Skip to main content
x

खर्डेनवीस, पुरुषोत्तम प्रल्हाद

सावळाराम मास्तर

सावळाराम मास्तर’ या नावाने सर्वत्र परिचित असलेल्या पुरुषोत्तम प्रल्हाद खर्डेनवीस यांचे जन्मस्थान चांदा हे होय. त्यांचे वडील खासगी काम करीत व  भजन मंडळात गात असत. सावळाराम हे त्यांच्या द्वितीय पत्नी सावित्रीबाई यांच्यापासून झालेले एकच पुत्ररत्न. देवीच्या रोगामुळे पूर्ण अंध झालेल्या सावळारामांवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार होऊ लागले. सात वर्षांचे असतानाच त्यांचे आई-वडील इहलोक सोडून गेले. त्यांचे मामा वाचासुंदर त्यांना नागपूरला घेऊन गेले. मामांनी त्यांचे प्रेमाने पालन केले. सावळारामांची वृत्ती गुणग्राही होती. अनुकरणशक्ती अफाट होती.

नागपूरला प्रसिद्ध नाटक कंपन्यांचा मुक्काम असे. मामा सावळारामला नाटकाला नेत. मास्टर दीनानाथ, सवाई गंधर्व, सरनाईक अशा मातब्बर गायकांच्या हुबेहूब नकला करून त्यांनी ‘रवि मी चंद्र कसा’, ‘खरा तो प्रेमा’, ‘शूरा मी वंदिले’, ‘मर्मबंधातली ठेव’ इ.  बरीच पदे पाठ केली. मामांकडे हार्मोनिअम होता. सावळाराम  स्वत:हूनच तो वाजवू लागले. मामा चकित झाले. त्यांनी भाच्याला प्रसिद्ध हार्मोनिअम वादक गणपतराव दीक्षित यांचे मार्गदर्शन मिळवून दिले. एका नातेवाइकाने  १९१९ साली मुंजीत त्यांना भिक्षावळ म्हणून एक बासरी  भेट दिली. क्रमाक्रमाने फुंक, स्वर व त्यातून रागरागिण्या, पदे साकार होत गेली.  मास्तरांचा पहिला जलसा नीलसिटी हायस्कूलमध्ये १९२० साली झाला.

सावळाराम मास्तरांना गणेशोत्सवात भरपूर कार्यक्रम मिळाले. दोन वर्षांनी त्यांनी चतुर संगीत महाविद्यालयात प्रवेश घेऊन पाच वर्षे शंकर प्रवर्तकांचे रीतसर मार्गदर्शन घेतले. यानंतर सावळाराम आपले  नातलग रावबहादूर वाडेगावकर यांच्याकडे राहू लागले व हे दोघे एकत्र अभ्यास करू लागले. वामन व सावळाराम या दोघांनी १९२८ मध्ये अंध विद्यालयाची स्थापना केली व मास्तरांनी संगीत शिक्षकाचे कर्तव्य पार पाडून बरेच विद्यार्थी तयार केले.

त्यांचा १९३० मध्ये विवाह प्रमिलाबाई देशपांडे यांच्याशी झाला. त्यांनी १९३३ मध्ये ‘सावळाराम संगीत विद्यालय’ ही स्वतंत्र संस्था काढून चालविली. तेथे त्यांनी गायन, बासरी, तसेच तबल्याचेही शिक्षण दिले. त्यांचे १९४८ पासून गायन व बासरीवादनाचे कार्यक्रम होऊ लागले. त्यांना मुंबईला बोलावून एच.एम.व्ही. कंपनीने त्यांच्या बासरीवादनाचे ध्वनिमुद्रण केले. तिलककामोद, काफी, शामकल्याण, भूप, दरबारी, ‘चंद्रिका ही जणू’ व ‘शूरा मी वंदिले’ या चिजांच्या व पदांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. बासरीच्या ध्वनिमुद्रणाचा पहिला मान महाराष्ट्रातून मास्तरांना मिळाला.

एकदा कलकत्त्याला एका बैठकीत गवयाचा तबलजी न आल्याने मास्तरांनी तबला वाजवून संगत केली. नागपूरला १९४४ मध्ये पहिली मोठी संगीत परिषद मास्तरांनी खूप परिश्रमाने आयोजित करून वाद्यवृंदात बासरी वाजवून वाहवा मिळविली.

मास्तरांनी अनेक विख्यात कलाकारांची हार्मोनिअम संगतही केली. त्यांनी गायन व बासरी- वादनात सुमती मुटाटकर,  उषा नंदनपवार,  यमुना शेवडे, कमल पावणस्कर,  कमलाबाई आठवले, केशवराव ठोमरे, देवीदास ओरके, भैयाजी पट्टलवार, नारायण मंगरूळकर असे अनेक शिष्य तयार केले. रा. स्व. संघाचे  सरसंघचालक माधव गोळवलकरांनीसुद्धा काही दिवस मास्तरांकडे बासरीचे अध्ययन केले होते.

सावळाराम मास्तर प्रेमळ, विनोदी, तसेच  स्वाभिमानी होते. त्यांची स्मरणशक्ती व माहिती दांडगी होती. पुढे नागपूर सोडून व संस्था बंद करून ते १९५५-५६ मध्ये गोंदिया येथील संगीतशाळेत शिक्षक म्हणून काम करू लागले.  तेथेच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. नागपूर येथे एकावन्नाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

वि.ग. जोशी

खर्डेनवीस, पुरुषोत्तम प्रल्हाद