Skip to main content
x

कुंभार, रत्नाप्पाण्णा भरमाप्पा

     देशप्रेम, लोकसेवा, त्याग आणि उच्च ध्येयासक्ती, अविरत श्रमसाधनेतून भारताच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रात उदयास आलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे पद्मश्री रत्नाप्पा कुंभार होत. रत्नाप्पाण्णा कुंभार सर्वत्र ‘अण्णा’ नावाने ओळखले जात असत.

     रत्नाप्पाण्णा भरमाप्पा कुंभार यांचा जन्म कोल्हापूर तालुक्यातील शिरोळा तालुक्यातील निमशिरगाव येथे एका कुंभार कुटुंबात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. परंतु, लहानपणापासून ध्येयवादी व जिद्दी असलेल्या अण्णांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपला विकास साधला.

     अण्णा 1932 मध्ये विवाहबद्ध झाले. त्यानंतर ते 1933 मध्ये बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी कायद्याची पदवीही मिळवली. परंतु ते प्रपंच करण्यात गुंतून पडले नाहीत तर त्यांच्या तरुण मनाला स्वातंत्र्य चळवळीचे वेध लागले होते. देश पारतंत्र्यातून मुक्त करावा हा ध्येयवाद त्यांच्यापुढे होता. त्या काळात कोल्हापूर संस्थानात उभ्या राहिलेल्या प्रजापरिषद चळवळीचे ते संस्थापक सरचिटणीस होते. जनजागृतीसाठी दौरे काढणे, भाषणे देणे, शेतकरी मेळावे घेणे, मोर्चे काढणे या चळवळीत अण्णा आघाडीवर होते. त्यांनी 1942 च्या चळवळीत स्वातंत्र्य सेनानी म्हणून उडी घेतली. तसेच, त्यांनी भूमिगत राहून महाराष्ट्रभर दौरे केले.

     भारताची राज्यघटना तयार झाल्यानंतर देशाच्या पुनर्रचनेचे कार्य पूर्ण होणार होते. तेव्हा रत्नाप्पाण्णा कुंभार यांना घटना समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग त्यांनी आपले विचार ठामपणे मांडण्यासाठी केला. राज्यघटना ही देशाच्या भविष्यकालीन प्रवासाची ब्ल्यूप्रिंट असते. त्या राज्य घटनेच्या मूळप्रतीवर स्वाक्षरी करण्याचे भाग्य त्यांना लाभले.

     स्वातंत्र्योत्तर काळातील माणसाची दयनीय स्थितीच अण्णांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा ठरली. त्या काळात स्वातंत्र्य चळवळी इतकीच सहकार चळवळही अग्रेसर होती. स्वातंत्र्य चळवळीचे उद्दिष्ट राजकीय स्वातंत्र्य हे होते व आहे. दोन्ही चळवळीचे अंतिम उद्दिष्ट सुराज्य हेच होते. हे लक्षात घेऊन त्यांनी जाणीवपूर्वक सहकाराला संस्काराची जोड दिली. ‘विना संस्कार नही सहकार’ हे ब्रीद त्यांनी सहकार क्षेत्रात काम करणार्‍या आपल्या सहकार्‍यांना व कार्यकर्त्यांना दिले. त्यांनी 6 डिसेंबर 1963 रोजी कोल्हापूर जिल्हा शेतकरी, विणकरी सहकारी सूत गिरणी मर्या. ची स्थापना यड्राव-इचलकरंजी येथे केली. त्यांनी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्षपदी भूषविले होते.

     शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या कणाच होता. तो कमजोर राहिला तर देशाची अर्थव्यवस्थादेखील कोलमडेल म्हणून अण्णांनी शेती विकासाच्या प्रश्नाकडेही प्रकर्षाने लक्ष दिले. कृषी औद्योगिक समाजनिर्मितीचे स्वप्न साकार करणे हे आर्थिक सुबत्ता प्राप्त करण्यासाठी आवश्यक होते. शेतीचे आधुनिकीकरण आणि जलसिंचनाच्या सोयी निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी 1955 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा सहकारी साखर कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली. कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिला सहकारी साखर कारखाना होय. त्यांनी केवळ एक एकर जमीन असलेल्या शेतकर्‍यांनाही साखर कारखान्याचे सभासद करून घेण्याचे विशेष काम केले. तसेच या कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सावकाराच्या विळख्यातून सोडवून आर्थिक पाठबळ दिले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मनात त्यांच्या विषयीचा आदर भावना वाढीला लागली. गरीब माणसाचे कल्याण, हेच सहकाराचे अंतिम ध्येय होय, या भावनेनेच त्यांनी सहकार चळवळ वाढविली.

     अण्णांनी कोरडवाहू जमिनीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची योजना आखली. त्यांनी कोरडवाहू शेतकर्‍यांचे दैन्य दूर करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची उपसा-सिंचन योजना निमशिरगाव येथे चालू केली. त्यातून आजूबाजूच्या आठ गावातील दहा हजार एकरात कोरडवाहू शेतजमिनीवर हरितक्रांती घडवून आणण्याचे कार्य साधले गेले. निमशिरगाव उपास-सिंचनाचा प्रयोग सफल झाल्यानंतर अण्णांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व कोल्हापूर जिल्ह्याला सर्वांगीण विकास घडविणारा काळम्मावाडी धरणाचा प्रकल्प हाती घेतला. तसेच त्यांनी 6 ऑगस्ट 1961 मध्ये पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या हितासाठी पंचगंगा सहकारी कामगार सोसायटीची स्थापना केली. अण्णांनी 24 जानेवारी 1963 रोजी अनुक्रमे ‘कोल्हापूर जनता सेंट्रल को-ऑप. कंझ्युमर्स स्टोअर्स लि., व इचलकरंजी सेंट्रल कंझ्युमर्स स्टोअर्स लि., ची स्थापना केली. यामागचा मूळ हेतू चांगल्या प्रतीच्या जीवनावश्यक वस्तू वाजवी किंमतीत ग्राहकांपर्यंत व गोरगरीब जनतेपर्यंत सहजतेने पोहोचवणे हा होता. या दुकानांमधून ग्राहकांना जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी अण्णांनी प्रयत्न केला. त्यांनी 1995 पर्यंत जनता बझार, कोल्हापूर जनता सेंट्रल कंझ्युमर्स स्टोअर्सच्या 50 शाखा सहकाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी पोहचविल्या. जनता बझार तर आशिया खंडातील सर्वोत्कृष्ठ बझार ठरला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते 23 मार्च 1976 रोजी काळम्मावाडी धरण प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभ झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील भाग्योदायिनी काळम्मावाडी धरण प्रकल्पाधारे पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा इ. नद्यांवर साधारणपणे 49 उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या. त्यांनी या उपसा सिंचन योजनांद्वारे त्या भागातील अंदाजे 56 हजार एकच जमीन ओलिताखाली आणून, खर्‍या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यात हरितक्रांती घडवून आणली.

     शिक्षणातून राष्ट्रीय भावना बळावत गेली पाहिजे व राष्ट्रीय एैक्याच्या धाग्याने सर्वांची मने बांधली पाहिजेत, असा शिक्षाणाच्या ध्येयाविषयीचा दृष्टिकोन अण्णांनी व्यक्त केला. त्यांनी स्थापन केलेली कौन्सिल ऑफ एज्युकेशन ही संस्था गेली 75 वर्षे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे.

     या संस्थेच्या वतीने 1931 मध्ये शहाजी कायदे महाविद्यालयाची स्थापना; 1957 मध्ये दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार वाणिज्य महाविद्यालय  व 1971 मध्ये कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. ही तीनही महाविद्यालये शैक्षणिक योगदानाचे कार्य करीत आहेत. महाराष्ट्रातील ज्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यात देणग्या न घेता कार्य करणारी ही कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्था ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. याप्रमाणेच 13 जून 1963 रोजी रत्नदीप हायस्कूल, गंगानगर-इचलकरंजी स्थापना, 27 जुलै 1972 रोजी पुणे येथे श्री संत शिवगंगा देवी ट्रस्ट हायस्कूलची स्थापना, तसेच उमरखेड, नागपूर येथेही त्यांच्या नांवे शैक्षणिक संस्था चालू आहेत. पंचगंगा साखर कारखान्याच्या परिसरातील शाळांना कारखान्याच्या वतीने आर्थिक मदत, ग्रंथ, गणवेश इ. स्वरुपाची मदत केली जाते.

    त्यांनी साक्षर समाजाला सुसंस्कारी बनविण्याचे एकमेव साधन ‘ग्रंथालय’ असते, हे ओळखून ग्रंथालय चळवळीकडेही साक्षेपी लक्ष पुरविले. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीच्या विकासास अण्णांचे फार बहुमोल सहाय्य झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक ग्रंथालयांना त्यांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यात गाव ते ग्रंथालय, ही योजना राबवून प्रत्येक गावी ग्रंथालय सुरू करण्याची चळवळ त्यांनी यशस्वीपणे राबविली आहे. ग्रंथालयांना इमारती बांधून देणे, निवडक ग्रंथ देणे इ. कामे केली. गंगानगर सार्वजनिक वाचनालय, म.गांधी ग्रंथालय कोल्हापूर ही कोल्हापूर जिल्ह्यातील नावाजलेली ग्रंथालये होत. पंचगंगा सहकारी साखर कारखान्यास प्रतिवर्षी होणार्‍या नफ्यातून काही हिस्सा ते ग्रंथालये व शाळा, महाविद्यालये यांसाठी देत. आज जवळजवळ 170 ग्रामीण वाचनालये सुरू आहेत. या सर्व उपक्रमांमागे अण्णांची विधायक दृष्टी होती. ज्ञान, विज्ञान शेतकर्‍यांच्या दारापर्यंत नेऊन पोहचविण्याचे अजोड कार्य अण्णांनी आयुष्यभर निष्ठेने केले.

    अण्णांनी 1936 पासून आपल्या राजकीय जीवनाला प्रारंभ केला. तो प्रजापरिषदेच्या सरचिटणीस पदावर राहून 1945 मध्ये जयपूर येथील अधिवेशनात सरदार वल्लभभाई पटेल यांनी अण्णांनी दक्षिणेकडील संस्थाने विलिनीकरणाचे केलेल्या कार्याचे कौतुक करून अण्णांची घटना समितीच्या सुकाणू समितीचे सदस्य आणि हंगामी संसदेचे खासदार म्हणून नियुक्ती केली. कोल्हापूर प्रजा परिषदेचे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमध्ये रूपांतर झाल्याबरोबर अण्णांची जिल्हा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत डिसेंबर 1949 मध्ये निवड झाली. अण्णा 1950 ते 1952 या काळात खासदार व घटना समितीचे सदस्य होते.

    अण्णा महाराष्ट्राच्या विधानसभेचे शेवटपर्यंत सदस्य होते. त्यांनी 1974 मध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्रीपद; 1975 मध्ये महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री; 1978 मध्ये नगरविकास मंत्री; 1995 मध्ये विधानसभेचे हंगामी सभापती अशी महत्त्वाची खाती सांभाळली. अण्णांच्या या कार्याचा गौरव व संघटन कौशल्याचा पक्षाला फायदा व्हावा व पक्ष संघटना बळकट व्हावी म्हणून 1983 मध्ये त्यांची प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

     अण्णांनी 1936 पासून 1997 पर्यंत केलेले राष्ट्रीय कार्य, प्रजा परिषदेच्या माध्यमातून केलेली चळवळ, घटना समितीचे सदस्य, दलितक्रांतीची चळवळ, कृषि-औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्य, खासदार, आमदार, मंत्री इ. पदे भूषवून केलेल्या नि:स्वार्थी समाजसेवेचा गौरव म्हणून भारत सरकारने 26 जानेवारी 1985 रोजी ‘पद्मश्री’ पदवी; 27 मार्च 1987 रोजी पुणे विद्यापीठाकडून सहकारातील गौरवाप्रित्यर्थ ‘डि.लिट’ सन्मानदर्शक पदवी; 15 सप्टेंबर 1970 रोजी तासगांव कुंभार समाज जि. सांगली मानपत्र; 1996 रोजी 87 व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर महानगरपलिकेचे मानपत्र; 1984 मध्ये अमृतमहोत्सवानिमित्त अमृत महोत्सव गौरव समिती इचलकरंजी यांनी दिलेले ‘मानपत्र’ अशी मानपत्रे व सन्माननीय पदव्या देऊन अण्णांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केलेला आहे.

- प्रा. प्रकाश कुंभार

कुंभार, रत्नाप्पाण्णा भरमाप्पा