Skip to main content
x

कुलकर्णी, शरद यादवराव

             रद यादवराव कुलकर्णी यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथे झाला. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भारद हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांच्या आईचे नाव यमुनाबाई.

             कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण औरंगाबाद जिल्ह्यातील भोकरदन, खुल्ताबाद या ठिकाणी, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बुलढाणा येथे झाले. त्यांना लहानपणापासून शेतीचे आकर्षण व आवड असल्यामुळे कृषी ऐच्छिक विषय घेऊन त्यांनी विशेष प्रावीण्यासह मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. अर्थातच पुढील शिक्षणासाठी कृषी विद्याशाखेची निवड करून १९६३मध्ये परभणी येथून बी.एस्सी. (कृषी) व १९६५मध्ये नागपूर येथून एम.एस्सी. (कृषी) पूर्ण केले. त्यांची १९६५मध्ये कृषी अधिकारी या पदासाठी निवड होऊन पुण्यातील कृषी महाविद्यालयात त्यांनी आपल्या नोकरीला सुरुवात केली. १९६६मध्ये कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयात त्यांची बदली झाली, तर १९६७मध्ये साहाय्यक प्राध्यापक अशी पदोन्नती होऊन अकोला येथे बदली झाली. १९७२मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे साहाय्यक कुलसचिव व नंतर १९७३मध्ये जालना येथे प्राचार्य ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात कार्य करून ते १९७८मध्ये डॉ पं.कृ.वि.त आले.

             शरद कुलकर्णी यांची कृषी विज्ञानकेंद्र स्थापनेमुळे कोलंबो योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी निवड होऊन १९७४मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये पाच महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी १९७४ ते १९७७ या काळात डॉ. पं.दे.कृ.वि.त साहाय्यक कुलसचिव म्हणून यशस्वीपणे कार्य केले. त्यांना १९७७ ते १९८१ या काळात पीएच.डी. पदवी अभ्यासक्रमासाठी भा.कृ.अ.सं.त प्रतिनियुक्तीवर पाठवले. त्यांच्या ‘भारतातील कृषी विद्यापीठाचे संस्थात्मक वातावरण व शैक्षणिक उत्कृष्टता’ या प्रबंधाची उत्कृष्ट संशोधन प्रबंध म्हणून दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिसंवादात सादरीकरणासाठी निवड झाली, तसेच राष्ट्रीय समाजशास्त्रीय संशोधन परिषदेकडून पुस्तक प्रकाशनासाठी या प्रबंधाची निवड झाली.

             समाजशास्त्र व वृत्तपत्रविद्येची आवड असल्यामुळे डॉ.कुलकर्णी यांनी १९६७मध्ये बी.ए. (समाजशास्त्र) व १९८०मध्ये वृत्तपत्रविद्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. ते १९८१मध्ये अकोला येथील कृषी विद्यापीठात प्रथम सहयोगी प्राध्यापक व त्यानंतर विभागप्रमुख म्हणून विस्तारशिक्षण विभागात कार्यरत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधनासाठी मार्गदर्शन केले. कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांसाठी लिहिलेले मार्गदर्शनपर व संशोधनपर लेख मान्यताप्राप्त नियतकालिकांत प्रकाशित झाले. त्यांची ‘इन क्वेस्ट ऑफ अ‍ॅकॅडमिक एक्सलन्स’ व ‘टिप्स फॉर थिसिस राइटिंग’ ही पुस्तके प्रकाशित झाली. याबरोबर भा.कृ.अ.सं., दिल्ली येथे पीएच.डी. पदवीसाठी तयार केलेला शोधनिबंध पुस्तकरूपात प्रकाशित झाला आहे. कुलकर्णी यांचा कृषी विस्तार व विकासातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडून विदर्भ वैधानिक विकास मंडळावर ३ वर्षांसाठी (१९९२-१९९५) त्यांची कृषितज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्याच्या संदर्भात कृषिविज्ञान मंडळाचा घटक, भारत कृषक समाज प्रकल्प, लेखन मार्गदर्शन, शेतकरी सत्र, शिवार फेरी, राष्ट्रीय स्तरापासून जिल्हा पातळीवर कृषिविभाग, वनविभाग कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षणाचे यशस्वीरीत्या केलेले आयोजन यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. डॉ.कुलकर्णी सप्टेंबर १९९९मध्ये सेवानिवृत्त झाले. नंतर जागतिक बँकेने पुरस्कृत केलेल्या व महाराष्ट्र राज्य, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राबवलेल्या जलस्वराज्य प्रकल्पात समाजप्रवर्तक तज्ज्ञ म्हणून त्यांनी ग्रामीण भागात अत्यंत यशस्वीरीत्या दोन वर्षे कार्य केले. य.च.म.मु.वि., नाशिक येथील पीएच.डी. पदवीसाठी मान्यताप्राप्त मार्गदर्शक असून; गृहशास्त्र, गृह-अर्थशास्त्र, तसेच कृषी व्यवस्थापन; या विषयांतर्गत प्रबंध मार्गदर्शनाचे कार्य सुरू आहे.

- डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

कुलकर्णी, शरद यादवराव