Skip to main content
x

केळकर, रंजन रत्नाकर

     डॉ.रंजन रत्नाकर केळकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. मुंबईतील दादर येथील बालमोहन विद्यामंदिर आणि पुण्यातल्या सेंट जॉन्स या शाळांमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. पदार्थविज्ञान आणि त्यातही संशोधनाची विशेष आवड असल्यामुळे शालेय शिक्षणानंतर त्यांनी फर्गसन महाविद्यालय, पुणे येथून पदार्थविज्ञान या विषयात बी.एस्सी. आणि एम.एस्सी. केले. यानंतर मात्र डॉ.रंजन केळकर आपण पुढे कोणत्या क्षेत्रात काम करावे याविषयी विचार करत असताना, त्यांचे वडील रत्नाकर हरी केळकर यांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला. दैनंदिन व्यवहारात प्रतिकूल असणार्‍या एखाद्या परिस्थितीतून किती सकारात्मक विचार करता येतो, हेच या सल्ल्यातून दिसून येते. यासाठीच त्या सल्ल्याची पार्श्वभूमी जाण्ाून घेणे महत्त्वाचे आहे.

     डॉ. रंजन केळकर यांचे वडील अलिबाग येथे राहत होते. त्यांना त्यांच्या शाळेच्या दिवसांत मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागे. त्या काळी अलिबागमध्ये वीज नसण्याचे प्रमुख कारण, भारतीय हवामानशास्र विभाग म्हणजेच इंडिया मीटिओरोलॉजिकल डिपार्टमेंट आय.एम.डी. ही संस्था होती. त्या काळात हवामान वेधशाळा अलिबाग येथे होती. वेधशाळेत भूचुंबकीय मोजमापने होत असत. त्या मोजमापनांवर विद्युत तारांमधून वाहणार्‍या विद्युत ऊर्जेचा परिणाम होत असे व मोजमापनांमध्ये अडथळा निर्माण होत असे; म्हण्ाून अलिबागमध्ये विद्युत ऊर्जा वापरण्यावर बंदी होती. जेव्हा या वेधशाळेमध्ये विद्युत ऊर्जेबाबत फारशी संवेदनशील नसलेली उपकरणे दाखल झाली तेव्हाच, म्हणजे १९५० साली अलिबागमध्ये वीज अवतरली. या सर्व प्रकारामुळे रत्नाकर हरी केळकर यांच्या मनात हवामान खाते आणि त्याच्या कामाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदार्थविज्ञानात एमएस्सी झालेल्या मुलाला, रंजन यांना, हवामान खात्यात दाखल होऊन संशोधन करण्याविषयी सुचवले. त्यानुसार त्यांनी हवामान खात्यात दाखल होण्याचे ठरवले.

     १९६५ साली केळकर यांना आय.एम.डी. येथे वैज्ञानिक साहाय्यक म्हण्ाून काम करण्याची संधी, तसेच पीएच.डी.साठी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतरची ३८ वर्षे, कृषी हवामानशास्त्र, उपग्रह हवामानशास्त्र, पुर्वानुमान सेवा, हवामानविषयक उपकरणे, मान्सून मॉडेलिंग, अशा हवामान खात्याच्या विविध क्षेत्रांत त्यांनी संशोधनाचे कार्य करत, सेवाकालाची शेवटची सहा वर्षे हवामान खात्याचे महासंचालक म्हण्ाून काम पाहिले.

     १९७१ साली त्यांना पुणे विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी पीएच.डी.साठी ‘वातावरणाच्या अभिसरणाशी असलेला विकिरणांचा संबंध’ या विषयावर प्रबंध लिहिला. पृथ्वीवरील हवामानात होणार्‍या सर्व प्रकारच्या बदलांमागे सूर्याची ऊर्जा हा एक प्रमुख स्रोत आहे. परंतु तसे असले तरी पृथ्वीच्या वातावरणावर सूर्याच्या थेट उष्णतेचा परिणाम होत नाही. सूर्याकडून येणार्‍या उष्णता-ऊर्जेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या पृष्ठभागाकडून जास्त तरंगलांबीच्या उष्णतेचे तरंग उत्सर्जित केले जातात. त्यांतील काही ऊर्जा अवकाशात परत फेकली जाते, तर काही ऊर्जा हवेच्या थरांतून आरपार जाऊ शकत नाही आणि परत पृथ्वीकडे पाठवली जाते. ही उष्णता-ऊर्जा पृथ्वीच्या वातावरणात साचून राहते. त्यामुळे हवेच्या थरांची हालचाल सुरू होते व हवामानात काही बरेवाईट बदल होतात. केळकर यांनी संगणकाच्या मदतीने या सर्व लहानमोठ्या बदलांच्या नोंदी आणि संगणन केले. त्यातून काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले. हरितगृह परिणामांमुळे होणारे वातावरणीय बदल आणि वैश्विक तापमानवाढ यांविषयी सध्या बरेच संशोधन होत आहे; पण डॉ.केळकर हे काळाच्या बरेच पुढे होते, त्यांनी १९६५ सालीच या विषयावर संशोधन सुरू केले होते.

     केळकर यांनी, मान्सूनच्या काळात भारतीय भूखंडातून उत्सर्जित होणार्‍या उष्णता-ऊर्जेच्या जास्त तरंगलांबीच्या विकिरणांचे संगणन करून त्यावर ‘इंडियन जर्नल ऑफ मीटिओरोलॉजी अँड जिओफिजिक्स’ या जर्नलमधून शोधनिबंध लिहिला व त्या शोधनिबंधाला पुरस्कार प्राप्त झाला. भारताच्या हवामानशास्राच्या इतिहासातील, संपूर्णपणे संगणनांचा वापर करत निष्कर्ष काढणारा, तो पहिलाच शोधनिबंध होता. तसेच डॉ.केळकर यांनी भारतीय मान्सूनसंबंधी तयार केलेले पहिलेच सांख्यिकी प्रारूप तयार करण्यात सक्रिय सहभाग घेतला होता.

     १९९७ ते १९९९ या कालावधीत  केळकर यांनी इंडियन मीटिओरोलॉजी सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन, भारत सरकारने त्यांना १९९९ ते २००३ या कालावधीत वर्ल्ड मीटिओरोलॉजिकल ऑर्गनायझेशन, जिनिव्हा येथे भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यकारी परिषदेचे सभासद म्हणूनही त्यांची निवड झाली होती.

     २००३ साली हवामान खात्यातून निवृत्त झाल्यानंतर, त्यांनी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या नियामक समितीचे, तसेच इस्रोच्या अवकाशशास्त्र सल्लागार समितीचे सदस्यपद आणि वसुंधरा ट्रस्टचे विश्वस्तपदही स्वीकारले. सध्या ते पुणे येथील इस्रो अवकाश अध्यासनात प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. नव्या पिढीला किंवा सर्वसामान्यांनासुद्धा हवामानविषयक अनेक संकल्पनांची माहिती व्हावी या उद्देशाने ते लोकसत्ता, सकाळ यांसारख्या दैनिकांतून सातत्याने लिखाण करत असतात. २००६ साली ‘उपग्रह हवामानशास्त्र’ या विषयावर त्यांचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

डॉ. मानसी राजाध्यक्ष

केळकर, रंजन रत्नाकर