Skip to main content
x

कोंडविलकर, महादेव गुणाजी

कोंडविलकर माधव

     माधव कोंडविलकर यांचा जन्म सोगमवाडी, मौजे देवाचे गोठणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरीमधील  'देवाचे गोठणे' या गावात झाला. आई-वडील स्वभावाने व परिस्थितीनेही अत्यंत गरीब होते. स्वातंत्र्यानंतरही खेड्यापाड्यांत जातिभेदाची कुंपणे किती काटेरी आहेत, हे या परिवाराने अनुभवले व याच ‘वेदनांचे वेद’ त्यांच्या साहित्यात रचले गेले.

     सोगमवाडीत चौथीपर्यंत शिकल्यावर, राजापूरच्या पडवे गावी पाचवी-सहावी करून कोंडविलकर मुंबईत आले, रात्रशाळेत आठवी-नववीचे शिक्षण घेतले; पण पुढे शिक्षण अर्धवट सोडावे लागले.ते  १९६८ ला एस.एस.सी.ला बाहेरून बसले. मधल्या काळात अध्यापन शास्त्र, सुतार काम ह्यांचे शिक्षण त्यांनी घेतले. महाराष्ट्र साहित्य परिषदेची ‘साहित्य प्राज्ञ’ परीक्षा उत्तीर्ण झाले. साहित्य विशारदचाही अभ्यास केला. परंतु औपचारिक शिक्षणापेक्षा जीवन जगत असताना सामाजिक, राजकीय, साहित्यिक वातावरणातून जे अनौपचारिक शिक्षण अवगत केले, ते अधिक महत्त्वाचे ठरले.

     कोकणातल्या लोकल बोर्डाच्या व जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी  शिक्षक म्हणून काम केले. २९ वर्षे नोकरी केल्यावर १९९० ला स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

      १९६८ सालापासूनच ते कथा, कविता, स्फुट लेख, बालकथा, बालकविता लिहू लागले. शालेय जीवनापासूनच रोजनिशी लिहिण्याची सवय असल्याने १९७७ साली ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिकांच्या आग्रहावरून १९६९पासूनच्या रोजनीशीचे पुनर्लेखन करून ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ हे आत्मचरित्र त्यांनी  लिहिले. हे मधु मंगेशांच्या ‘तन्मय’ मासिकात छापून आले. संपूर्ण मराठी समाजात या पुस्तकाने खळबळ उत्पन्न केली. दलित आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणून ‘देवाचे गोठणे’ला अक्षर वाङ्मयात गौरवाचे स्थान लाभले. अनलंकृत भाषा, सत्यदर्शन, रेखीव, स्पष्ट चित्रदर्शी वास्तव हे या पुस्तकाचे विशेष म्हणता येतील. ‘वेदनांचे वेद’ हे विशेषण या पुस्तकाला बहाल केले गेले.

     १९७२पासून २००५पर्यंत कोंडविलकरांनी दिवाळी अंकांसाठी कथा, कविता, कादंबर्‍या, बालकथा, बालकविता लिहिल्या. त्यांची आत्तापर्यंत एकूण सेहेचाळीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’, ‘अजून उजाडायचं आहे’, ‘कळा त्या काळच्या’, ‘डाळं’, ‘अंधारातून प्रकाशाकडे’, ‘शापीत’, ‘हाताची घडी तोंडावर बोट’, ‘भूमिपुत्र’, ‘वेध’, ‘एक होती कातळवाडी’, ‘गुरुंसि आले अपारपण’, ‘देवदासी’, ‘काहिली’ इत्यादी कादंबर्‍या, कथासंग्रह, लेख व ‘छान छान गोष्टी’, ‘देशोदेशींच्या कथा’, ‘गौतमबुद्ध’, ‘महात्मा गांधी’, ‘महात्मा फुले’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘स्वामी स्वरूपानंद’, ‘सम्राट अशोक’, ‘भारत आमचा देश आहे’ ही मुलांसाठीची पुस्तके उल्लेखनीय आहेत.

     ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’, ‘डाळं’, ‘हाताची घडी तोंडावर बोट’ या कादंबर्‍यांना महाराष्ट्र शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मय’ पुरस्कार लाभला. ‘हाताची घडी तोंडावर बोट’ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘दि.बा.मोकाशी’ पुरस्कार, ‘कळा त्या काळच्या’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा ‘कै.प्रा.वि.ह. कुलकर्णी’ पुरस्कार मिळाला.

     ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या नाटकाला १९९४ ते २००३ या दहा वर्षांतल्या प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला व महानुभाव ग्रंथोत्तेजक पुरस्कारही मिळाला.

     ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ पुस्तकाचा फ्रेंच व हिंदी भाषांमध्ये अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. हे पुस्तक व यातील काही उतारे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक राज्यांत शाळा व महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमांमध्ये लावले आहे. कोंडविलकरांच्या काही कथांचे व कवितांचे फ्रेंच, इंग्लिश, हिंदी,तमिळ, उर्दू भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. कोंडविलकरांच्या साहित्यावर बुलढाणा, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, पुणे, लांजे येथील प्राध्यापकांनी प्रबंध लिहिले आहेत.

     कोंडविलकरांनी ‘एक गाव एक पाणवठा’, ‘दलित चळवळ’, ‘दलित साहित्य चळवळ’ यांत सक्रिय सहभाग घेतला आहे. राजापूर तालुक्यातील अनेक गावांत पायपीट करून समाज परिवर्तनाचे काम केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक स्तरांवर संघर्ष करून जीवनात यशस्वी कसे होता येते, याचे मौलिक उदाहरण म्हणजे कोंडविलकर होत.

- प्रा. संध्या टेंबे

कोंडविलकर, महादेव गुणाजी