Skip to main content
x

खोले, विलास वसंत

     विलास खोले यांचा जन्म पुणे येथे झाला. नूतन मराठी विद्यालय प्रशाला या शाळेतून १९६१ साली एस.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९६६ साली मराठी, संस्कृत हे विषय घेऊन फर्गसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. १९६८ साली एम.ए.च्या परीक्षेस बसलेल्या सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांत पहिल्या क्रमांकाने व कुलपती सुवर्ण पदकासह सर्व पारितोषिके मिळवून पुणे विद्यापीठातून उत्तीर्ण झाले. ‘शोकांतिकेची संकल्पना व काही मराठी नाटके’ या विषयावर प्रबंध लिहून १९८० मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, खटाव येथे एक वर्ष (१९६८) अधिव्याख्याता म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने मुंबई येथील इस्माईल यूसुफ महाविद्यालयात झाली. १९७५ च्या जुलै महिन्यात ते श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पुणे येथील मराठी विभागात रुजू झाले आणि ३१ डिसेंबर २००४ रोजी विद्यापीठाच्या मुंबई व पुणे येथील मराठी विभागांचे प्रमुख व पुणे परिसरातील पदव्युत्तर अध्ययन व संशोधन विभागाचे प्रशासकीय समन्वयक या पदावरून निवृत्त झाले. २००५ ते २००७ या कालावधीत विद्यापीठ अनुदान आयोगाचे ‘एमिरिटस फेलो’ व २००७ ते २००९ या कालावधीत भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याचे ‘सीनिअर फेलो’ म्हणून ते कार्यरत होते.

     ‘शोकांतिकेचा उदय’(१९९२) हे त्यांचे पुस्तक ग्रीक शोकांतिकेच्या उदयाची मीमांसा करणारे आहे. ‘बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ’(१९९६) या पुस्तकात त्यांनी नामदेवकृत ज्ञानदेवांच्या समाधीच्या अभंगांचा तपशीलवार ऊहापोह केला असून ज्ञानेश्वरांच्या समाधीसंबंधीच्या सर्व मतमतांतरांची चर्चा केली आहे. ‘भक्तिशोभा’(२००७) हा मध्ययुगीन मराठीतील भक्तिसाहित्याचा परामर्श घेणारा लेखसंग्रह आहे. प्रामुख्याने ज्ञानदेव व नामदेव या संतांविषयीची चर्चा करणार्‍या लेखांबरोबरच संत कवयित्रींच्या काव्याचे विस्तृत पर्यालोचन हा या लेखसंग्रहाचा उल्लेखनीय विशेष म्हणता येईल.

     ‘अमेरिका व्हाया लंडन’(२००८) हे त्यांचे प्रवासवर्णन त्यांच्या सौंदर्यग्राही वृत्तीतून व संशोधकीय नजरेतून साकार झाले आहे. नायगारा धबधबा पाहिल्यानंतरची, भोवतालच्या स्थिरचराचे भान विसरायला लावणारी लेखकाची मन:स्थिती, अमेरिकेच्या आरंभकालीन अध्यक्षांच्या कार्याचा व त्यांच्या स्मारकांचा त्यांनी घेतलेला वेध, लंडन पाहताना त्यांच्या मनात उठलेले विचारतरंग आणि अमेरिकेतील ग्रंथालयांची समृद्धी यासारखा मजकूर प्रवासवर्णनाचे वेगळेपण मनावर ठसविणारा आहे. नोबेल पारितोषिक प्राप्त झालेल्या लेखिकांसंबंधी त्यांनी ‘ललित’ या नियतकालिकात लिहिलेल्या एकंदर अकरा लेखांची मालिका हे जागतिक पातळीवरील लेखिकांसंबंधीचे मराठीतील पहिलेवहिले सप्रमाण विवेचन आहे. तौलनिक साहित्याभ्यासाच्या दृष्टीने या लेखनाचे महत्त्व विशेष आहे.

     म.द. हातकणंगलेकर, के.ज. पुरोहित, वि.रा. करन्दीकर, पु.ग. सहस्रबुद्धे, माधव मोहोळकर, वा.म .जोशी, श्री.ना. बनहट्टी, साहित्यिक यशवंतराव यांसारखी चौदा-पंधरा वेधक व्यक्तिचित्रे त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. यांखेरीज विविध नियतकालिकांतून वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी अनेकानेक समीक्षालेख लिहिले आहेत. त्यांची समीक्षादृष्टी चिकित्सक व मर्मग्राही आहे. कथा, कादंबरी आणि कविता यांचे सौंदर्य नेमक्या शब्दांत उलगडून दाखवितात. आस्वादक समीक्षेचा वस्तुपाठच त्यांच्या समीक्षेत जाणवतो.

     अनेक साक्षेपी व वैशिष्ट्यपूर्ण संपादने हे खोले यांचे महत्त्वाचे साहित्यिक कार्य म्हणता येईल. ‘अगस्तीचे अंगण’ (२००९) हे प्रभाकर पाध्ये यांच्या साहित्याचे (रेखा इनामदार-साने यांच्या सहकार्याने) त्यांनी केलेले संपादन प्रभाकर पाध्ये यांच्या व्यक्तित्वाचा व वाङ्मयाचा शोधक दृष्टिकोनातून साधार परामर्श घेणारे आहे. ‘स्त्री-पुरुष तुलना’ (१९९७) या ताराबाई शिंदे लिखित पुस्तकाचे संपादन एकोणिसाव्या शतकातील स्त्रियांच्या परिस्थितीवर प्रखर प्रकाशझोत टाकणारे आहे. महाराष्ट्र फाउंडेशनच्या ग्रंथ पुरस्काराने त्याचा सन्मान झाला आहे. ‘गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी’ (२००२) या संपादनातून १९५१ ते २००० या कालखंडातील मराठी कादंबरीचा वेध घेण्यात आला आहे. या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा वि.भि.कोलते पुरस्कार लाभला आहे. ‘विसाव्या शतकातील मराठी समीक्षा’ (२००४) हा ग्रंथ विसाव्या शतकातील मराठी समीक्षेचे यथोचित समालोचन करणारा आहे. ‘चौकट’ (१९९१) या स्त्रियांच्या कथांच्या संपादनाला लिहिलेली विस्तृत प्रस्तावना स्त्रीवादी साहित्यसमीक्षेचा नमुनेदार वस्तुपाठ म्हणता येईल.

     कथासाहित्याचा व्यासंग असणार्‍या विलास खोले यांनी केलेली ‘राजेन्द्र बनहट्टी यांच्या निवडक दीर्घकथा’ (१९९८), ‘शांताराम कथा’ (१९९८), ‘दंडकारण्यातील प्रणयिनी’ (१९८७), ‘शांताराम पारितोषिक कथा’ (२००८) ही प्रकाशने त्यांचे कथासाहित्याचे आकलन व तद्विषयक दृष्टी यांचे दर्शन घडवितात. यांखेरीज ‘साने गुरुजींचे निवडक निबंध’ (१९९९), ‘आज्ञापत्र’ (२००७), ‘केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ’ (२००९), ‘लव्हाळी: काही दृष्टिक्षेप’ (२००५), ‘महाराष्ट्रातील राजकारणाचे साहित्यातील प्रतिबिंब’ (१९९८), ‘भक्तिगंगेच्या वाटेवर’ (हे.वि.इनामदार यांच्या सहकार्याने १९८८), ‘अध्यात्म आणि विज्ञान’ (१९८४), ‘सूर्यबिंबाचा शोध’ (१९८४), ‘वा.म.जोशी: जीवनदृष्टी आणि साहित्यविचार’ (१९८३) ह्या त्यांच्या महत्त्वपूर्ण संपादनांवरून डॉ. खोले यांच्या व्यापक वाङ्मयीन विचारांचा पैस अधोरेखित होतो.

- प्रा. डॉ. सुभाष भेण्डे

खोले, विलास वसंत