Skip to main content
x

केळकर, नरसिंह चिंतामण

     ‘साहित्यसम्राट’ या विशेषणाने निरपवादपणे गौरविले गेलेले मराठीतील एकमेव साहित्यिक नरसिंह केळकर यांचा जन्म पंढरपूरजवळ मोडलिंब येथे झाला. केळकरांचे शालेय शिक्षण मिरज येथे झाले. १८८८मध्ये ते मॅट्रिक झाले. कोल्हापूर व पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन १८९१मध्ये ते बी.ए. झाले व १८९५ साली एल्एल.बी होऊन त्यांनी सातारा जिल्ह्यात वकिलीची सनद घेतली. १८९६ च्या मार्चमध्ये लोकमान्य टिळकांच्या बोलावण्यावरून केळकर त्यांच्या कार्यात त्यांना साहाय्य करू लागले.

     ‘साहित्यसम्राट’ या बिरुदास शोभेल असाच केळकरांचा साहित्यक्षेत्रातील संचार होता. त्यांच्या लेखणीला कुठलाच अविषय नव्हता. वृत्तपत्रीय लेखन, नाट्यलेखन, कादंबरी-लेखन, कविता-लेखन, इतकेच नव्हे तर चित्रपट कथालेखनापर्यंत अनेक प्रकारची लेखनक्रीडा त्यांनी उत्साहाने केली. त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य व सौंदर्य व्यक्त करणारा साहित्य प्रकार म्हणजे निबंध होय. हा निबंध तर्क-अनुमान-प्रमाणादिंनी निबद्ध आहे. ज्ञानलालसा, बहुश्रुतता, युक्तिवादकौशल्य, विनोदबुद्धी, भाषाप्रभुत्व आणि समाजशिक्षणाची ओढ या गुणांमुळे निबंधकार म्हणताच केळकर डोळ्यांपुढे येतात. राजकारण, सामाजिक सुधारणा, आर्थिक प्रश्न, नवनवीन कायदे, प्रासंगिक घडामोडी इत्यादींसंबंधी केळकरांनी जे-जे लिहिले, ते-ते वाचताना केळकर हे आदर्श लोकशिक्षक होते, हे जाणवत राहते. त्यांच्या लेखणीत निर्भयता होती परंतु बेतालपणा नव्हता. त्यांच्या वृत्तपत्रीय निबंधांतून औचित्य, सदभिरुची व प्रमाणबद्धता या गुणांचा विकास घडला. वृत्तपत्रकार म्हणून केळकरांना मिळालेल्या यशाचे रहस्य त्यांच्या सुपूर्त व समर्पक बहुश्रुतपणात आणि प्रवाही व प्रत्युत्पन्न लेखणीत सामावलेले आहे. ‘संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन’, ‘कौन्सिलातील शकुन्तलाख्यान’, ‘स्वराज्यद्रोही छत्रपती’, ‘भविष्यकथन’, ‘कलियुगातील पंधरावी कला’, ‘लोकमताने कुस्ती जिंकली’, ‘मुरलीधर की गारुडी’ यांसारखे बहुविध विषयांवरचे केळकरांचे लेखन अभिजात सौंदर्याने नटलेले आहे. त्यांची भाषा प्रासादिक व उपमा-दृष्टान्तांनी नटलेली होती.

      टागोरांच्या ‘सरोजिनी’ या नाटकाचे भाषांतर आणि शेरिडनच्या ‘टू रायव्हल्स’ या नाटकाचा अनुवाद करून केळकरांनी आपल्या नाट्यलेखनाला सुरुवात केली. ‘तोतयाचे बंड’ (१९१२), ‘कृष्णार्जुनयुद्ध’ (१९१५), ‘वीरविडम्बन’ (१९१९), ‘संत भानुदास’ (१९१९) ही त्यांची चार स्वतंत्र नाटके, याशिवाय ‘चंद्रगुप्त’ (१९१३) व ‘अमात्यमाधव’ (१९१५) अशी एकूण सहा नाटके प्रयोगरूपाने रंगभूमीवर आली. याशिवाय ‘नवरदेवाची जोडगोळी’ (१८९८) व ‘पतीची निवड’ (१९५०) ही नाटके त्यांनी लिहिली. कथानकाच्या वळणाने येणार्‍या संवादांवाचून त्यांच्या नाट्यकृतींत फारसे काही हाती लागत नाही. मराठी नाट्येतिहासात केळकरांची नाट्यनिर्मिती फारशी प्रभावी ठरली नाही. ‘तोतयाचे बंड’ एवढेच त्यांचे नाटक उल्लेखनीय म्हणता येईल. ‘नवलपूरचा संस्थानिक’ (१९३४), ‘बलिदान’ (१९३७), ‘कावळा व ढापी’ (१९४०), ‘कोकणचा पोर’ (१९४२), ‘जगाची रीत’ (१९४३) या पाच पूर्ण कादंबर्‍या आणि ‘अंधारवड’, ‘दिवाण झिप्री’ व ‘प्रमिला’ या तीन अपूर्ण कादंबर्‍या केळकरांनी लिहिल्या आहेत. ‘माझी आगगाडी कशी चुकली’, ‘कपड्यांची अदलाबदल’, ‘दुधाची धार अथवा गुप्तदान’, ‘अलिगड किल्ल्यातील एक रहस्य’ या कथा आणि तथाकथित कथात्मक लेखन त्यांनी केले आहे. परंतु कथात्म साहित्याविषयीची त्यांची समजूत प्राथमिक स्वरूपाची होती. ‘आयर्लंडचा इतिहास’ (१९१०), ‘मराठे व इंग्रज’ (१९१८), ‘फ्रेंच राज्यक्रांती’ (१९३५) हे त्यांचे इतिहासविषयक ग्रंथ विविध ऐतिहासिक साधनांचा उचित उपयोग करून सिद्ध केलेले आहेत. ‘भारतीय तत्त्वज्ञान’ (१९३४) हे त्यांचे पुस्तक तत्त्वज्ञानपर संग्रहग्रंथाच्या स्वरूपाचे आहे.

     ‘राज्यशास्त्र’ (१९३२), ‘तिरंगी नवमतवादी’ (१९३७), ‘संस्थानी राजकारण’ (१९२९), ‘हिंदी स्वराज्याची कैफियत’ (१९१९), ‘केस फॉर इंडियन होमरूल’ (१९१७) हे त्यांचे राजकारण विषयक लेखन  प्रौढ व अनुभवी पत्रकारास साजेसे आहे. ‘गॅरीबाल्डीचे चरित्र’ (१९०१), ‘त्रिखंडात्मक लोकमान्य टिळक चरित्र’ (१९२३, १९२८), ‘फ्रान्सची झाशीवाली’ (१९४०) या नावाने लिहिलेले जोन ऑफ आर्कचे चरित्र, आयर्लंडचा इतिहास या ग्रंथाच्या शेवटी लिहिलेली आठ आयरिश देशभक्तांची छोटी चरित्रे हे केळकरांचे चरित्रलेखन होय. टिळक चरित्र २००० पृष्ठांचे आहे. परंतु त्याला एकसंधपणा नाही. तसेच त्यात नियोजन व मांडणी यांचा अभावही आढळतो. ‘मी लिहिले ते मुख्यत: घडलेला इतिहास संगतवार सांगण्याच्या दृष्टीनेच लिहिले आहे’ ही या चरित्र लेखनामागची केळकरांची भूमिका होती. 

     बडोदा येथे भरलेल्या दहाव्या साहित्य संमेलनाचे केळकर अध्यक्ष होते. या प्रसंगी त्यांनी ‘खरी सविकल्प समाधी उत्पन्न करू शकते ते वाङ्मय’ अशी भूमिका मांडली. ही उपपत्ती मराठी साहित्य विचारात दीर्घकाळ चर्चेचा विषय ठरली. ‘प्रत्येक पिढीची अभिरुची व स्मरणशक्ती या दोन चाळण्याच होत. या जोडचाळणीतून प्रत्येक पिढीत काही लेख सरस्वतीच्या गंगाजळीत पडतात व हे सर्व गाळीव लेख मिळून जो संग्रह होतो त्याचेच नाव वाङ्मय,’ हा त्यांचा वाङ्मयविचार अभिजात वाङ्मयाच्या चर्चेकडे वळतो. ‘कलाविलासाच्या मागे हेतुसंशोधनाचा गुप्त पोलिस लावून दिला तर अनर्थकारक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत’ असाही नि:संदिग्ध इशारा याच भाषणात केळकरांनी दिला. तो केळकरांची कलावादी भूमिका सुचवितो. ‘सुभाषित आणि विनोद’ (१९११) व ‘हास्यविनोदमीमांसा’ (१९३७) ही हास्यकारण व विनोदस्वरूप यांची चर्चा करणारी पुस्तके केळकरांनी लिहिली आहेत.

     ‘विलायतेच्या प्रवासाचे वर्णन’ (१९१९), ‘सिमला येथील छोटी हजेरी’ (१९२४), ‘माझा सरहद्दीकडील दौरा’ (१९२९), ‘पूर्व बंगालची सफर’ (१९२९), ‘माझी म्हैसूरकडील प्रवासयात्रा’ (१९३७) ही केळकर लिखित प्रवासवर्णने व स्थलवर्णने वाचनीय आहेत. केळकरांनी अनेक ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावनांपैकी सदाशिवराव बापट यांनी संपादिलेल्या ‘लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका’ या संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना चरित्राच्या संदर्भात आठवणी आणि आख्यायिका यांना कोणते स्थान असते, याची मार्मिक चर्चा करणारी आहे. अतिशय समाधानी व प्रसन्न वृत्तीच्या या साहित्यसम्राटाचे निधन १४ ऑक्टोबर १९४७ रोजी पहाटे झाले. दि. १३ रोजी त्यांच्या टेबलावर उघडे फाउंटन पेन व चष्मा होता आणि त्याखाली ‘दिसों लागे मृत्यू परि न भिववूं तो मज शके / तयाच्या भेटीचें असत मजला ज्ञानचि निकें...’ या ओळींनी सुरू होणारी त्यांची कविता होती.

     नरहर चिंतामण केळकर यांच्या नावे  प्रतिवर्षी सर्वोत्कृष्ट ग्रंथासाठी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार दिला जातो. 

- डॉ. विलास खोले

केळकर, नरसिंह चिंतामण