केळकर, शरद मनोहर
शरद मनोहर केळकर यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे वडील वकील होते तर आजोबा दिवाण बहाद्दूर व्ही.एम.केळकर हे अकोला येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांचे संपूर्ण शिक्षण नागपूर येथेच झाले. बालक मंदिर येथे प्राथमिक तर शालेय शिक्षण पटवर्धन विद्यालयात झाले. विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी १९५७ मध्ये गणित विषयात एम.एस्सी.ची पदवी घेतली.ते उत्तम क्रिकेटपटू होते. त्याचबरोबर टेनिसमध्येही त्यांनी नैपुण्य मिळवले होते.
विज्ञान महाविद्यालयातच केळकर यांनी काही काळ गणित विषय शिकवला. १९५७ मध्येच त्यांनी आय.ए.एस.ची परीक्षा दिली. या पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले आणि भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांना प्रवेश मिळाला. दिल्ली, भावनगर तसेच नागपूर येथे येथे त्यांना प्रशिक्षण मिळाले. १९५९ मध्ये नागपूर येथे नाग विदर्भ आंदोलन झाले. या काळात त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखणे म्हणजे काय याचे प्रात्यक्षिकच पाहायला मिळाले. १९६० मध्ये केळकर यांचा विवाह मालती कुंटे यांच्याशी झाला.
त्यानंतर त्यांची उपविभागीय अधिकारी (सब डिव्हिजनल ऑफिसर) या पदावर मूर्तीजापूर येथे नेमणूक झाली. यानंतर मुंबईतही त्यांची बदली झाली. पुण्यातील बदलीत त्यांनी सेल्स टॅक्स विभागात साहाय्यक आणि उप आयुक्त (असिस्टंट अॅण्ड डेप्युटी कमिशनर सेल्स टॅक्स) या पदावर काम केले.
१९६४ मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्र सरकारात संरक्षण मंत्री असताना त्यांनी केळकर यांची विशेष सचिव म्हणून नियुक्ती केली. पुढे १९७२ पर्यंत त्यांनी सचिव पदावर काम केले.
यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक, केंद्र सरकारात पेट्रोलियम व रसायन विभागाचे सहसचिव तसेच राज्याचे उद्योग आयुक्त या पदावरही त्यांनी काम केले.
महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण व विकास केंद्र (औरंगाबाद), उद्योगमित्र या संस्था आणि संघटनांच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला.
केंद्र सरकारच्या बँकिंग विभागाचे अतिरिक्त सचिव पदावरचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांना ‘एशियन डेव्हलपमेंट बँके’च्या कार्यकारी संचालक पदासाठी मनिला येथे त्यांची निवड झाली. ७ मे १९८८ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.