Skip to main content
x

केतकर, गजानन विश्वनाथ

     विचारवंत ग.वि.केतकर यांचा जन्म पुणे येथे झाला. पुणे येथे १९१४ साली मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर बडोद्याच्या महाविद्यालयातून इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन ते १९१९ साली बी.ए. व पुढे एल्एल.बी झाले आणि केसरी-मराठा संस्थेत संपादकीय विभागात त्यांनी कामास सुरुवात केली.

     १९३० साली ते मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाल्याने त्यांना ९ महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांच्या व स्वराज्य पक्ष, हिंदू महासभा या राजकीय पक्षांच्या कार्याशी ते निगडित होते.

     केतकरांनी लोकमान्य टिळकांच्या भाषाशैलीचे वर्णन करताना लिहिले होते, “टिळकांची भाषाशैली ही त्यांच्या स्वभावाप्रमाणेच सरळ, अकृत्रिम, निर्भीड व प्रामाणिक बनली आहे. त्यांच्या दृढ निश्चयामुळे तिच्यात निस्संदिग्धपणा आला आहे. त्यांच्या लेखांचे गाजलेले मथळेही महत्त्वपूर्ण ठरतात.”

     या वर्णनातील बरेचसे गुण केतकरांच्या लेखनात उतरण्याचे कारण केतकरांची आई ही लोकमान्यांची कन्या व त्यांचे वडील आणि आजोबा व्यवसायाने वकील होते, हे होय.

     प्राधान्याने ‘युक्तिवाद’ चातुर्याचाच आश्रय करून आपले विवेचन वाचकांना पटविण्याचे सामर्थ्य असलेल्या थोड्या लेखकांत ग.वि.केतकरांचे स्थान आहे’ असे श्री अ.ना.देशपांडे म्हणतात. त्यांच्या लेखणीच्या मर्मभेदाची चुणूक त्यांचे संघबंदीवरील तीन लेख दाखवतात. इतर अनेक अनुयायांचा कोठल्या ना कोठल्या तरी मुद्द्यावर टिळकांशी थोडातरी मतभेद असेल, पण केतकरांना टिळकांची राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शिक्षणविषयक सर्वच्या सर्व मते संपूर्णपणे निरपवाद मान्य होती. ‘स्मरणगाठ’ या नावाचे सदर विविध निमित्तांनी लिहून त्यांनी समाज प्रबोधनाचे महान कार्य प्रभावीपणे करताना हिंदूंच्या भावविश्वातील उणिवांंवर नेमके बोट ठेवून त्यांना समयोचित मार्गदर्शन केले.

     लोकमान्य टिळक व सावरकर यांच्या विचारसरणीचे अनुयायी व प्रतिपादक असणारे केतकर, पत्रकारिता हा ध्येयवाद मानून त्याची जपणूक करणारे होते. १९३६ ते १९४२ या काळात ते ‘मराठा’ ह्या इंग्रजी साप्ताहिकाचे व १९४७ ते १९५० या काळात ‘दैनिक केसरी’चे मुख्य संपादक होते. गांधीहत्येनंतर सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात निर्माण झालेली मोठी दरी दूर करून सामंजस्य निर्माण करण्यासाठी मध्यस्थाची महत्त्वाची भूमिका केतकरांनी बजावली. त्यांचे हिंदूपण विचाराधिष्ठित असून त्यात कर्मकांडाना, अवडंबराला स्थान नव्हते. केतकरांना गांधीच्या खुनाच्या कटाची माहिती असून त्यांनी ती सरकारला बुद्धीपुरस्सर दिली नाही, असा आरोप ठेवून त्यांचेवर खटला भरला गेला, जो देशभर गाजला. केतकर या खटल्यातून सर्वथा निर्दोष म्हणून मुक्त झाले. त्या वेळी त्यांचे वय ७८ होते. त्यांच्या सहवासात आलेली एक विदेशी महिला त्यांच्या साधेपणावर प्रभावित होऊन, धर्मपरिवर्तनाने हिंदू होऊन त्यांची द्वितीय धर्मचारिणी बनली. परिणामी त्यांना केसरीचे संपादकपद व विश्वस्तपद सोडावे लागले. पण त्यांनी त्या प्रसंगी जराही कटुता उत्पन्न होऊ दिली नाही. १९५७ ते १९६४ या काळात केतकर पुण्याच्या ‘तरुण भारत’चे संपादक होते. अभ्यासू, व्यासंगी, निर्भीड संपादकाची-देशहिताची, समाजहिताची कळकळ असणारी परंपरा- त्यांनी जाणीवपूर्वक सांभाळली.

     द्विखंड भारताबद्दलचे मनस्वी दुःख व्यक्त करणारा त्यांचा ‘भग्नमूर्तीचे षोडशोपचार’ हा लेख मर्मभेदक आहे. टिळक व गांधी यांच्या विचारसरणीतील फरक स्पष्ट करण्यासाठी ‘साध्यानुकूल साधनाविवेक’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या चार लेखांत त्यांची सूक्ष्म विवेचक दृष्टी दिसते. 

     त्यांच्या ग्रंथसंपदेत ‘गीताबीज’ (१९२४), ‘हिंदुत्वाची राष्ट्रीय मीमांसा’ (१९४४), ‘मर्मभेद’ (१९४७ ते १९५० या काळातील निवडक लेखसंग्रह), ‘गीतार्थ चर्चा’ (१९६३), लाला लजपतराय यांचे चरित्र, डॉ.पां.स. खानखोजे यांचे ‘रणझुंजार’ हे चरित्र (१९६६), ‘ख्रिस्तधर्म’ (१९६९) यांचाही उल्लेख करावा लागेल. याशिवाय त्यांनी देशकालदर्शी हिंदुधर्मशास्त्र, ज्ञानकोशकारांचे हिंदुत्वदर्शन, भारतातील सर्वधर्मसमन्वय, हिंदूंचे कुराणवाचन या लेखमाला लिहिल्या.

     ध्येयवादी पत्रकार, हिंदुत्वाच्या विचारसरणीचा पुरस्कर्ता व गीतेचा अभ्यासक असणार्‍या अशा या साध्या राहणीच्या व ‘सुखदुःखे समे कृत्वा’ असा निर्भय आदर्श पत्रकारांसमोर ठेवणार्‍या केतकरांची कामगिरी प्रेरक होती, केसरीच्या परंपरेला साजेशी होती; यात शंका नाही.

- वि. ग. जोशी

केतकर, गजानन विश्वनाथ