Skip to main content
x

कडेपूरकर, रामचंद्र पंढरीनाथ

    रामचंद्र पंढरीनाथ कडेपूरकर ह्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील पैठण ह्या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पैठणमध्ये झाले व माध्यमिक शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या विद्यालयामध्ये घेतले. वयाच्या अठराव्या वर्षी पैठण येथे त्यांनी राष्ट्रीय पाठशाळेची स्थापना केली होती. निजामी दडपशाहीला न जुमानता विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून गणेशोत्सव साजरा केला होता. त्याचा त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. पण तरीही राष्ट्रीय वृत्तीच्या जोपासनेसाठी त्यांनी ‘विचार विकास मंडळा’चीही स्थापना केली होती.

     काही काळानंतर ते औरंगाबादला आले. तेथील समविचारी मित्रांबरोबर ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. १९३० मध्ये महात्मा गांधींच्या दांडी यात्रेसाठी मित्रांबरोबर पायी मुंबईला गेले. १९३२ मध्ये त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्या वेळी त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला. हैद्राबादच्या मुक्तिसंग्रामात त्यांचा मोठा सहभाग होता. कलकत्त्यातील काँग्रेस अधिवेशनात त्यांना लाठीमारही सहन करावा लागला होता.

     स्वातंत्र्य चळवळीतील कार्य चालू असताना कडेपूरकर १९३९ मध्ये नाशिकला आले. १९३५ मध्येच नाशिकला हिंदी राष्ट्रभाषा सभेची स्थापना झाली होती. प्रा. भा. ल. पाटणकर व महाबळ गुरुजी हिंदी परीक्षांचे वर्ग घेत असत. ‘दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा’, मद्रासच्या वतीने ह्या परीक्षा घेतल्या जात. नाशिकला आल्याबरोबर कडेपूरकरांनी या वर्गाची जबाबदारी स्वीकारली. महात्मा गांधींनी सुरू केलेले राष्ट्रीय रचनात्मक कार्य करावयाचे ह्या विचाराने मोठ्या प्रमाणावर संघटना बांधली. त्यांचे राष्ट्रभाषा प्रचाराचे कार्य सुरू झाले. ह्याच काळात त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची साहित्यरत्न पदवी प्राप्त केली. पुढे नाशिकच्या भोसला सैनिकी शाळा, शासकीय कन्याशाळा, न्यू हायस्कूल ह्या शाळांमध्ये अनेक वर्षे त्यांनी हिंदीचे अध्यापन केले.

     त्यांचे अध्यापन कधी रूक्ष झाले नाही. रंजन आणि बोध ह्या दोन्हींचा उत्कृष्ट मिलाफ त्यांच्या अध्यापनात असायचा. शाळेतील मुलांप्रमाणेच उच्च शिक्षण घेणार्‍या, विद्यापीठात पीएच. डी. करणार्‍या विद्यार्थ्यांनाही ते मार्गदर्शन करीत असत. १९४५ मध्ये पुण्यात महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेची स्थापना झाली. ते ह्या संस्थेचे संस्थापक सदस्य व मोठे आधारस्तंभ होते. त्यांनी अनेक प्रचारक व कार्यकर्ते घडविले. त्या काळात हे काम मोठ्या जिकिरीचे होते, कोणतेही तत्कालीन फळ देणारे नव्हते.  बाळ गंगाधर खेरांच्या काळात राष्ट्रभाषा सभेच्या परीक्षांना मान्यता मिळाली. शालेय अभ्यासक्रमात हिंदीचा समावेश झाला. प्रशिक्षित शिक्षक तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्या प्रयत्नांनी व प्रेरणेने घडले. शिक्षक तयार होत गेले.

     नाशिक व पुणे येथे हिंदी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात अशी त्यांची योजना होती. १९५६ मध्ये नाशिकला गांधीनगर येथे ‘हिदी माध्यमिक विद्यालया’ची व पुण्यात कॅम्प परिसरात ‘हिंदी विद्यालया’ची स्थापना करण्यात कडेपूरकरांचाच  पुढाकार होता. मराठवाड्यात राष्ट्रभाषेचा प्रसार व्हावा म्हणून सेलू व औरंगाबाद येथेही राष्ट्रभाषा सभेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नातून झाली. औरंगाबाद येथील सरस्वतीभुवन शिक्षण संस्था, महात्मा गांधी भवन व तेथील समृद्ध ग्रंथालय यांच्या उभारणीत त्यांचा सहभाग मोठा होता.

     कडेपूरकरांच्या हिंदी साहित्याच्या व्यासंगाचा प्रत्यय हिंदी साहित्यधारा ह्या पाठ्यपुस्तकांत व ‘लोकवाणी’ ह्या पाठ्यपुस्तकमालेच्या निर्मितीत येतो. त्यांनी हिंदी-मराठी शब्दकोशाच्या संकलनाचे कामही केले होते.

- प्रा. सुहासिनी पटेल

कडेपूरकर, रामचंद्र पंढरीनाथ