केळकर, दिनकर गंगाधर
कवी अज्ञातवासी यांचा जन्म कामशेतजवळच्या करंजगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. ‘अज्ञातवासी’ या नावाने त्यांनी कवितालेखन केले. ‘अज्ञातनाद’ (१९२४) आणि ‘अज्ञातवासींची कविता’ हे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘अज्ञातवासींची कविता’ दोन भागांत प्रकाशित झाली असून त्यांचे संपादन गोपीनाथ तळवलकर यांनी केले आहे. या कवितांमधून वात्सल्यरस आणि बालकांविषयीचे प्रेम दिसत असले, तरी बहुतांश कविता ही राष्ट्रीय विचारांनी ओतप्रोत भरलेली आहे. इतिहास, ऐतिहासिक वास्तू, पूर्वजांचे पराक्रम, गतवैभव यांचा त्यांना विलक्षण अभिमान वाटे. या विषयांवर त्यांनी विपुल काव्यलेखन केले.
याव्यतिरिक्त त्यांनी १९२३मध्ये ‘महाराष्ट्र शारदा’ भाग १चे संपादन केले. भा.रा.तांबे व अत्र्यांचे ‘झेंडूची फुले’ ह्या भागांचे संपादन त्यांनी केले होते. अज्ञातवासींच्या जीवनातील फार मोठा भाग त्यांनी उभ्या केलेल्या ‘राजा दिनकर केळकर’ या संग्रहालयाने व्यापलेला आहे. ‘राजा’ या आपल्या अकाली मरण पावलेल्या मुलाच्या स्मृती जपण्यासाठी त्यांनी आयुष्यभर खपून विविध प्रकारच्या वस्तू जमविल्या. सुरुवातीला स्वतःच्या घरात सुरू केलेल्या या संग्रहालयाने पुढे भव्य रूप धारण केले. अलीकडे या संग्रहालयाला शासनाचे भरघोस अनुदान व सहकार्य लाभले असून सध्या ते भव्य वास्तूत आहे. देशी, परदेशी पर्यटकांचे ते आकर्षण ठरले आहे. वयाच्या ९० वर्षांपर्यंत ते स्वतः तरुणाच्या उत्साहाने विविध वस्तू जमविण्यासाठी देशभर फिरत असत. कमलाबाईंनी त्यांच्या या कार्यात अगदी सुरुवातीपासून सहकार्य करून हे संग्रहालय उभे केले. शासनानेही त्यांच्या या कार्याचे मोल जाणून त्यांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या होत्या.
दि.ग. तथा काका केळकरांच्या कार्याची दखल घेऊन पुणे विद्यापीठाने त्यांना सन्मानाची डि.लिट. ही पदवी दिली तर १९८० मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांच्या कार्याचा योग्य गौरव केला. काकांच्या निधनानंतर त्यांचे तीन नातू (प्रभा या त्यांच्या कन्येचे पुत्र) सुरेंद्र, सुधन्वा आणि सुदर्शन रानडे हे ‘राजा दिनकर केळकर’ या संग्रहालयाचे व्यवस्थापन उत्तम रितीने सांभाळत आहेत.