Skip to main content
x

कमते, इराप्पा अपण्णा

           राप्पा अपण्णा कमते यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयातून जीवशास्त्र व रसायनशास्त्र विषयातील बी.एस्सी. ही पदवी १९५६मध्ये प्राप्त केली. प्रारंभीच्या काळात, वडिलोपार्जित तंबाखूची शेती असूनही, त्यांनी रेशीमनिर्मिती व्यवसायातच लक्ष घालायचे ठरवले. सांगलीनजीकच्या कोरगावकरांच्या जमिनीत त्यांनी तुतीची लागवड यशस्वीरीत्या करून प्रयोग सुरू केले होते. त्याचबरोबर त्यांनी मिरजेजवळच्या पानमळ्यातील तुती लागवडीच्या आधारे एका विद्यालयातील खोलीत रेशीम कीटक संगोपन प्रयोग सुरू केले. तसेच त्यांनी इस्लामपूर येथील शंकर पाटील यांची १७ एकर जमीन खंडाने घेऊन तेथे तुतीची लागवड केली. बेळगावहून संगोपनासाठी रेशीम कीटकांचे अंडीपुंज मिळवले व संगोपन कार्याचे प्रात्यक्षिक यशस्वी केले. हिंडलगा, मालगाव, गुंडेवाडी या भागात तुतीची लागवड आणि रेशीम कीटक संगोपन करून त्यांनी रेशीमनिर्मितीतील तंत्रज्ञान अवगत करून घेतले. तत्कालीन उद्योगमंत्री बॅ.जी.डी.पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी १९५७-५८च्या सुमारास या क्षेत्रात मोठे कार्य केले. त्यांनी १९५८मध्ये महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या रेशीम संशोधन प्रकल्पामध्ये डॉ.गो.बा. देवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या रेशीम संशोधन संस्थेत कामाला सुरुवात केली. येथे त्यांनी १५ वर्षे काम केले.

           डॉ.देवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.क्षीरसागर यांच्या सहकार्याने कमते यांनी तुतीची लागवड व वाणांची सुधारणा, संगोपन तंत्र विकास, रेशीम कीटकांच्या टसर, मुगा, एरंडी अशा जातींवरील प्रयोग असे कार्य केले.

           या संशोधनाचे निष्कर्ष सारांशरूपाने पुढीलप्रमाणे देता येतील : कमी पावसाच्या पठारी प्रदेशात, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागांत तसेच पश्चिम महाराष्ट्रात हा व्यवसाय यशस्वी होतो. सह्याद्रीचा घाटमाथा व कोकण भागात हिवाळा व उन्हाळा अनुकूल ठरतो. पाचगणीसारख्या १२०० मीटर उंचीच्या, परंतु तुलनेने कमी पावसाच्या पर्जन्यछायेच्या पूर्वभागात कीटक संगोपन वर्षभर करता येईल. त्यामुळे तुतीच्या रोपवाटिका, बीजकोश व अंडीपुंज उत्पादन यासाठी हा भाग खूप अनुकूल आहे. अंबोलीघाटही अनुकूल आहे. पाचगणी, वाई येथील प्रयोगशाळांमधून वाई १ व वाई २ हे रेशीम कीटकांचे सुधारित नवे वाण निवड पद्धतीने निर्माण करण्यात आले. ते म्हैसूरच्या मूळ वाणांपेक्षाही अधिक दर्जेदार आहेत. तुतीचेही नवे वाण निर्माण करण्यात आले. संगोपन तंत्रअंतर्गत, कोषबांधणीसाठी ‘कोशिका’ व शिशू अळ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी ‘शिशुका’ अशी नवीन सुधारित साधनेही विकसित केली गेली.

           तुती लागवड आणि कीटक संगोपन याविषयीची महाराष्ट्रासमोर तांत्रिक मार्गदर्शक माहिती आता ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. सर्वांगीण प्रशिक्षण पाठ्यक्रम निर्माण करण्यात येऊन बहुश्रेणीय प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या व्यवसायाची सर्वांगीण जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडून महाराष्ट्र शासनाच्या ‘हातमाग, यंत्रमाग, वस्त्रोद्योग व रेशीम उद्योग व्यवसाय’ या शासकीय खात्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यासाठी प्रारंभीच्या काळात कमते यांनी राज्य संचालक म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. 

           कमते यांनी बायफ डेव्हलपमेंट रीसर्च फाऊंडेशन या अग्रगण्य कृषिविकास व ग्रामीण विकास संस्थेतही रेशीम विकासासाठी कार्य समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांनी तेथे ४२ वर्षांचा दीर्घकाळ व्यतीत केला. त्यांनी य.च.म.मु.वि. (नाशिक) यांच्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये डॉ. क्षीरसागर यांच्याबरोबर सहलेखन केले. त्याचप्रमाणे ‘रेशीम व्यवसाय नव्या वाटा’ हे पुस्तकही या उभयतांनी लिहिले व १९९८मध्ये प्रसिद्ध केले.

- डॉ.  कमलाकर क्षीरसागर

कमते, इराप्पा अपण्णा