Skip to main content
x

कराळे, जगन्नाथ तुळशीराम

   जगन्नाथ तुळशीराम कराळे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझिरी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव अंजनाबाई आहे. त्यांना सुरुवातीपासूनच शेतीविषयी आवड असल्यामुळे त्यांनी अकोला येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर १९७५मध्ये विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

कराळे पूर्वीपासूनच सीड कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्यांनी जालन्याच्या महिको कंपनीमध्ये ३० वर्षे महाव्यवस्थापक म्हणून कार्य केले आणि २००६मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांची नागझिरी येथे बारा एकर शेती आहे. त्यामध्ये ते बी.टी. कापूस, संकरित ज्वारी, गहू, हरभरा व कांदा यांची पिके घेतात. तसेच त्यांनी आपल्या शेतीत सीताफळ व आवळा ही फळझाडेही लावलेली आहेत. कृषी विभागाच्या सूचनेनुसार त्यांनी आपल्या शेतीत गांडूळ खत प्रकल्प राबवला आहे.

कराळे यांच्या पत्नी सुशिलाताई या जातीने शेतीवर देखरेख करतात आणि फळबाग योजना, ठिबक सिंचन प्रकल्प व सेंद्रिय शेती उपक्रम राबवतात. सुशिलाताई पीक स्पर्धेमध्येही भाग घेतात. त्यांना २००३-०४मध्ये राज्यस्तरीय पीक स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला आहे. त्या शेती उद्योग उत्कृष्ट रीतीने चालवत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना २००५-०६मध्ये जिजामाता कृषिभूषण पुरस्कारदेऊन सन्मानित केले आहे. या दाम्पत्याची शेती आदर्श असून जवळपासचे शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देतात. कराळे स्वतः भारत कृषक समाज, जळगावचे सदस्य आहेत व नेहमी कृषी प्रदर्शनीमध्ये भाग घेतात.

कराळे हे रविशंकरजींचे शिष्य आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगमार्फत मिशन ग्रीन अर्थवृक्ष लागवड व वृक्ष जोपासना करून ते हा कार्यक्रम सार्थ करत असतात. त्यांचा मुलगा अभिजित हादेखील कृषी उद्योजक आहे. त्याने अकोला येथे अभिजित अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज प्रतिष्ठान स्थापन केलेले आहे.

कराळे यांचे कृषिविस्तार कार्य फार मोठे आहे. त्यांनी मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका, फ्रांस, इटली या देशांत कृषी अभ्यासदौरे केलेले आहेत.

 - डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].