Skip to main content
x

कोसंबी, मीरा दामोदर

       हाराष्ट्रातील विदुषी मीरा दामोदर कोसंबी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नामांकित विद्यार्थिनी होत्या. इंटरमीजिएट आर्ट्सला त्या प्रथम श्रेणीत आल्या व विद्यापीठात अग्रमानांकित ठरल्या. बी.ए.ला. त्यांनी कोणताही विशेष व उपविषय न घेता साधारण (जनरल) विषय घेऊन पुनश्च प्रथम श्रेणी मिळविली. स्नातकोत्तर (एम.ए.) परीक्षेसाठी मात्र त्यांनी इंग्रजी (विशेष) व पाली (उपविषय) म्हणून निवडले. तिथेही त्या प्रथम श्रेणीत आल्या.

     यानंतर त्या फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी हा विषय ‘अधिव्याख्यात्या’ म्हणून शिकवू लागल्या. फर्ग्युसनमध्ये प्राध्यापकी करणारी कोसंबी कुळातली ही तिसरी पिढी. त्यांचे आजोबा बौद्धधर्माचे प्रकाण्डपंडित, निर्वाण प्राप्त धर्मानंद कोसंबी पाली या विषयाचे पहिले विभागप्रमुख, तर त्यांचे वडील कै. दामोदर हे गणित विषयाचे प्राध्यापक होते. मीरा कोसंबी इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका होत्या. पुढे त्यांनी ग्रंथपालन विषयात पदवी प्राप्त करून घेऊन मुंबईला ब्रिटिश लायब्ररीच्या प्रमुख ग्रंथपाल म्हणून काम केले. थोरली बहीण माया यांच्याबरोबर त्यांनी स्वीडनला सुमारे वीस वर्षे वास्तव्य केले.

     भारतात परत आल्यावर कोणत्याही एखाद्या सेवेची जोखीम न पत्करता ‘मुक्त संशोधिका’ म्हणून त्यांनी उच्च दर्जाचे संशोधन केले. त्यांचे आवडीचे प्रमुख विषय म्हणजे स्त्री-मुक्ती, महाराष्ट्र संस्कृती, पाली, बौद्धधर्म इत्यादी हे होत.

     महाराष्ट्र संस्कृतीच्या पाश्चात्त्य व भारतीय अभ्यासक मंडळात अ‍ॅन फील्ड हाउस (अमेरिका), इरिना ग्युश्कोेव्हा (रशिया), डॉ. अ.रा. कुलकर्णी यांच्या समवेत त्यांनी ऑस्ट्रेलिया, रशिया, अमेरिका, भारत येथे महाराष्ट्र संस्कृतीच्या विविध पैलूंवर दर्जेदार शोध निबंध सादर केले.

     नुकतेच दिल्लीस्थित एका प्रकाशकानाद्वारे, त्यांनी त्यांच्या विख्यात आजोबांच्या हिंदी-मराठी लेखनाचा आंग्ल अनुवाद प्रकाशित करून धर्मानंदांचे बौद्धधर्म विषयक लेखन सर्व आंग्ल-वाचकांना उपलब्ध करून दिले आहे.

प्रा. डॉ. मो.गो. धडफळे

कोसंबी, मीरा दामोदर