Skip to main content
x

खाँ, विलायत हुसेन

स्ताद विलायत हुसेनखाँ यांचा जन्म आग्रा येथे झाला. विलायत हुसेन खाँ यांचे वडील नत्थन खाँ हे मोठे विद्वान गायक होते. विलायत हुसेन खाँ यांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे ते जयपूरला आपले आजोबा उस्ताद कल्लन खाँ यांच्याकडे गेले. ते जयपूर दरबारचे गायक होते. त्यांच्याकडून, तसेच त्याच दरबारातील गुणी धृपदिये उस्ताद करामत खाँ यांच्याकडून त्यांना पायाभूत स्वर-तालांचे शिक्षण मिळाले. आजोबा महंमद बक्ष यांच्याकडे त्यांना ख्याल आणि धृपदाची तालीम मिळाली. उस्ताद गुलाम अब्बास यांच्याकडेही ते संगीत शिकले. पुढे त्यांना त्यांचे वडील बंधू महमद खाँ व अब्दुल्ला खाँ यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. त्यांचे मोठे मामा महमूद खाँ व मधले मामा पुत्तन खाँ व धाकटे मामा मुन्शी जमाल अहमद यांच्याकडूनही त्यांना बर्‍याच राग-रागिण्यांतील ख्याल मिळाले.

आपल्या घराण्याच्या बाहेरच्या अनेक उस्तादांकडून त्यांनी विविध राग-रागिण्यांचा व चिजांचा संग्रह केला. जवळजवळ ४० गुरूंकडून त्यांनी संगीत विद्या घेतली. ते एकाअर्थी गायकांचेच गायक होते. प्रचलित रागांमधील शेकडो बंदिशी, तसेच अनवट रागांमधील (अप्रचलित) कैक बंदिशी त्यांना मुखोद्गत होत्या.

खाँसाहेबांनी उदारहस्ते विद्यादान केले. त्यांच्या शिष्यगणात पं. रत्नकांत रामनाथकर, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, काणेबुवा, सुमती मुटाटकर, गिरीजा केळेकर, पं. सीताराम फातरपेकर, सरस्वतीबाई फातरपेकर यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. पं. रत्नकांत रामनाथकर हे खाँसाहेबांची गायकी सहीसही मांडत असत. खाँसाहेब काटेकोरपणे शिष्यांकडे लक्ष देत असत व रागशुद्धतेबाबत जराही तडजोड करत नसत. मोगूबाई कुर्डीकर, राम मराठे, मेनका शिरोडकर, यशपाल इत्यादींनी त्यांचे काही काळ मार्गदर्शन घेतले.

विलायत हुसेन खाँसाहेब स्वभावाने मोठे स्वाभिमानी होते. ते मुंबईला आले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी ठीक नव्हती. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा एक जलसा आयोजित करून जमा झालेली रक्कम खाँसाहेबांना सुपूर्द केली. मात्र, आयोजकांनी खाँसाहेबांच्या मदतीकरिता हा निधी गोळा केला असल्याचे सांगितल्यामुळे खाँसाहेबांचा स्वाभिमान दुखावला गेला. त्यांनी तो सर्व निधी तिथल्या तिथेच टिळक फंडासाठी देत असल्याचे जाहीर केले. खाँसाहेबांचे व्यक्तिमत्त्व व वागणे-बोलणे रुबाबदार होते. पुण्याला आबासाहेब मुजुमदारांच्या घरी त्यांनी स्वखर्चाने येऊन हजेरी लावली. पण, आबासाहेबांनी बिदागी देऊ केली असता, ती त्यांनी नम्रपणे नाकारली.

खाँसाहेबांच्या मैफलींचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीलाच सुरावटीत राग जाहीर होत असे. रागाच्या चिजेचा स्थायी अंतरा अगदी चुस्त असे. समेवर येताना हमखास ‘आमद’ असायचीच. त्यामुळे श्रोते समेला हमखास दाद देत असत. द्रुत चिजेत ताना घेताना ते मुखड्याच्या आधी एक सुरावट ‘आमद’ म्हणून बांधायचे आणि मुखड्याच्या आधी ती सुरावट हमखास घ्यायचे. त्यामुळे मुखड्याचा कार्यकारणभाव सिद्ध व्हायचा आणि मैफल चैतन्यपूर्ण होत असे. त्यांच्या गाण्यातील सर्वांत आकर्षक भाग लयकारी हा होता. लयकारीचे बोल ते अतिशय डौलदारपणे टाकत असत.

मुंबईत असताना ‘प्राणपिया’ या टोपणनावाने खाँसाहेबांनी अनेक बंदिशी केल्या होत्या. चाळीसहून अधिक वर्षांचा काळ मुंबईत वास्तव्य केल्यानंतर खाँसाहेबांनी आकाशवाणीच्या दिल्लीच्या मुख्यालयात सल्लागाराचे प्रतिष्ठेचे पद स्वीकारले आणि १९५५-५६ च्या दरम्यान त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला.

मुंबईतील शिकवणीची दगदग थांबली व खाँसाहेबांची निर्मितीची ऊर्मी बहरली. त्यांचे गाणे पूर्वीपेक्षा अधिक आशयघन झाले.

दिल्ली येथे रचलेल्या बंदिशींमध्ये जोग रागामधील ‘घरी पलछिन कछु ना सुहाय’ ही बंदिश अविस्मरणीय ठरली. दिल्ली येथे पं. वि.रा. आठवले व पं. गजाननराव जोशी यांसारख्या नामवंत गायकांनी खाँसाहेबांच्या विद्येचा लाभ घेतला.

आकाशवाणीसाठी खाँसाहेबांनी बर्‍याचशा अनवट रागांचे ध्वनिमुद्रण करून दिले. त्यांचे हे भरघोस दान संगीतातील भावी पिढ्यांसाठी मोठे वरदान ठरले आहे. हे ध्वनिमुद्रण अंदाजे ७२ तासांचे आहे. त्यांनी आपल्या सांगीतिक आयुष्यातील, तसेच आपल्या पूर्वजांकडून ऐकलेल्या दुर्मिळ आठवणी पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘संगीतज्ञों के संस्मरण’ या नावाने संगीत नाटक अकादमीने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.

             — पं. बबनराव हळदणकर

खाँ, विलायत हुसेन