Skip to main content
x

कुलकर्णी, रमाकांत शेषगिरी

        हाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक (डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस - डी.जी.) रमाकांत कुलकर्णी यांच्याबद्दल माहिती घेताना, प्रथम गुप्तहेर कथांतील गाजलेले पात्र शेरलॉक होम्स आणि त्याचा जनक सर आर्थर कॉनन डॉयल यांची विस्तृत माहिती असणे आवश्यक आहे. कारण ‘भारताचे शेरलॉक होम्स’, असा जो त्यांचा अतिशय सार्थ गौरव का केला जातो का, हे समजण्यासाठी ही पार्श्वभूमी आवश्यक आहे. आपली अचूक निरीक्षणशक्ती आणि सुस्पष्ट तर्कसंगती यांच्या बळावर अनेक कूट प्रकरणांचा उलगडा हा कथानायक करतो.

     स्वातंत्र्यपूर्व काळातही फॉर्जेटसारखे निष्णात पोलीस अधिकारी होऊन गेले. पण रमाकांत कुलकर्णी यांनी गुन्हे संशोधनाला जे एक जवळपास परिपूर्ण अशा शास्त्राचे रूप दिले, ती त्यांची कामगिरी भारतीय गुन्हे-संशोधन क्षेत्रात युगप्रवर्तकच म्हटली पाहिजे. रमाकांत शेषगिरी कुलकर्णी यांचा जन्म कारवारमध्ये अवर्सा या ठिकाणी झाला. अंकोला येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले. तत्त्वज्ञान हा विषय घेऊन एम.ए. व  पुढे एलएल. बी. करीत असताना काही काळ ते सेंट्रल बँकेत नोकरीही करत होते.

      १९५४ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. तत्त्वज्ञान आणि कायदा या विषयांचा त्यांनी जसा कसून अभ्यास केला होता, तसाच आता गुन्हे अन्वेषण शास्त्र, गुन्हेगार आणि त्याचे मानसशास्त्र याही विषयांचा त्यांनी अभ्यास केला.

     साहजिकच मुंबई पोलीस गुन्हेगारी प्रतिबंधक शाखेचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, प्रमुख संचालक; दिल्लीच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स’ या अत्यंत महत्त्वपूर्ण संस्थेचे प्रमुख संचालक, अशी एकाहून एक वरचढ जबाबदारीची पदे त्यांच्याकडे येत गेली. १९८९ साली महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक (डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस - डी.जी.) या राज्यसरकारच्या सर्वोच्च पदावरून ते निवृत्त झाले.

      मुंबई, महाराष्ट्र आणि एकंदर देशभरात काही गुन्हेगारी प्रकरणे अतिशय गाजलेली आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान, ज्याला राजभवन म्हणून ओळखले जाते, तिथेच झालेली चोरी; लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेल्या फिरोज दारूवाला याने केलेले खून; चंद्रकला लोटलीकर नावाच्या महिलेचा प्रवासात झालेला खून; साम्यवादी पक्षाचे खासदार कृष्णा देसाई यांचा त्यांच्या अगदी बालेकिल्ल्यात  शिरून केलेला खून, अशा प्रकरणांनी त्या-त्या वेळेला जनमानसात प्रचंड खळबळ उडवून दिली होती.

      रामन राघवन या खुन्याने तर लागोपाठ अनेक खून पाडून मुंबई आणि उपनगरांमधील रहिवाशांची झोपच उडवून टाकली होती. लोक कमालीचे घाबरले होते, आणि त्यांचा पोलीस खात्यावरचा विश्वास जवळपास संपुष्टात आला होता. मराठवाड्यात, परभणी जिल्ह्यात , मानवत जादूटोणा, जारणमारण नरबळी असे गूढ प्रकार आढळल्यामुळे प्रचंड घबराट उडाली होती. ही सर्व प्रकरणे रमाकांत कुलकर्णी यांनी आपल्या निरीक्षण, निष्कर्ष, गुन्हा अन्वेषण शास्त्र, गुन्हेगार मानसशास्त्र पद्धतीने तपास करून उलगडली.

      रमाकांत कुलकर्णी यांनी आपल्या पोलीस सेवेवर तीन इंग्रजी पुस्तके लिहिली असून त्यांपैकी एकाचे ‘मागोवा’ या नावाने मराठीत भाषांतर झालेले आहे. त्यात त्यांनी वरील प्रकरणांच्या तपासकार्याच्या कथा सांगितल्या आहेत. त्यातून कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विलोभनीय पैलू ध्यानात येतो. तो असा की, गुन्हे तपासात कुलकर्णी तीव्र निरीक्षणशक्ती, तर्कसुसंगत विचार यांच्याइतकेच महत्त्व अतींद्रिय शक्तींना म्हणजे गुन्हेगाराचा जणू वास येणार्‍या ‘सहाव्या इंद्रिया’ला व परमेश्वराला देतात. विशेष अवघड तपासकाम करताना ते कुलदैवत मंगेशाची प्रार्थना करण्यात कसलाही कमीपणा मानत नाहीत. देवाने आपली प्रार्थना ऐकली व यश दिले हेदेखील ते कोणताही बुद्धिवादी आव न आणता स्पष्टपणे कबूल करतात.

      रमाकांत कुलकर्णी यांच्या कारकिर्दीचा कळस म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी हत्येचा तपास. रीतसर खटला उभा राहण्यासाठी भरपूर पुरावा हवा होता. तो गोळा करणे हे काम फार अवघड होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख समाजावर भयंकर असे खुनी हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे एकंदर सामाजिक स्थिती कमालीची बिघडली होती. या सर्वांतून मार्ग काढून, इंदिरा गांधींच्या हत्येचे कारस्थान कसे शिजले याचा सज्जड पुरावा गोळा करून न्यायालयात सादर करणे, हे काम गुन्हे तपासाच्या दृष्टीने तर अवघड होतेच; पण राजकीय व सामाजिकदृष्ट्याही कमालीचे संवेदनशील होते.

      रमाकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या आजवरच्या लौकिकाला साजेल अशाच तडफेने ते पार पाडले. शेवटी इंदिरा गांधींचे मारेकरी फासावर लटकले. अशा प्रकारे आपली कारकीर्द गाजवून १९८९ साली रमाकांत कुलकर्णी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक या पदावरून निवृत्त झाले.

- मल्हार कृष्ण गोखले

कुलकर्णी, रमाकांत शेषगिरी