Skip to main content
x

कुरणकर, श्रीधर विठ्ठल

           श्रीधर विठ्ठल कुरणकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील जाधेवाडी या गावात झाला. दि. ३१ ऑक्टोबर १९७४ पासून त्यांनी भारतीय पायदळातील गढवाल रायफल्सच्या अठराव्या फलटणीमध्ये सेवेस सुरुवात केली. दि. ८ जुलै १९८९ रोजी आठ जणांच्या टेहळणी पथकाला मोटरसायकलवरून जाणारे दोन अतिरेकी दृष्टीस पडले. भारतीय सैन्याचे वाहन पाहिल्याबरोबर त्या अतिरेक्यांनी घाबरून आपली मोटरसायकल सोडून दिली व ते जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्यांच्यातला एक अतिरेकी कुंपण व इतर बांधकामाचा फायदा उठवून निसटला.
     नाईक श्रीधर कुरणकर त्या वेळी कमांडिंग ऑफिसरच्या गाडीवर चालक होते. त्यांनी ताबडतोब दुसऱ्या अतिरेक्याचा पाठलाग करण्यासाठी गाडी वळवली. नाईक कुरणकरांनी अतिरेक्याला धडक देऊन पडले. गाडी अतिरेक्याच्या अंगावरून जाण्याअगोदरच त्यांच्याकडून नकळत ब्रेक दाबले गेले. व गाडी तत्काळ जागच्याजागी थांबली.
      नाईक कुरणकर, कामादिंग ऑफिसर व रायफलमन सुरेश कुमार यांनी गाडीतून उद्या मारल्या व ते पुढच्या बाजूला अतिरेक्याला पकडण्यासाठी धावले. पण तोपर्यंत तो अतिरेकी धक्क्यातून सावरला होता. व एके-४७ हातांत ठेवून पवित्रा घेऊन बसला होता. केवळ दीड मीटरवर अतिरेकी हल्ल्याच्या तयारीत असल्याचे पाहून कुरणकर यांनी कमांडिंग ऑफिसरला बाजूला ढकलले व ते स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्या अतिरेक्यावर धावून गेले. अतिरेक्याच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या त्यांच्या छातीत व डोक्यात घुसल्या व गंभीर जखमी होऊन ते खाली कोसळले. या जखमांमुळे त्यांचा नंतर मृत्यू झाला. कुरणकर यांनी अतिरेक्यांशी लढताना अद्वितीय पराक्रम गाजवला आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. या कामगिरीबद्दल त्यांना दि. २६ जानेवारी १९९० रोजी मरणोत्तर ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

-संपादित

कुरणकर, श्रीधर विठ्ठल