Skip to main content
x

कुलकर्णी, कृष्ण श्यामराव

         धुनिक शैलीत चित्रनिर्मिती करणारे चित्रकार व दिल्लीत अनेक चित्रकलाविषयक कार्यांत सहभागी असणारे चित्रकार आणि शिक्षक म्हणून के.एस. अर्थात कृष्ण श्यामराव कुलकर्णी नावारूपाला आले; परंतु महाराष्ट्रातील कला-जगताला ते फारसे ज्ञात नाहीत. त्यांचा जन्म व शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले. त्यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती व मुंबईला सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये जाऊन कलाशिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण हे प्रत्यक्षात येण्यापूर्वी त्यांनी १९३३ ते १९३५ या काळात अर्थार्जनासाठी साइनबोर्ड व सिनेमाचे बॅनर्स रंगविण्याचे काम केले.

         कृष्ण कुलकर्णी यांनी १९३५ मध्ये मुंबई गाठली व १९३५ ते १९४० या काळात सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील चित्रकलेचा शिक्षणक्रम पूर्ण करून ‘जी.डी. आर्ट’ ही पदविका प्राप्त केली. या काळात जे.जे.तील शिक्षणक्रमात आमूलाग्र बदल होऊ लागला होता. कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन निवृत्त होऊन त्या जागी १९३६ मध्ये चार्ल्स जेरार्ड यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी आधुनिक पद्धतीच्या कलाविष्काराला उत्तेजन देण्यास सुरुवात केली. शिवाय युरोपात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आलेल्या विविध कलाचळवळींची ओळख करून देऊन येथील कलाशिक्षणाचा अकॅडमिक व पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांच्या या प्रयत्नांना कलासंग्रहक व कलासमीक्षक श्‍लेशिंजर व रूडी व्हान लायडन यांची साथ होती. परंतु जे.जे.तील ज्येष्ठ शिक्षक जुन्या परंपरेतीलच होते. त्यामुळे के.एस. कुलकर्णी व त्यांच्या काळातील कलाविद्यार्थी एका बाजूला पारंपरिक व अकॅडमिक तंत्रांत प्रवीण झाले; पण त्यांचा कल मात्र आधुनिक पद्धतीच्या कलाविष्काराकडे होत गेला.

         त्यांनी १९४१ व १९४२ ही दोन वर्षे म्यूरलचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना १९४१ ते १९४३ या काळात टाटा न्यासातर्फे शिष्यवृत्तीही मिळाली. ते १९४२ मध्ये गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीतही काही काळ सहभागी झाले; परंतु त्यांचे चित्रकार म्हणून जगण्याबाबतचे आकर्षण कायम होते.

         शिक्षण संपल्यावर सुरुवातीला त्यांनी अर्थार्जनासाठी वस्त्र उद्योगात डिझायनरची नोकरी स्वीकारली व त्यामुळे ते १९४५ मध्ये दिल्लीत स्थलांतरित झाले. ते पुढील आयुष्यात दिल्लीतच स्थिरावले व नावारूपाला आले. यानंतरच्या काळात ते तेथील कलाक्षेत्रातील अनेक संस्थांची विविध प्रकारची कामे करू लागले. सुरुवातीच्या काळात ते दिल्लीतील ‘ऑल इंडिया फाइन आटर्स अ‍ॅण्ड क्राफ्ट्स’ (आयफॅक्स) या संस्थेच्या कार्यकारिणीचे सभासद होते व त्यानंतर १९४८ ते १९५२ या काळात सचिव म्हणून कार्यरत होते. पण या संस्थेच्या कार्यपद्धतीशी आधुनिक विचाराच्या कुलकर्ण्यांचे मतभेद होऊन त्यांनी या संस्थेचा राजीनामा दिला.

         ते १९४८ मध्ये सुरू झालेल्या ‘त्रिवेणी कला संगम’ या संस्थेचे संस्थापक सदस्य होते व १९४९ ते १९६८ या काळात त्यांनी संचालक म्हणून कामही केले. के.एस. कुलकर्ण्यांच्या अध्यक्षतेखाली १९४९ मध्ये नव्या विचाराने भारलेल्या मंडळींनी ‘दिल्ली शिल्पचक्र’ नावाची संस्था सुरू केली. दिल्ली परिसरातील प्रागतिक विचारांच्या तरुण कलावंतांंना या संस्थेकडून प्रोत्साहन व प्रेरणा मिळू लागली. त्यांनी १९४९ मध्ये अमेरिकेत झालेल्या तिसऱ्या जेडीआर फाउण्डेशनच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व केले. दिल्ली व मुंबईतील आठ चित्रकारांनी १९५० मध्ये एकत्र येऊन केलेले प्रदर्शन ही त्या काळातील एक लक्षणीय घटना ठरली. त्यांत के.एस. कुलकर्णी, सतीश गुजराल, क्रिशन खन्ना, रामकुमार, एम.एफ. हुसेन, मोहन सामंत व व्ही.एस. गायतोंडे यांचा समावेश होता.

         हे सर्व करीत असतानाच के.एस. कुलकर्णी यांना कलाशिक्षण क्षेत्राचे सातत्याने आकर्षण वाटत असे. त्यातून ते दिल्ली पॉलिटेक्निकच्या कलाविभागाचे व एस.पी.ए. या कलासंस्थेत सातत्याने १९४५ पासून ‘अभ्यागत व्याख्याता’ म्हणून जात असत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तरुण विद्यार्थ्यांनी चित्रकार म्हणून जगायचे ठरविले व आजचे दिल्लीतील काही प्रस्थापित चित्रकार त्यांचे हे ॠण मानतात.

         त्यांची १९७२ ते १९७८ या काळात बनारस हिंदू विद्यापीठाच्या कला व संगीत विभागाचे अधिष्ठाता म्हणून नेमणूक झाली. ते १९७२ ते १९७८ या काळात  लखनौ येथील उत्तर प्रदेश ललित कला अकादमीचे अध्यक्ष होते. त्यांनी १९७३ ते १९७८ या काळात  दिल्लीच्या केंद्रीय ललित कला अकादमीचे उपाध्यक्ष पद भूषविले. ललित कला अकादमीने १९८२ मध्ये त्यांचा ‘फेलोशिप’ देऊन गौरव केला. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे वैशिष्ट्य असलेल्या व्यक्तिचित्रणकलेतही ते पारंगत होते. त्यांनी अनेक प्रतिष्ठित खाजगी व शासकीय कलासंस्थांसाठी व्यावसायिक व्यक्तिचित्रेही रंगविली.

         त्यांनी १९४७ मध्ये लंडनमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातील कांस्यपदकासोबतच अनेक स्पर्धात्मक प्रदर्शनांत भाग घेऊन पारितोषिके मिळवली. त्यांच्या चित्रांना १९५५, १९६२ व १९६५ या वर्षी दिल्लीच्या ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.  त्यांनी १९४५ पासून देशात व परदेशांत अनेक चित्रप्रदर्शने केली. अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत त्यांचा सहभाग होता. १९४९ मध्ये लंडन येथे, १९५१ मध्ये आर्थर न्यूटन गॅलरी, न्यूयॉर्क येथे, १९५८ मध्ये फ्रान्स बोलेर गॅलरी, वॉशिंग्टन येथे, अ‍ॅटेलियर गॅलरी, कैरो येथे, बतूमल फाउण्डेशन, होनोलूलू येथे, मॉडर्न आर्ट सेंटर इंटरनॅशनल एक्झिबिशन, जपान येथे, साओपावलो बिनाले, ब्राझील येथे, १९६९ मध्ये इंडियन पेंटर्स फेडरेशन ऑफ आर्ट्स, यू.एस.ए. व १९७० मध्ये सांतागो स्प्रिंग चेंबर्स ऑफ कॉमर्स, न्यूयॉर्क येथे त्यांची त्यांतील काही महत्त्वाची प्रदर्शने झाली होती.

         त्यांच्या चित्रनिर्मितीत विरूपणात्मक चित्रे प्रामुख्याने असली तरी काही वेळा ती अमूर्त शैलीकडे जात. त्यांच्या मते, कलेतील केवळ अमूर्तता याला काहीच अर्थ नाही. ते म्हणत, ‘‘अमूर्त असं काही नसतंच. जे आपण सभोवताली पाहतो, तेच चितारतो. आपण जे काही बघतो त्याचं जेव्हा कलेत रूपांतर करतो, तेव्हा ते अमूर्त होतं. पाहिलेलंच काहीतरी कलेत अमूर्त रूप धारण करतं.’’

         त्यांच्या कलेत परंपरा व आधुनिक कलामूल्ये यांचा संकर व त्यांनी परदेशांत केलेल्या प्रवासांतून झालेल्या संस्कारांचा प्रभाव व संगम आढळून येतो. के.एस. कुलकर्णी यांच्या विचारांचा, तांत्रिक कौशल्याचा आणि त्यांच्यातील कलाशिक्षकाचा दिल्ली व बनारस येथील कलासंस्थांमधील अनेक समकालीन चित्रकारांच्या कलानिर्मितीवर प्रभाव आढळून येतो.

- सुहास बहुळकर

कुलकर्णी, कृष्ण श्यामराव