Skip to main content
x

कोगेकर, नारायण वासुदेव

       भौतिकशास्राचे प्राध्यापक, ‘मराठी विज्ञान परिषदेचे एक संस्थापक आणि प्रभावी विज्ञानप्रसारक अशी नारायण वासुदेव कोगेकरांची ओळख आहे.

सर्वसामान्य जनतेसाठी मराठी भाषेतून विज्ञान-तंत्रज्ञानविषयक माहितीचा प्रसार करून ज्यांनी लोकजागृतीचे कार्य केले, त्यांमध्ये प्रा.ना.वा. कोगेकर यांचे प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांचा जन्म खामगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे आणि मुंबई येथे झाले.  भौतिकशास्त्र या विषयाची निवड करून त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम.एस्सी. पदवी मिळवली. सुरुवातीला त्यांनी तत्कालीन मुंबई सरकारच्या उद्योगखात्यामध्ये नोकरी केली. तथापि, अध्यापन हे त्यांचे आवडते क्षेत्र होते म्हणून त्यांनी महर्षी दयानंद महाविद्यालय आणि नंतर मिठीबाई महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्य केले. स्वातंत्र्योत्तर काळात जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये लेख लिहायला सुरुवात केली. जनमानसामध्ये त्याचा अनुकूल परिणाम दिसून आला. तसेच, विविध व्यासपीठांवरून आणि आकाशवाणीसारख्या प्रभावी माध्यमांचा आधार घेऊन त्यांनी विज्ञानातील घडामोडी सर्वसामान्य श्रोत्यांपुढे आणल्या. त्यांच्या आकाशवाणीवरील श्रुतिकालोकप्रिय झालेल्या होत्या.

आपण निसर्गातील अनेक मनोहारी किंवा कधी इंद्रधनुष्यासारखे गूढरम्य आविष्कार पाहतो. प्रा.कोगेकरांनी त्यांच्यामध्ये दडलेले विज्ञान सोप्या भाषेत लिहिले. त्यांतील निवडक लेखन त्यांनी संकलित केले आणि निसर्गाचा प्रपंचआणि निसर्ग-नवलाईही दोन पुस्तके प्रसिद्ध केली.

कुमार वाङ्मयनिर्मितीसाठी त्यांनी संशोधकांचे बालपण’, ‘विज्ञानयुगातील शिल्पकार’, ‘विज्ञानाचे अलंकारअशा शीर्षकांची पुस्तके लिहिली. विज्ञान युगातील शिल्पकारया पुस्तकाचे एकूण आठ भाग आहेत. त्यांमध्ये आर्किमिडीज, पायथॅगोरस, कोपर्निकस, गॅलिलिओ, कॅव्हेंडिश, न्यूटन, हूक, बॉइल, पाश्चर, मेरी क्यूरी अशा अनेक थोर शास्रज्ञांचा परिचय त्यांनी सुबोध भाषेत करून दिला आहे. शास्त्रज्ञांच्या कथा आपल्या विद्यार्थ्यांना स्फूर्तिदायक ठराव्यात, अशी त्यांची अपेक्षा होती. आपल्या देशातही अनेक मान्यवर शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ होऊन गेले. भारतीय विज्ञान-तपस्वी’, ‘विज्ञान युगाचे निर्मातेया त्यांच्या पुस्तकांत मान्यवर भारतीय शास्त्रज्ञांची एक मालिका त्यांनी प्रस्तुत केली होती.

आधुनिक विज्ञानातील घडामोडींचा परामर्ष घेण्यासाठीही त्यांनी विज्ञानाची वाटचाल’, ‘किरणांच्या दुनियेत’, ‘अंतरिक्ष प्रवास’, ‘विज्ञान दीपयांसारखी अनेक पुस्तके लिहिली. त्यामुळे अद्ययावत माहितीचा खजिना गरजू वाचकांना सातत्याने उपलब्ध होत असे. त्यांची काही पुस्तके रूपांतरित आहेत, तर काही स्वतंत्र आहेत. जग बदलले या शोधांनीया त्यांच्या पुस्तकाचे इंग्रजीमध्ये अली मीर नजबान यांनी भाषांतर केले आणि ते नॅशनल बुक ट्रस्ट या संस्थेने प्रकाशित केले. त्यामुळे त्यांचा वाचकवर्ग अधिकच विस्तृत होत गेला. विश्वाची उत्पत्ती, व्यापकता आणि रचना या गूढ विषयांमधील विज्ञान वाचकांना खिळवून ठेवते, हे लक्षात घेऊन प्रा.कोगेकरांनी आपल्या ग्रहमालेतील नवग्रह’, ‘चंद्रावर सफर’, ‘सूर्य आणि सूर्यशक्तीचे उपयोग’, अशी अनेक पुस्तके लिहिली. चंद्रावर सफरही एक वैज्ञानिक कादंबरी आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील रंजकता, कथा आणि कादंबऱ्यांच्या स्वरूपात त्यांनी वाचकांपुढे सादर केली. महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी दर महिन्यात, रात्रीच्या आकाशात ग्रह-तारे-नक्षत्र यांचे स्थान कुठे आहे, यासंबंधीचे मार्गदर्शन करणारे लेख लिहिले. या दीर्घकाळ चाललेल्या उपक्रमामुळे अनेकांना खगोलशास्त्राचा परिचय झाला. एवढेच नव्हे, तर या विषयांमधील गूढरम्यता लक्षात आली.

भारतामध्ये दि. १ एप्रिल १९५७ पासून दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला. त्यामधील सुलभता लोकांना चटकन कळावी म्हणून त्यांनी मोजमापनाची उत्क्रांती आणि दशमान पद्धतीहे पुस्तक लिहिले. भारतात दशमान पद्धतीचा अवलंब एका रात्रीत सहजतेने झाला होता. कुठेही गोंधळ, घोटाळा झाला नव्हता. याचे काही प्रमाणात श्रेय प्रा.कोगेकर यांच्यासारख्या नि:स्पृह विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रसार करणार्‍या लेखकांकडे जाते. त्यांनी वेळोवेळी प्रासंगिक विषयांवर लेखन करून जनप्रबोधन केले होते. पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या नऊ लोक प्रबोधन पुस्तिकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या काही पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या काढाव्या लागल्या, तर काही पुस्तकांचे पुनर्मुद्रण करावे लागले. त्यांच्या निवडक पुस्तकांना महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार मिळाला. 

त्यांच्या लेखनाची शैली रंजक आणि सुबोध होती. त्यांनी वैज्ञानिक लेखन करताना आवश्यक असलेला काटेकोरपणा, अचूकता आणि नेमकेपणा कधी सोडला नाही. विज्ञान प्रसार करण्यासाठी त्यांनी मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले. ते मविपचे आजीव सदस्य होते आणि काही काळ त्यांनी परिषदेच्या कार्यकारी मंडळावर काम केले होते. अखेरपर्यंत अविश्रांत  परिश्रम करून प्रा.ना.वा. कोगेकर यांनी विज्ञान प्रसार करून लोकप्रबोधनाचे कार्य चालू ठेवलेले होते.

डॉ. अनिल लचके

संदर्भ :
१.सहावे अ.भा.मराठी विज्ञान अधिवेशन स्मरणिका, मुंबई; १९७१.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].