Skip to main content
x

कोळी, नारायण धर्माजी

मृदंगाचार्य नारायण धर्माजी कोळी यांचा जन्म मुंबईत झाला. संगीताची आवड असल्याकारणाने  त्यांनी सुरुवातीला हार्मोनिअमचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ते सुरू असताना त्यांनी एका ठिकाणी पं. जयलाल यांचे कथक नृत्य पाहिले आणि आपणही नृत्य शिकायचे हे ठरवून त्यांनी पं. जयलाल यांच्याकडे कथक शिकण्याची सुरुवात केली. या कलेत त्यांची प्रगती खूपच चांगली होती. गुरू त्यांच्यावर खूश होते. कथकमध्ये पखवाजाचे अंग आहे हे पाहून कथकसाठी त्यांनी थोडेसे पखवाजाचे ज्ञान असावे म्हणून पखवाज शिकावा असे ठरवले. मृदंगाचार्य शंकरराव अळकूटकर यांच्याकडे त्यांनी पखवाजाचे शिक्षण सुरू केले. थोड्याच कालावधीमध्ये त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आणि त्यांनी पखवाज आणि फक्त पखवाज हेच ध्येय ठेवले.
संगीताचे शिक्षण चालू असतानाच त्यांनी महाविद्यालयाचेही शिक्षण चालू ठेवले. छोट्या-मोठ्या नोकऱ्याही केल्या आणि ते मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरूपी नोकरीला लागले. त्यांनी बी.ए.,एलएल.बी. ही पदवीदेखील घेतली. शेवटी ते मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक (रजिस्ट्रार)ही झाले.
पं. नारायणराव कोळी यांच्याकडे बरेच विद्यार्थी पखवाज शिकत असत, त्यांत प्रामुख्याने नरसू भोये, गजानन पाटील, राम दीक्षित, ज्ञानेश्वर डिंगोरकर आदी विद्यार्थी होते; पण त्यांचे अत्यंत उत्कृष्ट शिष्य म्हणजे मृदंगाचार्य पं. अर्जुन शेजवळ हे होत.
नारायणराव कोळी यांनी पखवाज वादनात
  आधुनिकता आणताना परंपरेला अजिबात धक्का लागू दिला नाही. अनेक नामवंत कलाकारांसह त्यांनी पखवाज वाजवला आणि जुगलबंदीचे कार्यक्रमही केले; परंतु त्यांची खरी जुगलबंदी रंगत असेल तर ती आपला लाडका पट्टशिष्य अर्जुन शेजवळ यांच्याबरोबर ! 

नारायणराव कोळी यांचा मृत्यू मुंबईत झाला.

        देवदास शेजवळ

 

कोळी, नारायण धर्माजी