Skip to main content
x

कुलकर्णी, विनायक गोपाळ

     विनायक गोपाळ कुलकर्णी हे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र या विज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचे संस्थापक - संचालक होते. बेळगावला जन्मलेल्या कुलकर्णींचे शालेय शिक्षण बेळगाव, धारवाड आणि रत्नागिरी अशा तीन ठिकाणी झाले. शाळेत अत्यंत हुशार असलेल्या कुलकर्णींना लहानपणी अभ्यासासाठी जसे उत्तेजन मिळाले, तसे खेळासाठीही मिळायला हवे होते, असे प्रौढपणी नेहमीच वाटत राहिले. यामुळेच की काय, सुदृढ आरोग्यासाठी खेळ हवेत आणि शिक्षण हे खेळाचा समावेश असलेले सर्वांगीण हवे, असे कुलकर्णी कटाक्षाने सांगत. 

     भाषा आणि विज्ञान या दोन्हींवर प्रभुत्व असलेल्या कुलकर्णींनी महाविद्यालयीन शिक्षणात विज्ञानाला पसंती दिली. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून बी.एस्सी. परीक्षेत ते विद्यापीठातून पहिले आले आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये संशोधनवृत्ती मिळवून त्यांनी प्रवेश केला. तो काळ टाटा संस्थेचा, भारतातील भौतिकशास्त्रीय आणि वैज्ञानिक संशोधनाचा आणि एकूणच राष्ट्र उभारणीचा होता. त्या काळचे वैज्ञानिक विज्ञानाकडे एक ‘करिअर’ म्हणून नाही, तर राष्ट्र उभारणीचे महत्त्वाचे अंग म्हणून पाहत असत. लवकरच एम.एस्सी.साठीचे संशोधन पूर्ण करून कुलकर्णी संस्थेच्या अणु भौतिकी विभागात स्थिर झाले. प्रा.बी.व्ही. ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘बीटा’ किरणांच्या ध्रुवणावर महत्त्वाचे संशोधन केले. इलेक्ट्रॉन या मूल कणांच्या, त्यांच्याइतकेच वस्तुमान, परंतु धन विद्युतभार असलेल्या, प्रतिकणाला पॉझिट्रॉन म्हणतात. पॉझिट्रॉन कणाच्या अन्य द्रव्याशी होणाऱ्या आंतरक्रियेवर जगात नव्याने संशोधन चालू झाले होते. भारतात या विषयावर संशोधन करणाऱ्या पहिल्या गटातील  प्रा. कुलकर्णी हे आघाडीचे संशोधक होते. कॅनडातील क्वीन्स विद्यापीठात अभ्यागत संशोधक म्हणून त्यांनी काम केले.

     १९६७-६८ सालांच्या सुमारास वि. गो. कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील  शिक्षणासाठी प्रशिक्षण वर्गात भाग घ्यायला सुरुवात केली. त्यांची विज्ञान शिक्षणातील रुची आणि सहभाग वाढतच गेला. टाटा संस्थेसारख्या जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थेतील वैज्ञानिकांनी सामाजिक बांधीलकी मानून सर्वसामान्यांसाठी विज्ञान शिक्षण सुरू केले आणि या प्रयत्नांचे  कुलकर्णी  सुरुवातीपासूनचे प्रमुख होते. दोराबजी टाटा ट्रस्टने केंद्राला आर्थिक पाठबळ दिले.

     या दरम्यान जागतिक स्तरावर मान्यता मिळत असलेल्या आपल्या संशोधनाला आणखी पुढे नेण्याची संधी कुलकर्णींकडे चालून आली होती. क्वीन्स विद्यापीठाने त्यांना अभ्यागत प्राध्यापक म्हणून दीर्घमुदतीकरिता आमंत्रण दिले होते. पण ते न स्वीकारता, प्रा. कुलकर्णींनी विज्ञान शिक्षणाला संपूर्णपणे वाहून घेण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रयत्नांत प्रा.कुलकर्णी यांना टाटा संस्थेचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. भा. मा. उदगावकर यांचे सातत्याने मार्गदर्शन होत आले. १९८१ साली होमी भाभा केंद्र हा प्रकल्प न राहता, टाटा संस्थेचा एक विभाग बनला आणि १९८७ साली ते संस्थेचे एक केंद्र बनले. १९९२ साली केंद्राला मानखुर्द येथे स्वत:ची भव्य वास्तू प्राप्त झाली. या वास्तूच्या उभारणीसाठी प्रा. कुलकर्णी यांनी जिवापाड मेहनत केली. १९९४ साली ते केंद्राचे संचालक म्हणून निवृत्त झाले.

    विज्ञान कसे शिकवावे, प्रयोग कसे करावेत, पुस्तके कशी असावीत यांवर प्रत्यक्ष वर्गातील अनुभवाधारित संशोधन प्रकल्प प्रा.कुलकर्णी यांनी हाती घेतले. खिरोदा, जि. जळगाव येथील ग्रमीण शाळांतील विज्ञान शिक्षण, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादी प्रकल्पांतून त्यांनी विज्ञान शिक्षणाच्या नव्या पद्धती विकसित केल्या. चांगल्या विज्ञान शिक्षणासाठी भाषेचे संवर्धन महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या संशोधनातील एक मुख्य सूत्र होते. भाषा आणि विज्ञान यांतील परस्परपूरक नाते शोधण्याचा प्रयत्न त्यांच्याएवढा दुसऱ्या कुणी क्वचितच केला असेल. शिक्षक बहुतकरून क्रमिक पुस्तकावरून शिकवतात हे हेरून त्यांनी विज्ञान पुस्तकाची भाषा सोपी करून त्याचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेच्या उच्च प्राथमिक स्तरावरच्या १०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ही पुनर्लिखित पुस्तके वापरण्यास देण्यात आली. वर्षभर चाललेल्या या प्रकल्पाने पुस्तकाची भाषा सोपी केल्यास मुलांचे आकलन सुधारते शिवाय शिक्षक आणि विद्यार्थी यांचा वर्गातील संवादही सुधारतो, असे  त्यांनी दाखवून दिले.

     महापालिकेच्या शाळेतील अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांनी एक वेगळा प्रकल्प घेतला. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतून आलेले हे विद्यार्थी उच्चवर्णीय घरांतील विद्यार्थ्यांना घरून जे पाठबळ असते, त्याला पूर्णपणे वंचित असतात. अशा विद्यार्थ्यांना आठवड्यातून फक्त एकदा, परंतु नियमितपणे होमी भाभा केंद्रात बोलावले जाई. त्यांना वाचायला, वाचनालयातून संदर्भ शोधायला, गणिते सोडवायला, बोलायला, अगदी मोठ्या शास्रज्ञांशी चर्चा करायला, फावल्या वेळेचा सदुपयोग करायला, मदत केली जाई. प्रत्येक विद्यार्थी आठवीपासून दहावीपर्यंत तीन वर्षे सातत्याने आठवड्याला ३-४ तास केंद्रात घालवत असे. तीन वर्षांच्या कालावधीच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासात, अभ्यासाच्या क्षमतेत, संवाद कौशल्यात, महत्त्वाकांक्षेत लक्षणीय फरक दिसून आला. त्यांची सरासरी शैक्षणिक संपादन पातळी उच्चवर्णीय विद्यार्थ्यांच्या सरासरी पातळीइतकी उंचावली.

     या विद्यार्थ्यांना घरून मिळत असलेल्या मदतीप्रमाणेच मदत मिळाली, तर सरासरी संपादन पातळीत उच्चवर्णीय व मागासलेले विद्यार्थी असा फरक राहत नाही, असे या प्रयोगाने दाखवून दिले. या प्रयोगाला जागतिक परिमाण होते. कारण त्या काळी अमेरिकेत कृष्णवर्णीय व श्वेतवर्णीय यांच्या उपजत बुद्धिमत्तेतच फरक असतो आणि त्यामुळेच कृष्णवर्णीय मागासलेले असतात, असे मानसशास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध करण्याचा प्रयत्न चालू होता. याचेच प्रतिबिंब आपल्याकडे उच्चवर्णीय व मागासलेले विद्यार्थी यांच्या बुद्धिमत्तेत जन्मत:च फरक असतो, या समजुतीत दिसून येत होते.

     प्रा. कुलकर्णी पीएच.डी.चे मार्गदर्शक होते. त्यांच्या एका विद्यार्थिनीने शालेय विद्यार्थ्यांना रासायनिक संज्ञांचे व समीकरणांचे वास्तविक आकलन कितपत असते व ते कसे सुधारता येईल, यावर संशोधन केले, तर दुसऱ्या विद्यार्थिनीने विद्यार्थिनींच्या, विशेषत: ग्रमीण भागातील, व्यवसाय निवडीविषयी संशोधन केले. सातवी-आठवीपर्यंत स्वत:च्या भावी व्यवसायासंबंधी मोठी स्वप्ने पाहणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी पुढे परिस्थितीशी जुळते घेऊन स्वत:च्या अपेक्षांच्या बाबतीत कशी तडजोड करतात, हे या संशोधनातून स्पष्ट दिसून आले. आपल्या संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षाचा उपयोग समाजाला कसा होईल, त्यांचा वापर मोठया प्रमाणात कसा करता येईल, याचा प्रा. कुलकर्णी सातत्याने विचार करीत असत.

    निवृत्तीनंतर त्यांनी लेखनाकडे लक्ष केंद्रित केले. ‘लोकसत्ता’ या दैनिकात त्यांनी ‘तिसरे पाऊल’, ‘संधिप्रकाश’ या साप्ताहिक लेखमाला डॉ. बाळ फोंडके यांच्या सहकार्याने लिहिल्या. नंतर ‘अनोखा उंबरठा’ आणि ‘संस्कार’ या साप्ताहिक लेखमाला स्वतंत्रपणे लिहिल्या. त्यांनी खास मुलांसाठी ‘गाथा शोधांची’ हे दैनिक सदर डॉ. बाळ फोंडके आणि डॉ.अंजली कुलकर्णी यांच्या सहकार्याने चालवले. यातील प्रत्येक लेखमाला वर्षभर चालणारी होती. ‘गाथा शोधांची’ला प्रचंड लोकप्रियता लाभली. ‘गाथा शोधांची’नंतर ‘गाथा मुहूर्तमेढीची’ या वर्षभर चाललेल्या सदराला तशीच लोकप्रियता मिळाली. त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाची भाषा अत्यंत सोपी आणि ओघवती असे. परिचित उदाहरणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. श्रोतृवर्गाच्या क्षमतेचा आणि मन:स्थितीचा अंदाज घेऊन भाषा लवचीकपणे वापरण्याचे कसब त्यांनी कमावले होते. मनुष्याचे भाषिक कौशल्याच्या विकासाचे ठळक टप्पे असतात आणि त्यांतील सर्वांत प्रगत टप्पा असतो तो गणिती, तार्किक भाषेचा, असे ते मानत.

     त्यांचे साठहून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेल्या व संपादन केलेल्या पुस्तकांची संख्या तीस आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, मुंबई, पुणे, पाँडीचेरी विद्यापीठे, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इत्यादी संस्थांतून त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेचे नियामक मंडळ यांचे ते सदस्य होते. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते संस्थापक सदस्य होते. मराठी विज्ञान परिषदेचे ते उपाध्यक्ष आणि तेविसाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना १९८५-८७ सालचा गोवर्धनदास पारीख पुरस्कार मिळाला होता.

     - प्रा. हेमचंद्र प्रधान

कुलकर्णी, विनायक गोपाळ