Skip to main content
x

केशवदत्त, महाराज

केशवदत्त महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे केशव अत्रे. यांचा जन्म माणूर या गावी झाला. बाळपणीही त्यांची वृत्ती देव-धर्म विषयात रमणारी होती. त्यामुळे सन १९०९ मध्ये म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी नर्मदा परिक्रमापूर्ण केली. नर्मदा परिक्रमा केल्याने चित्तात वैराग्य व देहावर सतेजता आली होती. आळंदी येथे जाऊन त्यांनी माउलींसमोर प्रथम प्रवचन केले. त्या पहिल्या प्रवचनापासूनच त्यांची प्रवचनाची हातोटी व विषय प्रतिपादनाची शैली यांविषयी सर्वदूर वाच्यता होऊ लागली. आळंदीत ज्ञानेश्वरी माउलींची त्यांनी बराच काळ अखंड साधना केली व अक्षरश: ज्ञानेश्वर हृदयही उपाधी प्राप्त करून घेतली.

पुण्यात त्यांचा केशवराव देशमुख, भिंगारकरबुवा, साखरे महाराज यांच्याशी घनिष्ठ संबंध आला. पुण्यातही ज्ञानेश्वरीच्या प्रवचनांमुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली.  धुळ्यात पाझरा नदीकाठी पद्मनाभ स्वामींच्या मठात त्यांची प्रवचने होत असत. धुळ्यात त्यांच्या कार्याला अधिष्ठान प्राप्त झाले. धुळ्याहून सोनगीरला आलेले केशवदत्त तेथे सद्गुरू गोविंद महाराजांचे शिष्य झाले. सोनगीरलाच त्यांनी आपली कर्मभूमी मानून गोविंद महाराजांची सेवा सुरू केली. सद्गुरूंच्या समाधीनंतर सोनगीरच्या कार्याचा भार त्यांच्यावर आला. त्याला त्यांनी सुंदर नियोजन करून व्यापक स्वरूप दिले आणि सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली. त्याद्वारे अन्नदान, विद्यादान, तसेच मागासांची सेवाही सुरू केली. आदिवासी जनतेतील गोरगरिबांना वस्त्रदान करून, मोफत औषधोपचार करून, भक्तीला सामाजिक अधिष्ठान दिले. केशवदत्तांनी सर्व कार्य करीत नामस्मरण कराया व्रताचा पुरस्कार केला. ते नेहमी उदाहरण देत : स्वे स्वे कर्मण्यथिरत: संसिद्धि लभते नर: । त्यांची भगवंताच्या या वचनावर प्रगाढ श्रद्धा होती.

केशवदत्त महाराज यांचे लेखनकौशल्यही उत्तम होते. त्यांच्या ज्ञानेश्वर वैभव’, ‘सगुण साक्षात्काररुक्मिणी स्वयंवरावरील टीकावाचनीय आहेत. केशवदत्तांच्या जीवनकाळात त्यांनी अनेक सभा घेतल्या, टेनन्सी बिलावरील सभा, निजाम राज्यातील हिंदूंवर जुलूम या विषयांवर भद्रकाली पटांगणातील सभा, धर्मवीर विश्वासराव डावरे यांच्यावरील व्याख्यान, धर्म प्रसारार्थ सर्व शंकराचार्यांची एकत्रित सभा, अशा अनेक सभांचे उल्लेख आहेत. केशवदत्त महाराजांची गुरुभक्तीही अत्यंत पराकोटीची होती. त्यांची भावनाच अशी होती की, ‘मी स्मरण करतो ते गुरूंचेच करतो.सर्व कार्यांत, सर्वकाळी सद्गुरुस्वरूप जाणून ते वावरत असत. त्यांची उक्ती होती : हम हैं तो गुरु नहीं । गुरु हैं तो हम नहीं।केशवदत्त सद्गुरूंशी पूर्णपणे एकरूप झाले होते. १९७१ साली त्यांच्या घशाला गाठ झाली व ती गाठ कर्करोगाची होती हे निष्पन्न झाले. अशा वेळी एक वर्ष ते दुखणे त्यांनी सहन केले. मध्यरात्री सर्वांना उठवून स्वत: आसनस्थ होऊन राधे-गोविंदया नामस्मरणात प्रयत्नपूर्वक प्राणत्याग केला. त्यांचे निर्वाण धुळे येथील गणपुळे दत्तमंदिरात झाले. त्यानंतरचे सर्व विधी सोनगीर येथे केशवदत्त महाराज यांचे शिष्य, श्री सद्गुरू मधुसूदन महाराज यांच्याकरवी झाले.

संपादक मंडळ

केशवदत्त, महाराज