले. उड्डाण सुरक्षेचे उच्चांक प्रस्थापित केले. त्यांनी १९७६मध्ये इंग्लंडला जाऊन ‘रॉरल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. तेथून परतल्यावर ते एका महत्त्वपूर्ण कमांडचे ‘सीनियर एअर स्टाफ ऑफिसर’ व नंतर लगेच वेस्टर्न एअर कमांडचे ‘एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ झाले.  त्यांच्या नेतृत्वाखाली वैमानिकांनी आकाशयुद्धाचे नवनवीन आयाम पडताळून पाहणारी प्रात्यक्षिके केली. अत्युच्च कोटीच्या अत्युत्तम वैमानिकी, वायुसैनिकी सेवेबद्दल कात्रे यांना ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ व ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्राप्त झालेे.

     बंगळरू येथील हिंदुस्थान एअरोनाटिक्स लिमिटेडचे  ते अध्यक्षही होते. त्यानंतर ४ सप्टेंबर १९८४ रोजी वायुसेनाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदावर कार्यरत असतानाच पेरिकार्डियाटिस या हृदयरोगामुळे त्यांचे निधन झाले.

     - विंग कमांडर (निवृत्त) अशोक मोटे

कात्रे, लक्ष्मण माधव