Skip to main content
x

कुंटे, भगवान गणेश

      युष्याची उणीपुरी ७८ वर्षे सातत्याने कार्यरत असणे हा विशेष गुण डॉ. भगवान गणेश कुंटे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जोपासला. त्यांचे मूळ घराणे कोकणातील कणकवली येथील होते. त्यांचे शिक्षण ब्रिटिश अमदानीत झाले. त्यांनी रुईया महाविद्यालयातून १९४७ ते १९४९ या काळात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी उमेदीच्या काळातच लेखन व वाचन सुरू केले. ललित साहित्य वा रहस्यकथांपासून अर्थशास्त्रापर्यंत, इतिहासापासून नाट्यलेखनापर्यंत त्यांना कोणतेही क्षेत्र अस्पर्शित नव्हते. त्यांच्या एकूण साहित्यनिर्मितीत अनुवाद हा विशेष भाग आहे. त्यांनी १९५० मध्येच अर्थशास्त्रात पीएच.डी.आणि पुढे इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. शासनाच्या दर्शनिका (गॅझेटिअर) विभागात सहसंपादक म्हणून ते नियुक्त झाले. १९६९ पासून १९८१ पर्यंत कार्यकारी संपादक व सचिव म्हणून ते कार्यरत होते. या काळात संपादनाचे मोठे काम झाले. जिल्हा गॅझेटिअर व स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश यासारख्या मालिकेतील त्यांचे काम उल्लेखनीय राहिले.

त्यांनी आयुष्याच्या पूर्वार्धात ठाणे, मुंबई परिसरात काम केले असले, तरी उत्तरार्धात बराच काळ अमेरिकेत शिकागो, नॅशव्हील, मिडल्सवरो यासारख्या ठिकाणी त्यांचे वास्तव होते. त्यांनी एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका शिकागो येथे १९९२ ते १९९४ या काळात साहाय्यक संपादक म्हणून काम पाहिले. त्यांनी पुढील दोन वर्षे नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये सहकारी प्राध्यापक म्हणून काम केले. चौफेर वाचन, लेखन व भटकंतीचा छंद जपला. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील बहुतांश गडकोटांची भ्रमंती केली, तसेच विदेशातही भरपूर प्रवास केला.

दिसामाजी काही तरी ते लिहावे !

प्रसंगी अखंडित वाचीत जावे!

हे समर्थ रामदासांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले होते. त्यांची लेखणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबली नाही. त्यांनी अनेक संकल्प सोडले. त्यात मनाचे श्लोक’ह्यांचा इंग्रजी अनुवाद पूर्ण झाला. ज्ञानेश्वरीदासबोधयांच्या अनुवादाचे काम अखेरपर्यंत सुरू होते. त्यांनी ऐन उमेदीत सुरू केलेल्या लेखनाला यशवंतराव चव्हाणांचा पुरस्कार लाभला. आपले छत्रपती’ (१९६०) या पुस्तकाच्या निमित्ताने प्रादेशिक वा राष्ट्रीय अभिनिवेशास बळी न पडता इतिहासकाराने सत्य, स्पष्ट व निःपक्षपातीपणे सांगितले पाहिजे, असे नोंदवून आपले छत्रपती सन १६०० ते १७४०हा ग्रंथ या कसोटीला उतरतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा ग्रंथ त्यांनी सेतुमाधवराव पगडी व न..फाटक यांना अर्पण केला.

सर वूल्स्ले हेग यांनी बुरहाने मासीरया सय्यद अली तबातबाने लिहिलेल्या मूळ फार्सी ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले व १९६२मध्ये डॉ. कुंटे यांनी त्याचा मराठी अनुवाद केला. याही वेळी ‘‘हे पुस्तक महाराष्ट्राच्या मध्ययुगीन कालखंडावर प्रकाश टाकणारे एक नवीन साधन आहे, असे मी मानतो’’ असे म्हणून व्यासंगी व संशोधक दृष्टीचा एक उदयोन्मुख लेखक म्हणून यशवंतराव चव्हाणांनी कुंटे यांचे अभिनंदन केले. पाठीवर पडणाऱ्या या शाबासकीच्या थापेमुळे सातत्याने पुढे झेपावत जाणारे कुंटे अनेक प्रकारचे चौफेर लेखन करताना दिसतात. अर्थशास्त्र आणि इतिहास या दोन्हीही क्षेत्रांत त्यांचे काम आहे.

प्रारंभिक काळामध्ये इलेग्ट ऑफ सिव्हिक्स कॉन्स्टिट्युशनल हिस्टरी ऑफ इंडिया’, ‘प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स’, ‘माल्थम’, ‘आपले छत्रपती’, ‘करपद्धतीचे ऐतिहासिक विवेचन’, ‘पैसा, बँका आणि त्यांचे व्यवहार’, ‘आर्थिक नियोजने’, ‘रिकार्डो’, ‘अॅ डम स्मिथ’, ‘प्रोधन’, ‘मिल’ ‘से सायमन आणि सिसमॉन्डी’, ‘मार्क्सविषयी थोडेसे’, युद्धाच्या धुमश्चक्रीत  पानिपतचे युद्ध. १९५९ ते १९६५ या काळातील हे ग्रंथलेखन होय. त्यांचे पुढील ग्रंथ अनुवादात्मक असले, तरी महत्त्वपूर्ण आहेत. महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासाची जी काही अव्वल दर्जाची फारसी साधने आहेत, त्यामध्ये फरिश्ता याचे गुलशने इब्राहिमी’, सय्यद अली तबातबाचे बुरहाने मासीरहा मुळात दोन भागांत असलेला ग्रंथ व रफिउद्दीन शिराजी यांचे तजकरत उल् मुलुकयापैकी बुरहाने मासीरमध्ये पहिल्या भागात बहमनी साम्राज्याचा उदय व ऱ्हास याची माहिती असून, दुसऱ्या भागात अहमदनगरच्या निजामशाहीघराण्याचा संपूर्ण इतिहास दिलेला आहे. मेजर किंग यांनी यापैकी पहिल्या भागाचा इंग्रजी अनुवाद केला असून, सर वुल्स्ले हेग यांनी दुसऱ्या भागाचा अनुवाद केला आहे. मेजर किंग यांच्या पहिल्या भागाचा अनुवाद करताना ; डॉ. भगवान कुंटे यांनी या क्षेत्रात झालेल्या नवीन कामाची नोंद घेतली. विशेषतः हरुनखान शेरवानी यांचा बहमनी ऑफ द डेक्कनहा ग्रंथ त्यांच्यासमोर होता. याच भागामध्ये मुळात किंग्ज यांना तबातबाच्या ग्रंथास पुरवणी म्हणून रफिउद्दीन शिराजी यांच्या ग्रंथाचाही संकीर्ण स्वरूपात अनुवाद दिला होता.

स्वाभाविकपणे कुंटे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून वरील तिन्ही मूलगामी साधनांचा मराठी अनुवाद झाला आहे. असे अनुवाद करताना पूरक संदर्भ,टीपातत्कालीन किल्ल्यांची व महत्त्वाच्या स्थळांची सूची, निवडक घटकांची जंत्री देण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे आजही महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासासाठी ते मार्गदर्शक ठरतात. कुंटे यांनी गुलशने इब्राहिमी या फरिश्त्याच्या ग्रंथाचा अनुवाद १९८२ मध्ये केला आहे. यामध्ये बहमनी घराणे आणि अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वर्हाडची इमादशाही, बरीदची बरीदशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा शाह्यांच्या इतिहासाबरोबरच खानदेशच्या फारुकी घराण्याचा इतिहासही (.. १३८२ ते १६०१) दिला आहे. याशिवाय गुजरातचे सुलतान, मोगल आणि इतर राजवटी यांचा आनुषांगिक उल्लेखही यात आला आहे. फरिश्त्याचा गुलशने--इब्राहिमी म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्र-कर्नाटकाचा अस्सल साधनांनी युक्त असा इतिहास आहे.

याशिवाय कुंटे यांच्या दिल्लीच्या शहाजहानचा इतिहासडॉ. .प्र.सक्सेनालिखित हिस्टरी ऑफ शहाजहान ऑफ दिल्लीचा अनुवाद किंवा जदुनाथ सरकारलिखित हिस्टरी ऑफ औरंगजेबया ग्रंथाचा मराठी अनुवाद अतिशय सुरस झाले आहेत. शहाजहानच्या अनुवादाच्या संदर्भात निवेदन करताना ते काही मूलगामी विचार सहजपणे मांडतात. बंडखोरीचे विष जणू काही मुस्लिम राज्यकर्त्यांच्या अंगी भिनले होते. औरंगजेबाने हीच बंडखोरी केली आणि आपल्या बापालाच - शहाजहानलाच जिवंतपणी नरकयातना भोगावयास लावल्या. शहाजहानचे चरित्र म्हणजे आनंद आणि शोक यांचा आविष्कार आहे.एखाद्या मूलगामी साधनाचा सरस अनुवाद करताना तो मूळ साधनाइतकाच दर्जेदार असणे हे कौशल्य भगवान कुंटे यांना सहजसाध्य झाले होते.

कार्यकारी संपादक व सचिव म्हणून काम करताना त्यांनी सुधारित इंग्रजी गॅझेटिअरच्या एकूण १३ ग्रंथांच्या संपादनाचे काम केले, तर राज्य गॅझेटिअर मालिकेमध्ये ३ गॅझेटिअर ग्रंथ संपादित केले. सोर्स मटेरिअल फॉर हिस्ट्री ऑफ फ्रीडम मूव्हमेंटमधील खंड ३ ते ९ या ७ खंडांचे ११ भागांत संकलन, संपादन व प्रकाशन केले. याशिवाय स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश ६ खंडात प्रकाशित केला. मराठवाडा विभागासाठी त्यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. डॉ. सेतुमाधवराव पगडी यांच्यानंतर कुंटे यांनी केलेले काम तितकेच भरीव स्वरूपाचे आहे.

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सहयोगकर्ता लेखक म्हणून त्यांनी दर्शनिका विभागासाठी योगदान दिले. मात्र, मध्ययुगीन इतिहासाचे आकलन हिस्टरी ऑफ इंडिया अॅज टोल्ड बाय इट्स ऑन हिस्टॉरियनया ग्रंथाचे लेखक इलियट डाऊन्सच्या दृष्टीकोनाचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. इलियटची लेखनपद्धती ही ब्रिटिश राजवटीचे समर्थन करणारी आणि इस्लामी सल्तनत ही प्रजेवर अन्याय करणारी जुलमी राजवट होती, हे मुसलमान लेखकांच्या लिखाणांचे उतारे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारी होती. स्वाभाविकपणे भाषांतरासाठी तसेच उतारे निवडले गेले.

वास्तविक तवारिखा व तवारिखकार यांची योग्य समीक्षा व्हायला हवी. इस्लामी जगतात इतिहास लेखनाच्या दोन परंपरा दिसतात. पहिली परंपरा अरबी इतिहासकारांची आणि दुसरी इराणी तवारिखकारांची. तुलनेत अरबी इतिहासकारांची दृष्टी अधिक व्यापक होती. संपूर्ण समाज त्यांच्या डोळ्यांसमोर होता.

झियाउद्दीन बरवी, अमीर खुसरो, इसामी हे सगळे इराणी परंपरेतील लेखक सुलतानाभोवती फिरताना दिसतात, तर इब्न बत्तुता आणि इब्न फादुल्ला (मृत्यू १२४८) हे दोन अरबी परंपरेतील लेखक मोहम्मद तुघलकाच्या काळातील आहेत. प्रा. सुलेमान नदवी यांनी याविषयीची ओळख करून दिली आहे. एकूण कुंटे यांचे इतिहासलेखन उत्तरकाळात तरी इलियट यांच्या दृष्टीकोनातून प्रभावित झालेले दिसते. खरे तर यानंतर या क्षेत्रात काम झाले आहे. आज त्यांच्या लेखनाचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे शक्य आहे. असे असले, तरी महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासाचे आकलन करण्यासाठी त्यांनी मूळ फारसी व इंग्रजी साधनांचा मराठी अभ्यासकाच्या हाती दिलेला ठेवा चिरंतन स्वरूपाचा आहे. तसेच गॅझेटिअर विभागात त्यांनी केलेले काम हे महाराष्ट्राचा गॅझेटिअरकार म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने ओळख करून देणारे आहे.

डॉ. अरुणचंद्र शं. पाठक

कुंटे, भगवान गणेश