Skip to main content
x

किंकेड, चार्ल्स ऑगस्टस

       शेरबर्न स्कूल व ऑक्सफर्डचे बॅलिओल कॉलेज येथे आपले माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण संपवून १८९१ मध्ये चार्ल्स ऑगस्टस किंकेड हिंदुस्थानला आले. कराचीचे असि. कलेक्टर म्हणून त्यांनी प्रथमत: काम करण्यास सुरुवात केली. निवृत्त होण्याच्या सुमारास हे मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश बनले होेते.

     या सर्व कारभारात त्यांना सर्व हिंदुस्थानचा प्रवास घडून हिंदी इतिहास, संस्कृती व आचार-विचार यामध्ये एक प्रकारची विशेष गोडी वाटू लागली. हिंदी इतिहासावर त्यांनी लिहिलेले ग्रंथ त्यांच्या या तन्मयतेचे जिवंत स्मारक होऊन आपणासमोर उभे आहेत.

     हिंदुस्थानातील - विशेषत: सिंध, गुजरात व महाराष्ट्र या प्रांतातील सहवासाने उत्पन्न झालेल्या उत्कंठेने ऐतिहासिक माहिती मिळवून त्यांनी ती छोट्या छोट्या पुस्तकांत एकत्र केली आहे. नाविन्याच्या दृष्टीने आपल्या देशी वाचकांना त्यात विशेष महत्त्व वाटले नाही, तरी ब्रिटिशांकडून हिंदुस्थानची बदनामी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न होत असता त्यांच्याच एका जातभाईने त्यातील सौंदर्यस्थळे दाखवण्याचा प्रयत्न करावा, हे विशेष कौतुकास्पद आहे.

     रा.ब. द.ब. पारसनीस यांच्या सहकार्याने किंकेड यांनी लिहिलेला  ‘History of Maratha people’ हा त्रिखंडात्मक (१९१८, २२, २५) ग्रंथ सर्वच दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे.

     यांच्या इतर ग्रंथांत (१) Deccan Nursery Tales (१९१४), (२) The Indian heroes  (१९१५), (३)The Tale of the Tulsi plant, (४)The Outlaws of kathiawar, (५) Tales from Indian Epics (६)Tales of King vikrama, (७)Tales of the Saints of Pandharpur, (८)Istur Phakde (१९१७), (९) The Hindu Gods and how to Recognize Them (१९२०), (१०) Shrikrishna and other Stories (१९२०), (११) Tales From the Indian Drama, (१२)The Anchorite, (१३) Tales From Old Sind,(१४) Folk Tales of Sind and Gujerat व (१५) Our Parsee Friends हे ग्रंथ प्रमुख आहेत.

     त्यांचे चिरंजीव डेनिस किंकेड हेही मुंबई इलाख्यात सरकारी नोकरीत होते. त्यांचे ‘Grand Rebel’हे छ. शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे.

— संपादित

किंकेड, चार्ल्स ऑगस्टस