Skip to main content
x

कुलकर्णी, वामन लक्ष्मण

     वा.ल.कुलकर्णी यांचा जन्म खानदेशात चोपडे येथे झाला. त्यांचे इंटरमीजिएटपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले आणि पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात पार पडले. १९३३ मध्ये ते बी. ए. (इंग्रजी) तर १९३५ मध्ये एम. ए. (मराठी) उत्तीर्ण झाले. एम.ए.च्या परीक्षेत मराठी विषयात प्रथम आल्यामुळे त्यांना ‘चिपळूणकर मराठी पारितोषिक’ मिळाले. ते मुंबईच्या छबिलदास हायस्कूलमध्ये शिक्षक होते. १९३६ पासून १९४४ पर्यंत त्यांनी विल्सन हायस्कूलमध्ये अध्यापन केले. १९४४ पासून १९५९पर्यंत विल्सन महाविद्यालयात प्राध्यापकी करून त्यानंतर मराठवाडा विद्यापीठ व मुंबई विद्यापीठ येथे प्राध्यापक पदावर आणि विभाग प्रमुख पदावर काम करून १९७६ साली ते सेवानिवृत्त झाले.

     १९४० साली ‘समीक्षक’चे संपादक असलेल्या  कुलकर्णींनी ‘अभिरुची’, ‘सत्यकथा’, ‘छंद’ यांसारख्या वाङ्मयीन नियतकालिकांतूनही सातत्याने समीक्षा-लेखन केले. समीक्षात्मक लेखनाचे त्यांचे एकूण आठ संग्रह आहेत. शिवाय श्री.कृ.कोल्हटकर, ह.ना.आपटे, न.चिं.केळकर यांच्या वाङ्मयासंबंधी स्वतंत्र ग्रंथ लिहिले. ‘वाङ्मयातील वादस्थळे’ (१९४६), ‘वाङ्मयीन मते आणि मतभेद’ (१९४९), ‘वाङ्मयीन टिपा आणि टिप्पणी’, ‘वाङ्मयीन दृष्टी आणि दृष्टीकोन’ (१९५९), ‘साहित्य आणि समीक्षा’ (१९६३), ‘साहित्य : शोध आणि बोध’ (१९६७), ‘साहित्य: स्वरूप आणि समीक्षा’ (१९७५), ‘मराठी कविता: जुनी आणि नवी’ (१९८०) अशा लेखनातून त्यांच्या गंभीर, सखोल व चिकित्सक दृष्टीचा प्रत्यय येतो. वामन मल्हार जोशी यांच्या ‘वाङ्मय दर्शन’चे अतिशय महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. डॉ. एम. फॉर्स्टर यांच्या समीक्षेने आपल्या समीक्षावृत्तीला दिशा गवसल्याचे कुलकर्णींनी नमूद केले आहे.

तात्त्विक समीक्षेचा पहिला टीकाकार-

     ‘आमच्या पिढीवर त्यांच्या समीक्षेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार तर मोठा आहेच, पण एकूणच मराठी समीक्षेला वा. लं. च्या समीक्षेने नवी दृष्टी दिली’ असे प्रा. रमेश तेंडुलकरांनी म्हटले आहे. ‘तात्त्विक स्वरूपाची गंभीरपणे समीक्षा लिहिणारे मराठीतले पहिले टीकाकार’ असे वा. लं. विषयी श्री. पु. भागवत यांनी प्रशंसोद्गार काढले आहेत. अध्यापन आणि समीक्षा या दोन क्षेत्रांची सांगड घालणार्‍या कुलकर्णींनी समीक्षेला स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करून दिली यात शंका नाही. सौंदर्यग्राही रसिक, चिंतक अशा या समीक्षकात एक शिस्त, टापटीप असे आणि समीक्षा हा एक विकसनशील परिवर्तनीय असा साहित्य प्रकार आहे, याची जाण असे.

     नव्या आविष्काराचे स्वागत करून त्याचे स्वरूप लक्षात घेणारे कुलकर्णी हे मर्ढेकरांच्या ‘वाङ्मयीन महात्मता’ लेखमालेतील मीमांसेने अस्वस्थ होत. कुलकर्णींनी इंग्रजी व मराठी विषयांचा, त्यांच्या भिन्न परंपरांचा अभ्यास केला होता. कुलकर्णींचे बंधू वास्तुकला-विशारद होते व स्वतः कुलकर्णींना चित्रकला आणि मूर्तिकला याची आवड होती. वाङ्मय ज्या विविध रूपांतून अवतरते, त्या रूपांशी संबंध असलेल्या प्रश्नांचा विचार त्यांना अतिशय जिव्हाळ्याचा वाटे. समीक्षात्मक आणि सर्जनशील अशा दोन्ही प्रकारच्या ग्रंथांचे वाचन समीक्षकाने केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. आशय व अभिव्यक्ती यांची एकरूपता त्यांनी हिरिरीने प्रतिपादित केली. आकृतीवादी समीक्षेचा त्यांनी स्वीकार केला नाही, तथापि कलेसंबंधीच्या अनेकविध संकल्पनांची चिकित्सा करून त्या अनुषंगाने कलावंताचे चारित्र्य, श्‍लील-अश्‍लीलतेचा प्रश्न, सत्य-शिव-सुंदर या संकल्पना व श्रेष्ठ साहित्यकृतीचे स्वरूप यांचा विचार व्हावा, अशी कुलकर्णींची वाङ्मयीन भूमिका होती. तात्त्विक, ऐतिहासिक आणि उपयोजित अशा समीक्षेच्या त्रिविध अंगांबाबत त्यांना सारखाच रस होता. नवसाहित्याच्या समीक्षेच्या संदर्भात कुलकर्णींची कामगिरी प्रेरक आणि मोलाची आहे.

     सुधीर रसाळ, सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष ही त्यांच्या हाताखाली पीएच.डी. केलेल्यांची नावे आहेत. विजया राजाध्यक्ष यांनी ‘संवाद’ या ग्रंथात कुलकर्णींची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध केली आहे. लेखकाप्रमाणेच समीक्षकालाही त्याच्या काळाची संवेदनशीलता लाभते. म्हणून तो नंतरच्या पिढीविषयी समरसतेने लिहू शकत नाही, असे त्यांचे मत होते. वाचन करताना स्वतःसाठी काढलेली त्यांची टिपणे मुळात सुलेखन आणि सौंदर्यदृष्टी यांचा एक अप्रतिम नमुना आहे. ३९ व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात  टीका शाखेचे अध्यक्ष (१९५७), तसेच ४० व्या संमेलनात कथा  शाखेचे अध्यक्ष (१९५८) व हैद्राबाद येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. अमेरिकन सरकारच्या निमंत्रणावरून कुलकर्णींनी अमेरिकेतील विद्यापीठे, नाट्यसंस्था, कलाकेंद्रे इत्यादींना भेट देण्यासाठी प्रवास केला (१९६५).

     उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ म्हणून त्यांच्या ‘वाङ्मयीन टीपा आणि टिप्पणी’ व ‘श्रीपाद कृष्ण वाङ्मयदर्शन’ या कृतींना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली आहेत. 

     २५ डिसेंबर १९९१ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

 - वि. ग. जोशी

कुलकर्णी, वामन लक्ष्मण