कोकटनूर, वामन रामचंद्र
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रसायनशास्त्रज्ञ व प्रेशर कूकरचे संशोधक डॉ. कोकटनूर यांचा जन्म भूतपूर्व मुंबई इलाख्यातील अथणी या गावी झाला. १९११ साली मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी संपादन केल्यावर त्यांनी एक वर्ष पुण्याच्या रानडे औद्योगिक संस्थेमध्ये रसायनतज्ज्ञ म्हणून काम केले. नंतर लगेच ते शिष्यवृत्तीवर अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यातील ऑकलंड शहरात गेले. परंतु ज्या पिकावर संशोधन करायचे ते बटाट्याचे पीक त्या वर्षी साफ बुडाल्याने त्यांना शिष्यवृत्ती सोडावी लागली. मग त्यांनी जगप्रसिद्ध कॅलिफोर्निया फ्रूट कॅनर्स असोसिएशनच्या कारखान्यात संशोधक म्हणून नोकरी मिळवली. तेथे त्यांनी नानाविध प्रयोग केले.
पुढे ती नोकरी सोडून त्यांनी उच्चशिक्षण संपादन करण्यासाठी मिनेसोटा विद्यापीठात प्रवेश मिळवला. या विद्यापीठात ते १९१४ व १९१५ साली ‘शेवलीन फेलो’ म्हणून होते. एम.एस्सी. पदवी संपादन केल्यावर, त्यांनी १९१६ साली याच विद्यापीठात पीएच.डी. पदवी संपादन केली. डॉ.कोकटनूरांची उल्लेखनीय बाब म्हणजे ते विद्यापीठात शिकत असताना, त्यांनी लिहिलेले प्रबंध अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या पीएच.डी.चा प्रबंध त्या जर्नलमध्ये आवर्जून प्रसिद्ध करण्यात आला.
विद्यापीठातून शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक नामांकित रासायनिक कंपन्यांत संशोधक म्हणून काम केले. १९२२ साली त्यांनी रसायनशास्त्राच्या अनेक शाखांचे सल्लागार म्हणून स्वत:ची कंपनी काढली. दरम्यान, १९२१ साली त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले. १९२८ साली क्लोरीन व कॉस्टिक सोडा वापराबाबत खास तज्ज्ञ म्हणून ते पंचवार्षिक योजनेला मदत करण्यासाठी रशियाला गेले होते. ही बाब त्यांच्या रसायनशास्रातील बुद्धिमत्तेची कल्पना देणारी ठरते. नंतर दोन वर्षांनी त्यांनी भारतातील श्रीशक्ती अल्कली कारखान्यात सल्लागार व्यवस्थापक म्हणून काम केले. याखेरीज १९३३ सालापर्यंत भारतातील अमेरिकन ट्रेड कमिशनवर त्यांनी मानद सल्लागार म्हणून काम पाहिले.
डॉ. कोकटनूरांच्या नावावर डझनभर विशेष शोध आणि तीसच्यावर एकस्वे आहेत. हे शोध औद्योगिक क्षेत्राला उपयुक्त ठरणारे आहेत. यांमधील उल्लेखनीय शोध म्हणजे पेट्रोलमध्ये एका खास मार्गाने पाणी मिसळल्यास पेट्रोलची क्षमता वाढणारी ठरते. विमानाच्या पंख्याला ‘डोप’ नावाचे द्रव्य लागे. त्याची निर्मिती प्रक्रिया त्या काळात धोकादायक मानली जाई. कोकटनूरांनी केलेल्या शोधामुळे ते बिनधोक व्यापारी पातळीवर उपयोगात येऊ शकले. तसेच ‘रेड डाय’ नावाच्या तांबड्या रंगाबाबत. हा रंग कापसाच्या व लोकरीच्या कापडांत मिसळण्यासाठी उपयोगी पडे. त्याची प्रक्रिया खर्चिक होती. कोकटनूरांनी हा रंग कमी किमतीत उत्पादित होईल असा शोध लावला. तसेच, साबण तयार करताना त्यातून ‘ग्लिसरीन’ नावाचे द्रव्य निघे. ते गोळा करण्यासाठी मोठ्या कारखान्याची गरज भासे. कोकटनूरांनी हे द्रव्य छोट्या प्रमाणातही मिळविता येते, असा शोध लावला. महिलांना स्वयंपाकघरात लागणाऱ्या प्रेशर कुकरचे ते मूळ उत्पादक मानले गेले. त्याचे त्यांनी मुंबईत एकस्व घेतले होते. अशा अनेक शास्त्रीय शोधामुळे कोकटनूरांचे नाव अमेरिकेतील नावाजलेल्या रसायनशास्त्रज्ञांच्या नामावलीत झळकले गेले. त्यामुळे त्यांचे नाव अमेरिकेत ‘मॅन ऑफ सायन्स’, ‘हूज हू ऑफ ईस्ट’मधील प्रसिद्ध व्यक्तींत अंतर्भूत झाले आहे. याखेरीज अमेरिकन केमिकल सोसायटी, अमेरिकन इलेक्ट्रोकेमिकल सोसायटीसारख्या मातब्बर संस्थांनी त्यांना आपले सभासद करून घेतले, तर अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट, इत्यादी संस्थांनी त्यांना आपले सन्माननीय फेलो करून घेतले. १९४० साली अग्रगण्य संशोधक म्हणून ‘युनायटेड स्टेट्स पेटंट ऑफिस’च्या समारंभात त्यांना गौरविण्यात आले आणि न्यूयॉर्कला भरलेल्या जागतिक मेळाव्यात ‘वॉल ऑफ फेम’ म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
डॉ.कोकटनूर अमेरिकेतील अनेक मान्यवर कंपन्यांचे व संस्थांचे सल्लागार होते. तसेच ते भारतातून कार्यरत असणाऱ्या वटूमल फाउंडेशनच्या संचालक मंडळाचे सल्लागारही होते. असा हा थोर शास्त्रज्ञ वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी अमेरिकेत निधन पावला.