Skip to main content
x

लाड, भाऊ दाजी

      प्राच्यविद्या पंडित, कुशल धन्वंतरी, स्त्री-शिक्षणाचे प्रसारक व मुंबईच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण कार्य करणारे, मुंबईकरांतील सर्वात तेजस्वी असा गौरव झालेले व्यक्तिमत्त्व. डॉ.भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. मूळ गाव पार्से म्हणून ते लाड-पार्सेकर हेही नाव लावीत. त्यांचा गोव्यातल्या मांजरे/मांद्रे गावी आजोळी जन्म झाला. वडिलांबरोबर वयाच्या दहाव्या वर्षी ते मुंबईत आले. त्यांना बुद्धिबळाची आवड होती. त्या खेळातल्या प्रावीण्यामुळे ते मुंबईच्या गव्हर्नरांपर्यंत जाऊन पोहोचले. गव्हर्नरला भाऊंच्या हुशारीचे कौतुक वाटले आणि त्याने भाऊंच्या शिक्षणाची सोय केली. त्यांचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत, तर पुढील शिक्षण एल्फिन्स्टन विद्यालयात व महाविद्यालयात झाले. ते खासगीरीत्या संस्कृतही शिकले.

ते एल्फिन्स्टन विद्यालयात शिक्षक व ग्रंथपाल म्हणून काम करत असताना, १८४५ साली ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली आणि शिक्षकाची नोकरी सोडून भाऊ वैद्यकीय शाखेचे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी म्हणून महाविद्यालयामध्ये दाखल झाले. त्याअगोदर, विद्यालयात असताना त्यांनी राजस्थान व गुजरात या भागांतल्या मुलींना गर्भावस्थेत मारून टाकण्याच्या प्रथेवर परिस्थिती सांगणारा एक निबंध लिहिला. तो उत्कृष्ट ठरून त्यांना त्या वेळेचे ६०० रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांना परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याबद्दल फिशर शिष्यवृत्ती मिळाली होती; पण त्यांनी ती नाकारली. कारण त्या वेळेला ते काही काळ नोकरीही करत होते. योग्य व्यक्तीला त्या पैशांचा फायदा व्हावा म्हणून भाऊंनी त्याग केला.

१८५१ साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पैशाचा हव्यास न बाळगता त्यांनी गरिबांची सेवा केली, मोफत औषधोपचार केला व दानधर्मही केला. ते कुष्ठरोग्यांवर उपचार करीत. ते कोणत्या औषधांचा उपचार करीत ते गुपित त्यांच्याबरोबरच काळाच्या पडद्याआड गेले. त्या उपचारांमध्ये ‘खष्ट’ या वनस्पतीचा ते वापर करीत असावेत, असा एक अंदाज आहे. खष्ट म्हणजे चौलमुद्रा ही सदापर्णी वनस्पती. वनस्पती गोळा करण्यासाठी ते संपूर्ण देशात फिरत, महाराष्ट्रातल्या रुग्णांवर उपचार करीत.

भाऊ उत्तम शल्यचिकित्सक होते. गर्भवतींची  सुखरूप सुटका करवण्यात त्यांची ख्याती होती. देवी टोचण्याची पद्धत त्यांनीच लोकप्रिय केली. सामाजिक आणि आरोग्यसेवेचे काम करणाऱ्या ‘बॉम्बे असोसिएशन’ या संस्थेचे ते चिटणीस होते. नंतर लंडनच्या ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’च्या मुंबई शाखेचे ते अध्यक्ष झाले. व्यवसाय करत असतानाच त्यांनी आयुर्वेदावर संशोधन केले. अनेक वनस्पती जमा करून त्यांचे गुणधर्म तपासले. भाऊंनी इतिहास संशोधनसुद्धा केले. त्यांनी इसवीसनपूर्व काळापासून इसवीसनाच्या बाराव्या शतकापर्यंतचा वृत्तान्त गोळा केला. त्यासाठी महाराष्ट्रातली लेणी, लेण्यांवरील शिलालेख, ताम्रपट, नाणी यांचा अभ्यास केला. लेण्यांच्या डोंगरकड्यांवरील लेखांच्या नकला करवल्या. जुन्या ग्रंथांची हस्तलिखिते गोळा केली. त्यांनी हिंदू धर्माप्रमाणे जैन व बौद्ध धर्माच्याही इतिहासाचा अभ्यास केला. त्यांनी आदिवासींच्या विविध भाषा अभ्यासल्या, त्यांच्यातल्या प्रचलित म्हणी जमविल्या. म्हणींद्वारा समाजाच्या स्वभावावर प्रकाश पडतो, असे त्यांचे मत होते.

भाऊंचा एक निष्कर्ष सर्वमान्य झालेला आहे. त्यांनी संशोधनानंतर असे दाखवून दिले की, नाण्यांवरील किंवा जुन्या शिलालेखांवरील व ताम्रपटांवरील एक विशिष्ट चिन्ह एक संख्या दर्शवते. त्या संख्येवरून निश्चित काळ समजून येतो. जुन्या राजपुरुषांच्या कार्यकाळाची अंतरे समजतात. भाऊंनी वराहमिहिर या गणिती ग्रंथकारांचा अंतकाळ इ.स. ५८७ हा निश्चित केला. त्यांनी मुकुंदराज, हेमाद्री, सायण, हेमचंद्र या व्यक्तींवर आणि कालिदासाचा ‘कालनिर्णय’ यावर शोधनिबंध लिहिले. त्यासंबंधात प्रसिद्ध प्राच्यविद्या संशोधक डॉ.रा.गो. भांडारकर व जर्मन विद्वान मॅक्समुल्लर यांनी गौरवोद्गार काढले आहेत. भाऊंनी ‘कुमारसंभव’ व ‘मेरुतुंगाचार्यांचा प्रबंध चिंतामणी’ हे ग्रंथ संपादित केले. लाडांनी वेगवेगळ्या विषयांवर एकून १९ निबंध लिहिले. ते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. भाऊंनी अनेक लेखकांना लेख आणि माहिती देऊन मदत केली. म्हणूनच कवी नर्मदाशंकर, शंकर पांडुरंग पंडित, बाजीराव तात्या,  रावजी रणजित यांनी आपले ग्रंथ भाऊंना अर्पण केलेले आहेत.

भायखळा येथील ‘राणीचा बाग’ म्हणजे आत्ताची ‘वीर जिजामाता उद्यान’ स्थापन करण्यात भाऊंचा पुढाकार होता. त्या वेळेला बागेमध्ये ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्यूझियम’ या नावाचे वस्तुसंग्रहालय तयार करण्यासाठी भाऊंनी निधी जमविण्यासाठी भरपूर कष्ट घेतले. कालांतराने म्हणजे भाऊंच्या स्मृतिशताब्दी वर्षात, १९७४ साली त्या संग्रहालयाचे नामकरण ‘डॉ.भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय’, असे करण्यात आले. भाऊंनी इतके कष्ट घ्यायचे कारण म्हणजे स्वत: भाऊंना पौराणिक वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद होता. त्यांनी जमविलेल्या चित्रांचा, नाण्यांचा, ताम्रपटांचा, शस्त्रांचा समावेश संग्रहालयात आहे. हस्तलिखितांमध्ये मध्ययुगीन काळातला शहानामा, सिकंदरनामा, हातिमताई, दिवाण मोगल, मोगलकालीन इतिहास यांवरील पर्शियन भाषेतील हस्तलिखिते आहेत. याशिवाय उपनिषद सूत्र, आचाङ्सूत्र, निरयावलिम, भगवतीसूत्र या हस्तलिखितांचाही समावेश आहे. संग्रहालयातून इतिहास शिकला जातो असे भाऊ म्हणत. संस्कृतच्या प्रसाराने मराठीचा उत्कर्ष होईल, असे त्यांचे मत होते. मराठी, गुजराती, इंग्रजी या तीनही भाषांमधून ते उत्तम भाषणे करीत. त्यांनी नाट्यकलेला प्रोत्साहन दिले म्हणूनच आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी भाऊंना पहिल्या दर्जाचा रसिक म्हणून मान दिला.

एका इंग्रज अधिकाऱ्याकडे एक शिंपी काम करत असे. अधिकारी शिंप्याचे पैसे देईना. उलट पैशांचा तगादा लावला म्हणून त्याने शिंप्याला मारहाण केली. मॅजिस्ट्रेटकडे शिंप्याविरुद्ध खोटी तक्रार केली. मॅजिस्ट्रेटने शिंप्याला २१ दिवसांची शिक्षा सुनावली. बिचारा शिंपी शिक्षा भोगून  गावाकडे निघून गेला. भाऊंना ही हकिकत समजली. त्यांना खोट्या तक्रारीचा पुरावाही मिळाला. शिंप्याने भाऊंच्या सहकार्याने हायकोर्टात तक्रार दाखल केली. हायकोर्टाने शिंप्याला नुकसानभरपाई देवविली. या सर्व खटाटोपात भाऊंचे दहा हजार रुपये खर्च झाले. युरोपियन समाजाचा रागही भाऊंनी सोसला. परंतु आपल्या गरीब देशबांधवावर परकीयांकडून झालेला अन्याय त्यांनी सहन केला नाही. एक प्रकारे हिंदी माणसाचा दर्जा त्यांनी वाढवला.

स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या ‘स्टुडंटस लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून दहा वर्षे पदावर होते. या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालविल्या जात. लोहार चाळीतल्या कन्याशाळेला ते दरमहा आर्थिक साहाय्य देत असत. याच शाळेचे पुढे ‘भाऊ दाजी कन्याशाळा’ म्हणून नामकरण झाले. स्त्री-शिक्षणाप्रमाणेच विधवाविवाह चळवळ, जातिव्यवस्था निर्मूलन, मादक पदार्थ सेवनाविरुद्ध मोहीम यांसाठी भाऊंनी कार्य केले. मुंबई विद्यापीठ स्थापन करण्यातही भाऊंचा पुढाकार होता. विद्यापीठ स्थापनेच्या काळी, म्हणजे १८५७ साली केलेल्या कायद्यामध्ये आश्रयदाते म्हणून भाऊंचे नाव आहे. त्याअगोदर भाऊ ज्या बॉम्बे असोसिएशनचे सचिव होते, त्या असोसिएशनतर्फे शिक्षण विकासाविषयी एक योजना ब्रिटिश संसदेला सादर केलेली होती.

१८५७ साली मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाप्रसंगी नामदार न्यायमूर्ती व्हाइस चॅन्सलर जेम्स गिब्ज यांनी ‘डॉ.भाऊ दाजींचा आदर्श नवीन पदवीधारकांनी ठेवावा,’ असे सांगितले. त्यांनी उत्कृष्ट कार्यपद्धती, संशोधनकार्य या बाबतीत भाऊंची वाखाणणी केली. वैद्यकीय व्यावसायिक, वकील, अभियंता अशा सर्वांनीच भाऊंना आपले प्रेरणास्थान मानले पाहिजे, असे गिब्ज म्हणाले. मुंबईत सुताच्या व कापडाच्या गिरणीची कल्पना भाऊंनी सर्वप्रथम मांडली. त्या कल्पनेला कावसजी नानाभाई दावर यांनी मूर्त स्वरूप देऊन मुंबईतील पहिली सूतगिरणी १८५४ साली सुरू केली. भाऊंच्या वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक व लोकोद्धारक कार्याची पावती म्हणून मुंबईचे नगरपाल या पदावर शासनाने त्यांची सलग पाच वर्षे नियुक्ती केली. भाऊ सभासद, उपाध्यक्ष, अध्यक्ष, फेलो, शिक्षक-मार्गदर्शक, अशा वेगवेगळ्या नात्यांनी २३ संस्थांशी संबंधित होते. त्या काळातली राष्ट्रहिताची अशी कोणतीही एखादी चळवळ नसेल, की जिच्या संस्थापनेत किंवा संवर्धनात डॉ.भाऊ दाजींचा हात नव्हता. ब्रिटिश स्वत:हून सत्ता सोडून जातील असा त्यांना विश्वास होता म्हणून त्यांनी ब्रिटिशांशी संघर्षाचा मार्ग न स्वीकारता, सामोपचाराचा व सहकार्याचा मार्ग निवडला. तरीही त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला पाठवलेल्या अर्जात कंपनी सरकारच्या चुका दाखवून दिल्या.

१८५९ साली इंग्रज सरकारने व्यापार व व्यवसाय यांच्यावर कर बसवण्याकरिता ‘लायसेन्स बिल’ पुढे आणले होते. बिलाला विरोध करण्यासाठी मुंबईतल्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांची सभा भरली होती. ‘सरकारविरुद्ध’ संघर्षाची भूमिका न घेता आपले म्हणणे मांडावे, असे भाऊंनी सांगितले. त्याला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला व आपल्या म्हणण्याचा अर्ज तयार करण्याची जबाबदारी भाऊंवर येऊन पडली. भाऊंनी तसा अर्ज पाच हजार सह्यांनिशी सरकारकडे पाठवला. बुद्धिवैभव, विद्वत्ता, भूतदया, औदार्य, त्याग, धैर्य, समता, देशप्रेम, निष्कलंक आचरण वगैरे गुणांत हिंदी लोक कमी पडत नाहीत, हे त्यांनी सिद्ध केले.

भाऊंना उत्तर आयुष्यात आर्थिक फटका बसला, प्रकृती बिघडली. त्यांनी ज्यांना मदत केली, ज्यांच्यासाठी काही उपक्रम सुरू केले, त्यांनी भाऊंकडे दुर्लक्ष केले. या वर्तनाची ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रानेसुद्धा दखल घेऊन लिहिले. अनेक नामवंतांनी भाऊंचा द्वेष केला, त्यांत विदेशी व स्वदेशीसुद्धा होते. त्यांनी भाऊंचे पाय मागे खेचले; कारण त्यांच्याकडे भाऊंची महत्ता समजण्याची कुवत नव्हती.

जयंत एरंडे

लाड, भाऊ दाजी