Skip to main content
x

खाँ, सिंदे बाबा

           बाबा सिंदे खाँ यांचा जन्म सिंध किंवा पंजाबमध्ये झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव अमीर खाँ असे होते. अमीर खाँ हे बन्ने खाँचे शिष्य व मामेबंधू होते. बन्ने खाँ हे पिढीजात धृपद गायक होते. लखनौ येथे हद्दू-हस्सू खाँचे गाणे ऐकून ते ग्वालियर येथे ख्याल शिकण्यासाठी गेले. एका प्रसंगातील बन्ने खाँची गुरुभक्ती पाहून हस्सू खाँनी त्यांना मनापासून तालीम दिली. पुढे दक्षिण हैदराबाद येथे त्यांची दरबारी गवई म्हणून नेमणूक झाली. बन्ने खाँनी अमीर खाँना गंडा बांधून त्यांना चांगली तालीम दिली.

अमीर खाँ हेही भरतीदार गवई होते. बन्ने खाँच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर अमीर खाँ रुजू होणार होते. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना सिंधमध्ये आपल्या मुलांना शिकवण्यासाठी बोलावून घेतले. तेव्हापासून अमीर खाँ सिंधमध्येच सेठ विसनदास या सिंधी व्यापार्याकडे राहू लागले. सिंदे खाँचे शिक्षण अमीर खाँकडेच झाले.

अमीर खाँना प्यार खाँ, मुहम्मद खाँ, सिंदे खाँ व मिस्त्री खाँ असे चार पुत्र होते. प्यार खाँना अमीर खाँची तालीम मिळाली, त्याचबरोबर खाँ अलिबक्षांची पतियाळा घराण्याचीही तालीम त्यांनी घेतली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर सिंदे खाँ प्यार खाँ यांच्याबरोबर राहू लागले. हे दोघेही सेठ विसनदास या व्यापार्याकडे नोकर होते. नोकरीचा कंटाळा आल्यामुळे ते काबूलला गेले व पुढे एका वर्षाने कराचीला गेले. दोघा भावांचे पटत नसल्यामुळे नंतर ते वेगळे राहू लागले. सेठ विसनदास कराचीमध्ये असले की सिंदे खाँ त्यांच्याकडे राहत.

सेठ विसनदास हे कवी होते व वैराग्यपर काव्यरचना करीत. सिंदे खाँचा ईश्वरभक्तीकडे लहानपणापासूनच ओढा होता. विसनदासांच्या काव्याचा त्यांच्यावर विशेष परिणाम झाला. सिंदे खाँनी गृहस्थी माणसाचे कपडे घालणे सोडून दिले व ते कफनी घालू लागले.

सिंदे खाँ १९१९ च्या आसपास मुंबईला आले. मुंबई शहर त्यांना आवडले. तसेच त्यांना काही शिकवण्याही मिळाल्या. सिंदे खाँचा स्वभाव तापट होता. त्यांची   गायनविद्या उत्तम प्रतीची असल्यामुळे ते कोणाची भीड बाळगीत नसत. त्यांच्या निर्भीड स्वभावाचा राग येऊन मुंबईतील प्रस्थापित गवयांनी सिंदे खाँची प्रसिद्धी वेडा फकीर म्हणून करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे लक्ष संगीतावरून विचलित झाले.

खाँसाहेब मैफलीचे गवयी नव्हते. त्यांच्या पूर्वायुष्यात ते सिंध प्रांतात मैफली करत; पण मुंबईत त्यांच्या विशेष मैफली झाल्या नाहीत. मात्र चीज भरण्याची त्यांची शैली व हातोटी विलक्षण सुंदर होती. लयकारीतील जोर, कण भरण्याची रीत, समेवर बोल पकडून येण्याची तरकीब व चीज म्हणताना शब्दार्थाप्रमाणे स्वररचना ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होती. थोरले बंधू प्यार खाँ यांच्या सहवासामुळे त्यांना पतियाळा घराण्यातील बर्याच चिजा मिळाल्या. ग्वालियर व पतियाळा या दोन गायकींच्या मिलाफातून त्यांची गायकी विशेष ढंगदार बनली.

बडे गुलाम अली खाँसाहेबांना सिंदे खाँबद्दल अतीव आदर होता. ते त्यांना खूप मानत. त्यांच्याजवळ ते लहानपणी शिकले होते व मुंबईत स्थायिक झाल्यावर सिंदे खाँकडून त्यांनी काही चिजाही घेतल्या होत्या. बी.आर. देवधरांना सिंदे खाँनी बर्याच चिजा शिकवल्या. बी.आर. देवधरांवर त्यांचा लोभ होता. बी.आर. देवधरांनीच त्यांच्यावर चरित्रपर लेख लिहून या शापित गंधर्वाचा संगीत जगताला परिचय करून दिला.

सिंदे खाँना काही लोक एक नशेबाज पागलभांडखोर वृत्तीचा गवईसमजत असत, तर दुसरे त्यांना दैवी शक्ती असलेला एक विद्वान गवई व अवलिया मानत असत. पण ते अत्यंत हुशार, बुद्धिमान, फकिरी वृत्तीचे एक स्वतंत्र अवलिया होते. वयाच्या पासष्ट-सहासष्टाव्या वर्षी त्यांचे किंग जॉर्ज हॉस्पिटल, मुंबई येथे निधन झाले.

सुधा पटवर्धन, माधव इमारते

संदर्भ :
१. देवधर, बी.आर.; ‘थोर संगीतकार’. 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].