Skip to main content
x

खांडेकर, विष्णू सखाराम

     सांगली येथे जन्मलेल्या खांडेकरांचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर होय. १९११ साली त्यांच्या वडिलांचे ( जे सांगली संस्थानात मुन्सफ होते) त्यांचे  निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावल्याने कोकणातील चुलत चुलत्यांनी, सखाराम रामचंद्र खांडेकरांनी दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नामकरण वि.स.खांडेकर असे झाले.

     १९१३ साली मॅट्रिकच्या परीक्षेत आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये दाखल झाले. पुण्यात त्यांचा राम गणेश गडकर्‍यांशी परिचय झाला. बा.ब.पटवर्धन, डॉ.गुणे यांच्यासारख्या शिक्षकांनी त्यांच्यातील साहित्यप्रेम वाढीस लावले. शिवाय बालकवी, गणपतराव बोडस, अच्युतराव कोल्हटकर, का.र.मित्र या साहित्य व नाट्य क्षेत्रांतील मान्यवरांशी त्यांची ओळख झाली.

     दत्तक संपत्तीचा वारसा मिळूनही खांडेकरांना आर्थिक लाभ झाला नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते इंटरपर्यंतच शिक्षण घेऊ शकले. दत्तक पित्याला खांडेकरांविषयी फारसे प्रेम नव्हते. बहिणीच्या मायेमुळे खांडेकर कोकणात सावंतवाडीला राहू लागले. १९२० नंतर खांडेकरांचे लेखन सुरू झाले. राम गणेश गडकरी यांच्या प्रथम स्मृतिदिनी खांडेकरांचा ‘हा हन्त हन्त’ हा लेख ‘नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला. १९२० साली खांडेकर ‘ट्युटोरियल इंग्लिश स्कूल’ या शिरोड्याच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. खांडेकरांच्या आयुष्यात आता नवे पर्व सुरू झाले. १९३८पर्यंत म्हणजे अठरा वर्षे खांडेकरांनी प्रथम शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून काम केले. मागासलेल्या खेड्याची प्रगती घडवावी आणि गोरगरीब मुलांना शिकवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, ह्या हेतूने शिरोड्यास आलेल्या खांडेकरांनी कष्टकरी, खालच्या वर्गातील मुलांकडे सहानुभूतीने, प्रेमाने आणि करुणेच्या भावनेने पाहिले.

      १९२० ते १९३८ हा वीस वर्षांचा काळ खांडेकरांच्या लेखनातील बहराचा काळ होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गंभीर लेख, विनोदी लेख, कविता, पुस्तक परीक्षणे या स्वरूपाचे लेखन ‘नवयुग’, ‘उद्यान’ व ‘महाराष्ट्र साहित्य’ या नियतकालिकांसाठी केले. तसेच त्या काळात ‘वैनतेय’ साप्ताहिकाच्या संपादनात मे.द.शिरोडकरांना खांडेकर साहाय्य करू लागले. ‘वैनतेय’मध्येच त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला. गं.दे.खानोलकरांच्या प्रेरणेने खांडेकरांनी याच सुमारास ‘रंकाचे राज्य’ हे संगीत नाटक, ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी ह्यांचे लेखन केले.

     १९३५ साली त्यांच्या साहित्यिक जीवनात अनपेक्षित परिवर्तन घडले. विनायक कर्नाटकी आणि बाबूराव पेंटर यांनी सुरू केलेल्या ‘हंस पिक्चर्स’ ह्या संस्थेसाठी चित्रपटांच्या पटकथा लिहून द्यायला खांडेकरांनी सुरुवात केली. शिरोडे येथील अध्यापन व्यवसाय सोडून खांडेकर लेखनासाठी कोल्हापूरला आले आणि स्थायिक झाले. शिक्षक म्हणून काम करीत असताना त्यांचे इंग्रजी व मराठी वाचन सातत्याने सुरू होते. जीवनातील दारुण अनुभवांना भिडण्याची ताकद, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, अंगभूत ध्येयवाद, भाषेची लाभलेली देणगी, मानवतावादी समाजप्रवण भूमिका या गुणांमुळे खांडेकरांनी कथा, रूपककथा, लघुनिबंध, कादंबरी, पटकथा, वैचारिक आणि समीक्षापर लेख असे विविध प्रकारचे लेखन केले.

     १९३० पासून खांडेकर कादंबरी लेखनाकडे वळले. ‘हृदयाची हाक’ (१९३०), ‘कांचनमृग’ (१९३१), ‘उल्का’ (१९३३), ‘दोन-धु्रव’ (१९३४), ‘हिरवा चाफा’ (१९३८), ‘दोन मने’ (१९३८), ‘रिकामा देव्हारा’ (१९३९), ‘पांढरे ढग’ (१९३९), ‘सुखाचा शोध’ (१९३९), ‘पहिले प्रेम’ (१९४०), ‘जळलेला मोहर’ (१९४१), ‘क्रौंचवध’ (१९४२), ‘अश्रु’ (१९५३), ‘ययाति’ (१९३९), ‘अमृतवेल’ (१९६७), ‘सोनेरी स्वप्ने भंगलेली’ (१९७७) अशा कादंबर्‍या लिहिल्या.

     १९३६ ते १९६१ या काळात खांडेकरांचे १२ लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध झाले. ते पुढीलप्रमाणे आहेत. ‘वायुलहरी’ (१९३६), ‘चांदण्यात’ (१९३८), ‘अविनाश’ (१९४१), ‘मंजिर्‍या’ (१९४४), ‘गोकर्णीची फुले’ (१९४४), ‘कल्पलता’ (१९४६), ‘हिरवळ’ (१९४७), ‘तिसरा प्रहर’ (१९४८), ‘मंझधार’ (१९५९), ‘रिमझिम’ (१९६१), ‘रंग आणि गंध’ (१९६१), ‘रेषा आणि रंग’ (१९६१).

     खांडेकरांनी कथा आणि रूपककथासुद्धा लिहिल्या; व्यक्तिचित्रणात्मक लेखन केले; पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्यांचे हे लेखन पुढील पुस्तकांत समाविष्ट आहे. ‘वनभोजन’ (१९३५), ‘धुंधुर्मास’ (१९४०), ‘फुले आणि काटे’ (१९४४), ‘जीवनकला’ (१९४४), ‘गोफ आणि गोफण’ (१९४६), ‘इंद्रधनुष्य’ (१९५८), ‘रेषा आणि रंग’(१९६१), ‘ते दिवस ती माणसे’ (१९६१), ‘अभिषेक’ वेगवेगळ्या संमेलनांच्या अध्यक्षपदांवरून केलेल्या भाषणांचा संग्रह (१९६३).

      मराठीत मोठ्या प्रमाणावर रूपककथा लिहिणारे खांडेकर हे एकमेव लेखक आहेत. श्रेष्ठ रूपककथाकार खलील जिब्रानप्रमाणे रवींद्रनाथ टागोरांचाही प्रभाव खांडेकरांवर पडला आहे. त्यांनी १५० हून अधिक रूपककथा लिहिल्या आहेत. त्यातील बर्‍याच रूपक कथा ‘कलिका’ (१९४३), ‘मृगजळातील कळ्या’ (१९४४), ‘सोनेरी सावल्या’ (१९४६), ‘वनदेवता’ (१९६०) ह्या संग्रहांत समाविष्ट केल्या आहेत. खांडेकरांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेली देणगी म्हणजे सतरा चित्रपट कथा. १९३६ साली त्यांच्या ‘छाया’ ह्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटकथा लेखनाचे सुवर्णपदक मिळाले. ‘महाराष्ट्रीय चित्रपटसृष्टीला वास्तवतापूर्ण तत्त्वप्रधान कथा देणारे तेजस्वी लेखक’ या शब्दांत दिग्दर्शक विनायकांनी खांडेकरांचा गौरव केला आहे. ‘ज्वाला’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘लग्न पाहावे करून’, ‘सरकारी पाहुणे’, ‘संगम’, ‘धर्मपत्नी’, ‘माझं बाळ’, ‘बडी माँ’, ‘सुभद्रा’, ‘माणसाला पंख असतात’ ह्या त्यांच्या विशेष उल्लेखनीय चित्रपट कथा आहेत.

     खांडेकरांनी ‘स्वराज्याचे ताट’ (१९२५), ‘रंकाचे राज्य’ (१९२७), ‘शीलशोधन’, ‘मोहनमाळ’,  ‘शांतिदेवता’, ‘मृगलांछन’ (१९२९-१९३२) इत्यादी नाटके लिहिली. ‘रंकाचे राज्य’ नाटकाचे काही प्रयोग ‘नाट्यकला प्रसारक मंडळी’ने सादर केले. त्या नाटकाचा अपवाद वगळता खांडेकरांना नाटककार म्हणून यश लाभले नाही.

     खांडेकरांनी बरेच समीक्षापर लेखन केले आहे. स्वतंत्र समीक्षापर ग्रंथ, पुस्तकांच्या प्रस्तावना, स्फुट वैचारिक चिंतनपर लेख असे-‘गडकरी: व्यक्ती आणि वाङ्मय’ (१९३२), ‘मराठीचा नाट्यसंसार’  (१९४३), ‘आगरकर: व्यक्ती आणि विचार’ (१९४९), ‘केशवसुत काव्य: आणि कला’ (१९५९), ‘वा. म. जोशी: व्यक्ती आणि विचार’ (१९४८) आदर्श समीक्षकाला भूषणीय असे उदारमनस्कता, सहानुभूती, गुणग्राहकता, उत्कट रसिकता, विश्लेषणपरता, चिंतनशीलता हे गुण खांडेकरांच्या टीकालेखनात आढळून येतात.

    खांडेकरांच्या ललित आणि वैचारिक लेखनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पडले आहे. माणूस आणि माणसाचे भवितव्य हा त्यांच्या चिंतनाचा मुख्य विषय तर आजूबाजूची पीडित, शोषित, दारिद्य्राने गांजलेली, अशिक्षित, भुकेने पछाडलेली माणसे त्यांच्या कुतूहलाचा आणि लेखनाचा केंद्रबिंदू होता. टॉलस्टॉय, महात्मा गांधी, आगरकर, केशवसुत, आदींचा प्रभाव खांडेकरांच्या विचारसृष्टीवर पडलेला होता. भोवतालच्या मानवी जीवनाचे निरीक्षण, परीक्षण व विश्लेषण सतत करीत राहून समाजाला सांगावेसे वाटले ते त्यांनी कविता, कादंबर्‍या, लघुकथा, रुपककथा, चित्रपट कथा, नाटके, साहित्य समीक्षा, साहित्य रसग्रहण, साहित्य विचार, संवाद-संभाषणे, पत्रे, आठवणी अशा सर्वांद्वारे सांगितले.

     समाजाचे वैचारिक उद्बोधन करणे हे त्यांनी आपले ध्येय मानले होते. आपले लेखन हे त्या ध्येयांच्या पूर्तीचे साधन आहे, असे त्यांनी मानले होते. शिक्षकी पेशा पत्करून त्यांनी आपली वैयक्तिक ध्येयपूर्ती केली. त्यांनी लेखनाकरिता लेखन केले नाही. माणसाचे जे जीवन त्यांनी पाहिले आणि स्वतःच्या जीवनात जे अनुभवले, ते लालित्यपूर्ण भाषेत स्वतःच्या मनावर झालेल्या प्रतिक्रियांसकट व्यक्त केले. वैयक्तिक सुखदुःखे, आशा-निराशा त्यांच्या लेखनातून क्वचितच व्यक्त होतात. सर्वसामान्यांची सुख-दुःखे, आशा-निराशा, सफल किंवा विफल आकांक्षा ह्यांचे वर्णन विश्लेषण, विवेचन व चिंतन आयुष्याच्या आखेरपर्यंत त्यांच्याकडून होत राहिले. त्याच्या प्रकटनार्थ त्यांनी वेगवेगळ्या साहित्यप्रकारांचा अंगीकार केला. माणुसकी हाच आपला धर्म असे मानणार्‍या खांडेकरांचे मानवजातीवर खरेखुरे नि उत्कट प्रेम होते. विशिष्ट जीवनदृष्टीचा स्वीकार केल्यामुळे त्यांच्या लेखनाला काही मर्यादा पाडल्या, अलंकारिक सुभाषितवजा भाषेचा आणि तत्त्वसमर्थनाचा मोह त्यांना टाळता आला नाही, तरी त्यांचे समग्र लेखन हे श्रेष्ठ दर्जाचे लेखन ठरते. त्यांना साहित्य व्यवहार आणि वाङ्मयीन संस्कृतीविषयी असणारी आस्था, त्यांची अस्वादक वृत्ती आणि मर्मदृष्टी या गुणांचा तसेच लेखन सातत्याचा गौरव म्हणून १९६८ साली त्यांच्या ‘ययाति’ ह्या पौराणिक विषयावरील कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या बहुमोल सन्मानाचे मराठीतील पहिले मानकरी वि.स.खांडेकर ठरले. भारत सरकारने ‘पद्मभूषण पुरस्कार’ आणि राष्ट्रिय फेलोशिप देऊन त्यांच्या समग्र कार्याचा गौरव केला. १९७६ साली शिवाजी विद्यापीठाने डी. लिट. चा बहुमान त्यांना प्रदान केला.

     वि.स.खांडेकर हे केवळ मराठीतीलच मान्यताप्राप्त लेखक नव्हते. अन्य भारतीय भाषांत त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे अनुवाद झाले आहेत. त्यांच्या कथा-कदंबर्‍यांना गुजराती, हिंदी, तमिळ भाषांतही फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. गुजराती भाषकांना तर ते गुजराती भाषेतील लेखक आहेत, असे वाटे. याशिवाय सिंधी, कानडी, मल्याळी ह्या भाषांतही त्यांच्या कादंबर्‍यांचे अनुवाद झाले आहेत.

     वि. स.खांडेकरांनी अर्धशतकाहून आधिक काळ साहित्याची जी श्रेष्ठ सेवा निरपेक्ष भावनेने केली, त्याबद्दल महाराष्ट्र शासन, महाराष्ट्रातील साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांकडून जो गौरव झाला त्याची नोंद अशी- १९३५ अध्यक्ष, गोमंतक साहित्य संमेलन, मडगाव; १९३५ अध्यक्ष शारदोपासक साहित्य संमेलन, आधिवेशन दुसरे; १९३९ - अध्यक्ष : महाराष्ट्र मंडळ, उज्जैन; १९४१ अध्यक्ष : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सोलापूर; १९५५- अध्यक्ष : मुंबई उपनगर साहित्य संमेलन, डोंबिवली; १९५९ - अध्यक्ष : मराठी साहित्य संमेलन, ४१ वे अधिवेशन, मिरज; याशिवाय अनेक वाङ्मयीन उपक्रमांत खांडेकरांचा सक्रीय सहभाग होता. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील प्रमुख शहरांत सामाजिक-साहित्यिक संस्थांच्या व्यासपीठावरून अध्यक्ष म्हणून खांडेकरांनी अनेक व्याख्याने दिली. त्या वेळी त्यांनी ‘जीवनाकरिता कला’ ह्या वाङ्मयविषयक सिद्धान्ताचे सोदाहरण स्पष्टीकरण केले. या स्वरूपाच्या कार्यक्रमांच्या निमित्तानेही त्यांचा सन्मान करण्यात आला.

     खांडेकरांनी किती प्रचंड लेखन केले होते, याची कल्पना त्यांच्या साहित्यावर झालेल्या समीक्षात्मक आणि वैचारिक लेखनावरून येते. त्यांच्या वाङ्मयाची चिकित्सा करणारे अनेक ग्रंथ आणि प्रबंध प्रकाशित झाले आहेत. ‘खांडेकर: सचित्र चरित्रपट’ ह्या जया दडकरांनी संपादित केलेल्या पुस्तकात लेखकाने खांडेकरांच्या जीवनाचा आणि वाङ्मयदृष्टीचा परिचय करून दिला आहे.

     प्रकृती साथ देत नसूनही खांडेकरांनी दीर्घकाळ बहुआयामी लेखन केले. राष्ट्रीय पातळीवरील या मानवतावादी लेखकाचा प्रभाव नंतरच्या मराठी साहित्यावर अप्रत्यक्षपणे पडत राहिला. महायुद्धोत्तर काळात कलावाद, जीवनवाद ह्या प्रणाली बाजूला पडल्या. साहित्यातील वास्तववादाचे स्वरूप बदलले. खांडेकरांच्या काळातील आदर्शवादी मूल्ये उरली नसली, तरी जीवनातील वास्तवाचा वेध घेण्याची लेखकांची प्रवृत्ती वाढली. अशा तर्‍हेने खांडेकरांच्या साहित्याचा अनुबंध पुढील साहित्यात राखला गेला. वि. स. खांडेकरांचे मराठी साहित्याला मिळालेले हे मौलिक योगदान म्हणावे लागेल.

     मराठीतील बहुप्रसव अशा ह्या  ज्येष्ठ लेखकाचे कोल्हापूर येथे वार्धक्यामुळे निधन झाले. 

- वि. शं. चौघुले

खांडेकर, विष्णू सखाराम