Skip to main content
x

कंटक, माधव रामचंद्र

     माधव रामचंद्र कंटक यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांनी पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून इतिहास विषयात एम.ए. केले. मराठा मंदिर, मुंबई या संस्थेतर्फे शिवछत्रपतींच्या चरित्र लेखनाचा प्रकल्प डॉ. त्र्यं.शं. शेजवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. या शिवचरित्राच्या प्रकल्पात शेजवलकरांचे साहाय्यक म्हणून डॉ. कंटक काम करीत होते. शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाबाबत आग्रही असणाऱ्या प्रा. शेजवलकरांच्या तालमीत तयार झालेल्या डॉ. कंटक यांना या कामाचा अनुभव पुढील इतिहास संशोधनात उपयोगी पडला. त्यांच्या इतिहास संशोधनात वस्तुनिष्ठ लेखनाचा आणि परखड मतदिग्दर्शनाचा शेजवलकरांचा ठसा व दृष्टिकोन आढळतो.

     प्रा. शेजवलकरांच्या मृत्यूमुळे शिवचरित्राचा हा प्रकल्प अपूर्ण राहिला; परंतु डॉ. कंटकांनी यातूनच शेजवलकरांच्या ‘संकल्पित शिवछत्रपती चरित्राचा आराखडा’ हे पुस्तक तयार केले. आपल्या मार्गदर्शकाला त्यांनी एक प्रकारे ही श्रद्धांजलीच वाहिली. डॉ. मा.रा. कंटक हे १९७१ ते १९९३ या कालावधीत पुणे येथील डेक्कन महाविद्यालयामधील ‘मराठा इतिहास संग्रहालयाचे’ अभिरक्षक होते.

     संग्रहालयातील अस्सल ऐतिहासिक मोडी कागदपत्रांच्या साहाय्याने मराठा इतिहासातील अनेक अज्ञात गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. त्यातूनच त्यांचा ‘फर्स्ट अँग्लो-मराठा वॉर’ हा पीएच.डी.चा प्रबंध तयार झाला व तो नंतर पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. भारतीय इतिहासाला नवे वळण लावणार्‍या गोष्टींमध्ये इंग्रज व मराठ्यांमधील पहिल्या युद्धाचा समावेश होतो. अठराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मराठी सत्ता व ब्रिटिश यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. ‘फर्स्ट अँग्लो-मराठा वॉर’ या पुस्तकातून डॉ. कंटकांनी लष्करीदृष्ट्या या युद्धाचे परीक्षण केलेले दिसते. या घटनेत एकूण सहा मोठ्या लढाया झाल्या, त्यांत पाच कोकणातील होत्या, तर एक गुजरातच्या सरहद्दीवर झाली. डेक्कन महाविद्यालयामधील मेणवली दप्तरातील कागदपत्रे व पेशवे दप्तरातील मूळ कागदपत्रांच्या साहाय्याने डॉ. कंटक यांनी आत्तापर्यंत उजेडात न आलेल्या अप्रसिद्ध घटनांवर प्रकाश टाकला आहे. याचबरोबर दोन्हींकडील सैन्याची रचना, त्यांची संख्या, लष्करी डावपेच, मोहिमांमधील सैनिकांचे जीवन, तसेच या लढाईच्या सामाजिक व आर्थिक बाजूंचाही बारकाईने अभ्यास केलेला दिसतो.

     इतिहासाचार्य डॉ. वि.का. राजवाडे हे इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ, व्याकरणकार, ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलक-संपादक, निबंधकार, राजकीय व सामाजिक विचारवंत, शिलालेखतज्ज्ञ, तसेच अनेक मंडळ स्थापनेचे प्रणेेते अशा विविध अंगांनी महाराष्ट्रातील जनतेला परिचित आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय भावनेने प्रेरित होऊन त्यांनी जे काही काम केले, त्याला तोड नाही. परंतु त्यांचे सर्व लिखाण हे त्यांची मायबोली ‘मराठी’ भाषेमध्ये असल्याने त्यांच्या लिखाणातील विचार देश-परदेशांतील अन्य भाषिक अभ्यासकांपर्यंत नीट पोहोचू शकले नाहीत. राजवाड्यांच्या या लिखाणाचा परिचय इंग्रजीमध्ये फारच फुटकळ लेखांमधून मांडण्यात आला होता. डॉ. कंटकांनी हाच विचार करून, ‘राजवाडे अ‍ॅण्ड हिज थॉट्स’ हे पुस्तक संपादित केलेले आहे. राजवाड्यांच्या मराठीतील लिखाणांचा परिचय इंग्रजीमध्ये करून देण्यात हे पुस्तक बर्‍यापैकी यशस्वी ठरलेले आहे.

     शेजवलकरांच्या ऐतिहासिक लेखनाचा, तसेच प्रगतीमधील लेखांचा अभ्यास करून त्यांनी शेजवलकरांची वैचारिक भूमिका काय होती याचे विश्लेषण त्यांनी;  शेजवलकर लिखित ‘पानिपत १९६१’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीला लिहिलेल्या प्रस्तावनेत मांडले आहे. शेजवलकरांचे ऐतिहासिक, राजकीय व सामाजिक विषयांवरील लेखन परस्परपूरक आहे. त्यांची वैचारिक भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने या परस्परपूरक असणार्‍या लिखाणाचे स्वरूप, त्यांच्या लिखाणातील खास वैशिष्ट्ये, इतिहास व समाजधारणा या दोन्हींकडे पाहण्याचा त्यांचा विशिष्ट दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या एकूण इतिहासाबद्दल त्यांनी मांडलेले वैचारिक सूत्र इत्यादी मुद्द्यांचा त्यांनी आपल्या प्रस्तावनेत परामर्श घेतला आहे.

     डॉ. कंटकांचे यापुढील संशोधन हे ‘खडर्याची लढाई’ यावर आहे. बहुतेक इतिहास अभ्यासक या युद्धाकडे मराठ्यांनी त्यांच्या शत्रूवर मिळविलेला शेवटचा मोठा विजय असे वर्णन करतात. डॉ. कंटक (सहलेखक : डॉ. गो.त्र्यं. कुलकर्णी) यांनी या पुस्तकात संपूर्ण भारतीय इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून या लढाईकडे पाहिले आहे. या लढाईचा परिणाम म्हणून इंग्रजी सत्तेचा पाया व मराठा, निजाम, तसेच इतर देशी सत्तांचा विनाश कसा झाला, हे त्यांनी दाखवून दिले आहे. या पुस्तकात त्यांनी मराठी व पर्शियन साधनांबरोबरच इंग्लिश साधनांचा सुद्धा वापर केला आहे. राजवाडे व शेजवलकर या दोन प्रसिद्ध व्यक्तींच्या वैचारिक भूमिकेचा अभ्यास करतानाच डॉ. कंटक हे स्वत: पानिपत, खडर्याची लढाई, पहिले मराठा-इंग्रज युद्ध या तीन मुख्य लढायांचा अभ्यास करताना दिसतात. मराठ्यांच्या इतिहासातील या प्रमुख लढायांचा मूळ कागदपत्रांच्या साहाय्याने अभ्यास करणारे डॉ. कंटक हे त्यामुळेच इतर संशोधकांहून वेगळे वाटतात.

     —  डॉ. गिरीश मांडके 

कंटक, माधव रामचंद्र