कवठेकर, बाळकृष्ण गणपतराव
समकालीन वाङ्मय व्यवहारातील प्रवृत्तीविशेषांचा वाङ्मयानिष्ठ व व्यक्तिनिरपेक्ष जाणिवेने शोध घेऊ पाहणारे समीक्षक. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या गावी जन्म. महाविद्यालयीन शिक्षण शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद येथे. मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण. बी.ए. व एम.ए.च्या वर्गांत विद्यापीठातून सर्वप्रथम. बी.ए.ला विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र. एम.ए.साठी महाराष्ट्र शासनाची प्रतिष्ठेची समजली जाणारी दक्षिणा फेलोशिप. महाविद्यालयीन जीवनात न्यायमूर्ती रानडे वादविवाद स्पर्धा, डॉ.आंबेडकर वादविवाद स्पर्धा या महाराष्ट्राच्या पातळीवर महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्या स्पर्धात प्रथम पारितोषिक.
नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयांत मराठीचे अधिव्याख्याता म्हणून तीस वर्षे कार्यरत. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून नियुक्ती. तेथेच विभागप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त. दरम्यानच्या काळात पीएच.डी.च्या आठ व एम.फिल.च्या चार विद्यार्थ्यांना संशोधकार्यासाठी मार्गदर्शन. चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात एक अध्यापन कुशल, शिस्तप्रिय, व्यासंगी आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून सर्वज्ञात.
१९९२ ते १९९० या काळात मराठवाडा साहित्य परिषदेच्या ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादक. महाराष्ट्र शासनाच्या ‘बालभारती’च्या मराठी अभ्यासक्रम समितीचे निमंत्रक म्हणून उल्लेखनीय कार्य. त्यांच्या कार्यकाळातील कुमारभारती व युवकभारतीची पुस्तके गुणवत्तेच्या व दर्जाच्या दृष्टीने वाखाणण्याजोगी. त्याबरोबरच केंद्र शासनाने पुरस्कृत केलेल्या राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या मराठी अभ्यासक्रम निर्मिती व पाठ्यपुस्तक समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, ऑपरेशन ब्लॅक बोर्ड आदी मंडळांवर सदस्य म्हणून कामकाज. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण समितीच्या अहवाल-लेखन विभागाचे प्रमुख. काही काळ मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि १४ व १५ ऑक्टोबर २००० मध्ये वाशी, नवी मुंबई येथे झालेल्या तिसर्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. प्रकाशित पुस्तके : ‘वाङ्मयीन चर्चा आणि चिकित्सा’, ‘दलितसाहित्य: एक आकलन’, ‘प्रतिसाद’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : साहित्य आणि जीवननिष्ठा’ या समीक्षात्मक ग्रंथांचे लेखन. तर ‘हैदराबादचा मुक्तिसंग्राम: एक उपेक्षित संघर्षगाथा’, ‘श्लोककेकावली’ व ‘दशपदी समरसतेची’ या ग्रंथांचे संपादन. ‘दलित साहित्य: एक आकलन’ हे पुस्तक महाराष्ट्राभर बहुचर्चित. या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा १९८४ सालचा उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ म्हणून पुरस्कार. त्याबरोबरच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचा पुरस्कारदेखील मिळाला. अशा या पुरस्कारप्राप्त व महत्त्वपूर्ण समीक्षाग्रंथांतील काही लेखांचे हिंदी, कानडी, गुजराती व इंग्लिश भाषांत अनुवाद.
साठोत्तरी काळात वाङ्मयीन व्यवहारासंबंधी ताटस्थ्याने व साक्षेपाने लेखन करणारे आणि समीक्षक म्हणून आपली स्वतंत्र मुद्रा उमटविणारे व्यक्तिमत्त्व. नव्या वाङ्मयीन प्रवाहासंदर्भात स्वागतशील भूमिकेबरोबरच वाङ्मयीन अंगाने त्यांचे मूल्यमापन करून त्यांना आत्माभान देऊ पाहणारा समीक्षक आणि विद्यार्थ्यांवर अध्यापनाद्वारे वाङ्मयाच्या थोरवीचे संस्कार करू पाहणारा व्यासंगी प्राध्यापक या नात्याने मराठी वाङ्मय विश्वावर आपला ठसा उमटवणार्या बाळकृष्ण कवठेकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी व रसिक चाहत्यांनी ‘मूल्यसंकल्पना व साहित्यविचार’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला.
कवठेकरांनी संख्येने अल्प, परंतु गुणात्मकदृष्ट्या मोलाचे व मूल्यात्म समीक्षालेखन केले. त्यांच्या वाङ्मयनिष्ठ भूमिकेचा प्रत्यय या लेखनातून येतो. वृत्ती गांभीर्य, चिंतनशील प्रवृत्ती, वाचनाभिमुखता, वैचारिक पूर्वतयारी आणि निश्चित अशी तात्त्विक बैठक आदी बाबींचा प्रत्यय त्यांच्या लेखन-व्यक्तिमत्त्वाद्वारा येतो.
साहित्याचा ‘साहित्य’ म्हणून विचार करण्यावर त्यांचा भर दिसतो. साहित्यकृतीचा विचार करताना तिच्यातून सामाजिक जाणीव प्रकट होते की नाही, हा तिच्या मूल्यमापनाचा निकष होऊ शकत नाही; तर तिच्यातून प्रकट होणारी जाणीव- ती सामाजिक असली तरीही, ती कलारूप धारण करू शकलेली आहे की नाही, हा तिच्या मूल्यमापनाचा खराखुरा निकष असतो; ही भूमिका घेऊन त्यांनी समीक्षात्मक लेखन. ‘नकार देऊन मूल्ये नाहीशी होत नाहीत, आपण मात्र त्या मूल्यचिकित्सेला पारखे होतो. त्याउलट स्वीकारात्मक दृष्टीकोनातून जीवनाकडे पाहू लागलेले दलित साहित्य अधिक साहित्यगुणसंपन्न व आशावादी होण्याची शक्यता अधिक.’ अशी त्यांची दलित साहित्यविषयक भूमिका महाराष्ट्रभर चांगलीच चर्चेत राहिली व त्यासंदर्भात उलटसुलट चर्चादेखील झाली. कवठेकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे व त्यांच्या जीवनकार्याचे मूल्यांकन सारासार विवेकनिष्ठ भूमिकेने केले.
एखाद्या मुद्द्यासंबंधी स्वतःच प्रश्न उपस्थित करून त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सोडवणूक करतात वा त्या मुद्द्याची चहु अंगांनी तपासणी करून आपली भूमिका वाचकांसमोर ठेवतात. तर्कनिष्ठ विचारपद्धती व विचारांची स्पष्टता यांवर भर. एकूणच समकालीन वाङ्मयव्यवहारातील नवे प्रवाह, नवप्रवृत्ती, प्रेरणा आणि प्रश्न यांना कवठेकरांनी आपल्या लेखनात विशेष महत्त्व दिले. कवठेकरांची समीक्षा केवळ वाङ्मयीन तपशीलापेक्षा वाङ्मयविश्वातील प्रवृत्तिविशेषांचा शोध घेत सिद्धान्तन करू पाहणारी आहे. २०१३ साली मंचरकर स्मृती गौरव पुरस्कार ,मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार असे सन्मान त्यांना लाभले आहेत.