Skip to main content
x

खाँ, रहिमत

भूगंधर्व

हिमत खाँ हे ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध बुजुर्ग गायक उस्ताद हद्दू खाँ यांचे धाकटे चिरंजीव. ज्येष्ठ चिरंजीव मुहम्मद खाँ यांच्याबरोबर हद्दू खाँनी धाकट्या मुलालाही संगीताची तालीम दिली. राजबिंडा, गोरापान, सुदृढ असा मुलगा रहिमत खाँ हा वडिलांचा फार लाडका होता. त्यामुळे तो लहरी आणि हूडही होता. जयपूरचे तत्कालीन राजे महाराज सवाई मानसिंह त्याच्या गायनाने अतिशय आनंदित झाल्याची नोंद आहे.

पल्लेदार, सुरेल, चपळ आवाज, तान अतिशय तयारीची, अशा रहिमत खाँंना ‘तान के कप्तान’ असे म्हटले जाई. गायनातील सहजता, अकृत्रिमपणा व भारदस्तपणा हे त्यांचे प्रमुख गुण. मुंबई, पुणे, कोल्हापूर, कुरुंदवाड येथील त्यांच्या कार्यक्रमांनी त्यांचे नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले. विष्णुपंत छत्रे आणि निसार हुसेन खाँ हे त्यांचे सहाध्यायी होते.

छोटे महंमद खाँ यांचे १८७४ साली व पाठोपाठ हद्दू खाँ यांचे १८७५ साली निधन झाल्याने खाँसाहेब सैरभैर झाले. एकेकाळी पोशाखाच्या बाबतीत दक्ष असलेल्या रहिमत खाँचे जेवणखाण, कपडेलत्ते अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ लागले. ते भ्रमिष्टावस्थेत ग्वाल्हेर सोडून बनारसला गेले. तेथे ते व्यसनांच्या आहारी गेले.

परंतु, विष्णुपंत छत्रे गावोगावी सर्कसचे खेळ करीत बनारसला आले असताना १८९२ मध्ये त्यांना रहिमत खाँ दिसले व त्यांना आपल्या बिर्‍हाडी घेऊन आले. विष्णुपंतांनी त्यांची खूप सेवा केली. सर्कसच्या वातावरणात खाँसाहेब रमले, आणि त्यांचे गाणे पुन्हा सुरू झाले. नंतर रसिकवर्ग रहिमत खाँचे गाणे ऐकण्यासाठी छत्र्यांच्या सर्कशीत जात असे.

उस्ताद रहिमत खाँ व उस्ताद अल्लादिया खाँच्या गायनाच्या सामन्यात उस्ताद रहिमत खाँ जिंकल्याची नोंद आहे. उस्ताद अब्दुल करीम खाँनीदेखील उस्ताद रहिमत खाँचे गायन फार नावाजले होते. रहिमत खाँच्या लोचदार गायनाचा प्रभाव अनंत मनोहर जोशी, तसेच अल्लादिया खाँसाहेबांचे पुत्र मंजी खाँ यांवर पडला. रहिमत खाँच्या १९२० मध्ये भूप, मालकंस, बसंत, पूरिया, भैरवी, टप्पा, पिलू, होरी अशा ध्वनिमुद्रिकाही निघाल्या.

१९०५ साली विष्णुपंत छत्रे वारल्यानंतर रहिमत खाँचा सांभाळ काशिनाथपंत छत्रे यांनी केला. छत्रे बंधूंच्या निधनानंतर कुरुंदवाडच्या संस्थानिकांनी रहिमत खाँचा सांभाळ केला. जून १९२२ मध्ये ते कुरुंदवाड मुक्कामी वारले.‘सुध मुद्रा, सुध बानी’ असे त्यांचे गायन असे. त्यांना ‘तान के कप्तान’ आणि ‘भूगंधर्व’ अशा पदव्या मिळाल्या होत्या.

डॉ. सुधा पटवर्धन

खाँ, रहिमत