Skip to main content
x

कझिन्स, जेम्स हेन्री

जयराम

     यर्लंडमधील बेलफास्ट येथे जन्मलेल्या जेम्स हेन्री कझिन्स यांनी हिंदू धर्माप्रती आपल्या मनात असलेले विशेष प्रेम व्यक्त करण्याकरिता हिंदू धर्माचा विधिवत स्वीकार करून जेम्सऐवजी जयराम हे नाव धारण केले होते. विलक्षण प्रतिभेचे धनी असलेल्या कझिन्स यांनी वयाच्या विसाव्या वर्षी आपला पहिला काव्यग्रंथ प्रकाशित केला. विल्यम बटलर येट्स या सुप्रसिद्ध आयरिश कवीच्या सहकार्याने त्यांनी आयर्लंडमधील साहित्याच्या पुनरुज्जीवनाकरिता  १८९७ साली एक संस्था काढली. १९०४ मध्ये ते थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य झाले व १९१५पर्यंत ते आयर्लंडमध्ये अध्यक्षांचे प्रतिनिधी म्हणून सोसायटीच्या कार्याचा प्रचार करीत होते. दरम्यान १९०३मध्ये जेम्स कझिन्स यांचा मार्गारेट एलिझाबेथ जिलेप्सी यांच्याशी विवाह झाला.

ॅनी बेझंट यांनी काढलेल्या न्यू इंडियाच्या संपादक मंडळात कझिन्स सन १९१५मध्ये दाखल झाले. बेझंट यांनी काढलेल्या नॅशनल युनिव्हर्सिटीब्रह्मविद्याश्रमया दोन संस्थांत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. मद्रास विद्यापीठाच्या कला विभागातील मंडळाचे व सिनेटचे ते सदस्य होते. मदनपल्ली येथील थिऑसॉफिकल कॉलेजचे ते कित्येक वर्षे प्राचार्य होते.

त्यांनी १९३३ साली इंग्लिश काव्यसंग्रहाचे वीस विभाग व १९३४मध्ये इंग्लिश गद्याचे वीस विभाग प्रसिद्ध केले. त्यांनी जगाच्या चारही खंडातील निरनिराळ्या विद्यापीठांतून काव्य व कला या विषयांतील प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. कझिन्स यांनी दोनदा जागतिक प्रवास केला आणि प्रमुख चित्रकारांची मूळ चित्रे मॅजिक लँटर्नच्या साहाय्याने जगभरातील विद्वान व रसिक लोकांना दाखवली. त्याचबरोबर त्यांनी शिक्षण, तत्त्वज्ञान, काव्य, हिंदी संस्कृती व थिऑसॉफी या विषयांवर व्याख्याने दिली. या सर्व कार्यात त्यांना त्यांच्या विद्वान व कलाभिज्ञ पत्नी मार्गारेट यांचे पूर्ण साहाय्य लाभले होते.

कझिन्स यांनी काही महत्त्वपूर्ण विषयांवर लेखनही केले आहे. फंडामेंटल युनिटी ऑफ एशिया’, ‘फॉरेट मेडिटेशन’, ‘बेसेस ऑफ थिऑसॉफी’, ‘वर्क अँड वर्कशॉप’, ‘स्टडी इन सिंथेसिस’, ‘वर्क ऑफ प्रोमीथिअन’, ‘समदर्शनकिंगडम ऑफ यूथही त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथांची नावे आहेत.

इंग्रजी काव्याचे प्राध्यापक म्हणून १९१९-१९२०मध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जपानमधील कियोजीजुकू येथील विद्यापीठ व शिक्षण संस्थांकडून कझिन्स यांना डि.लिट्. पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्रिवेंद्रम येथील सरकारी चित्रसंग्रहालयाला संघटित स्वरूप देऊन त्रावणकोर संस्थानच्या सांस्कृतिक जीवनाबाबत केलेल्या कार्याचे पारितोषिक म्हणून महाराजांकडून महापंडित म्हणून दरबारी पोषाख व वीरशृंखलासंज्ञक सुवर्णकंकण प्रदान करण्यात आले. तसेच दक्षिण हिंदुस्थानातील शिक्षक संघातर्फे कुलपतीपदवी इत्यादी अनेक सन्मान व पुरस्कार त्यांना लाभले.

संपादित

कझिन्स, जेम्स हेन्री