Skip to main content
x

कोरगावकर, विठ्ठलराव

हार्मोनिअमवादनाच्या संदर्भात गोविंदराव टेंबे यांच्यासमवेत विठ्ठलराव कोरगावकर यांचे नाव आदराने घेतले जाते. गोव्यातील कोरगाव हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचा जन्म मुंबईत झाला, नंतर ते कोरगाव येथे राहू लागले. तेथील कीर्तन, भजनामुळे त्यांची संगीताची रुची वाढली. बालपणीच आई-वडिलांचे निधन झाल्याने भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. तेथून त्यांनी मुंबईस प्रयाण केले व पाटणकर संगीत मंडळी या संगीत नाटक कंपनीत ते नोकरी करू लागले.

कंपनीतील भागवत या गायक नटाकडून कोरगावकरांनी बालपणी संगीताचे धडे घेतले. आरंभी ते गायनाचाही रियाझ करत असत; पण वयानुसार आवाज फुटल्यावर त्यांनी हार्मोनिअमकडेच पूर्ण लक्ष दिले. सुमारे १८९९ ते १९०५ पर्यंत त्यांनी भाचूभाई भांडारे यांच्याकडून हार्मोनिअमचे शिक्षण प्राप्त केले.

नंतर त्यांनी हुबळी येथे दुकान सुरु करून फ्रेंच बनावटीच्या हार्मोनिअम, सायकल, स्टोव्ह, शेवरोलेट मोटार, एच.एम.व्ही. ग्रामोफोन या वस्तूंची एजन्सी घेतली आणि हुबळी-कारवार अशी बससेवा सुरू केली. या व्यवसायामुळे त्यांना आर्थिक सुबत्ता व स्थैर्य मिळाले.

या काळात त्यांच्या घरी अनेक मैफली होत असत, बालगंधर्वांच्या ‘गंधर्व नाटक मंडळी’चा मुक्कामही त्यांच्याकडे असे. अब्दुल करीम खाँ, वझेबुवा, सवाई गंधर्व, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, मास्तर कृष्णराव, इ. अनेक कलाकारांचा या काळात त्यांना सहवास लाभला.

अब्दुल करीम खाँसाहेबांकडून किराणा घराण्याच्या गायकीची तालीमही त्यांना १९०६ ते १९२७ अशी सुमारे वीस वर्षे मिळाली. वझेबुवांकडूनही ते अनेक राग व बंदिशी शिकले. अल्लादिया खाँसाहेब, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर अशा दिग्गजांनी त्यांच्या हार्मोनिअम वादनाची स्तुती केली होती.

दुर्दैवाने धंद्यात जबरदस्त आर्थिक तोटा आल्याने कोरगावकरांना आपला व्यवसाय बंद करावा लागला व १९३५ साली त्यांनी मुंबईस रुक्मिणी संगीत विद्यालय सुरू केले व ते चार वर्षे चालवले. त्यांनी अनेक बुजुर्ग गायकांना साथसंगत केली व स्वतंत्र वादनाचे कार्यक्रमही केले. सवाई गंधर्वांच्या एकसष्टीच्या पुण्यातील समारंभातील त्यांचे वादन गाजले होते. एच.एम.व्ही. कंपनीने त्यांच्या स्वतंत्र हार्मोनिअम वादनाच्या नऊ ध्वनिमुद्रिका काढल्या व त्याही खूप लोकप्रिय झाल्या.

कोरगावकरांच्या वादनात किराणा घराण्याची आलापचारी, जयपूर घराण्याची तानक्रिया व बालगंधर्वांच्या गाण्यातले लालित्य असा सुंदर संगम होता. ख्याल पद्धतीने ते रागदारी उत्तम वाजवत, शिवाय ठुमरी व नाट्यपदेही, विशेषतः बालगंधर्वांची पदे अगदी रंगतीने वाजवत.  त्यांच्या वादनात मुलायमपणाबरोबरच अत्यंत तयारी होती. हातात गोडवा व सफाई होती. भात्यावरही त्यांचे प्रभुत्व होते. ते स्वतः हार्मोनिअमचे ‘हवा फिटिंग’ व ‘ट्यूनिंग’ उत्तम करत असत.

त्यांनी मुंबई ते बेळगाव अशा मोठ्या भागात बरेच शिष्य घडवले, ज्यांत रामभाऊ विजापुरे, वसंत शेवडे, म.वा. देसाई, पुरुषोत्तम वालावलकर यांचा उल्लेख होतो.

त्यांचा १९५७ साली बेळगाव येथे सत्कार समारंभ झाला. म्हैसूर संगीत अकादमीने १९७० साली त्यांचा गौरव केला. त्यांच्या अखेरच्या काळात, १९७४ साली गोमंतक कला अकादमीने त्यांच्या वादनाचे ध्वनिमुद्रणही करून ठेवले. वयाच्या एक्याण्णवाव्या वर्षी बेळगाव येथे त्यांचा मृत्यू झाला. बेळगावच्या ‘सुरेल संवादिनी संवर्धन’ या संस्थेतर्फे त्यांच्या नावे पुरस्कार देण्यात येतो.

— चैतन्य कुंटे 

हार्मोनिअमवादनाच्या संदर्भात गोविंदराव टेंबे यांच्यासमवेत विठ्ठलराव कोरगावकर यांचे नाव आदराने घेतले जाते. गोव्यातील कोरगाव हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचा जन्म मुंबईत झाला, नंतर ते कोरगाव येथे राहू लागले. तेथील कीर्तन, भजनामुळे त्यांची संगीताची रुची वाढली. बालपणीच आई-वडिलांचे निधन झाल्याने भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. तेथून त्यांनी मुंबईस प्रयाण केले व पाटणकर संगीत मंडळी या संगीत नाटक कंपनीत ते नोकरी करू लागले.

कंपनीतील भागवत या गायक नटाकडून कोरगावकरांनी बालपणी संगीताचे धडे घेतले. आरंभी ते गायनाचाही रियाझ करत असत; पण वयानुसार आवाज फुटल्यावर त्यांनी हार्मोनिअमकडेच पूर्ण लक्ष दिले. सुमारे १८९९ ते १९०५ पर्यंत त्यांनी भाचूभाई भांडारे यांच्याकडून हार्मोनिअमचे शिक्षण प्राप्त केले.

नंतर त्यांनी हुबळी येथे दुकान सुरू करून फ्रेंच बनावटीच्या हार्मोनिअम, सायकल, स्टोव्ह, शेवरोलेट मोटार, एच.एम.व्ही. ग्रामोफोन या वस्तूंची एजन्सी घेतली आणि हुबळी-कारवार अशी बससेवा सुरू केली. या व्यवसायामुळे त्यांना आर्थिक सुबत्ता व स्थैर्य मिळाले.