Skip to main content
x

लिमये, शशिकांत दत्तात्रेय

       शिकांत दत्तात्रेय लिमये यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रेय रामचंद्र लिमये हे पुण्यातील नावाजलेले सल्लागार अभियंता आणि मूल्यमापक होते.

       शशिकांत लिमये यांची आई कुमुदिनी या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यालयाच्या पदवीधर होत्या. शशिकांत यांच्या वडिलांना पुरातत्त्व विज्ञान, इतिहास, शिवकालीन किल्ले, योग, वास्तुशास्त्र, अध्यात्म अशा विविध विषयांचा व्यासंग होता. घरी या सर्व विषयांच्या पुस्तकांचा मोठा संग्रह होता. घरात देशभक्तीचे वातावरण होते. शाळेत असताना स्काउट आणि महाराष्ट्र मंडळ, पुणे येथील सांघिक व्यायाम प्रकार, खेळ आणि इतर उपक्रमांचा त्यांना व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये खूप फायदा झाला.

        लिमये यांचे शालेय शिक्षण पुणे येथील भावे प्राथमिक शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. १९६५ ते १९६७ या कालावधीत त्यांनी पुणे येथील फर्गसन महाविद्यालय आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथून बी.एस्सी. पूर्ण केले.

       १९७१मध्ये त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकीची (बी.ई.सिव्हील) पदवी घेतली. या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांकात उत्तीर्ण होऊन त्यांनी ‘शारंगपाणी सुवर्णपदक’ मिळवले. १९७३ मध्ये त्यांनी मुंबई ‘आयआयटी’ मधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या विषयात एम.टेक.चे शिक्षण पूर्ण केले.

        भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांचे चरित्र वाचून शशिकांत यांच्या मनात अभियांत्रिकी प्रशासक बनण्याची प्रेरणा निर्माण झाली. एक कुशल अभियंता समाजाला केवढ्या सुविधा प्राप्त करून देऊ शकतो, याची जाणीव त्यांना झाली. ‘हिराकूड’ प्रकल्पाचे जनक डॉ. खोसला, ‘नदी जोड’ प्रकल्पाची कल्पना मांडणारे डॉ. के.एल. राव यांच्या कार्याने ते प्रेरित झाले. या क्षेत्रात काम करताना सामाजिक आणि विकासात्मक सुधारणा करण्याची संधी आणि त्यामुळे घडणारी देशसेवा या सर्व गोष्टींमुळे शशिकांत यांनी भारतीय अभियांत्रिकी सेवेत काम करण्याचे ठरवले.

          १९७३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेमध्ये ते संपूर्ण देशात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेमध्ये  त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याच वर्षी त्यांना अमेरिकेमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी देण्यात येणारी अत्यंत मानांकित अशी ‘दोराब टाटा’ शिष्यवृत्ती मिळाली, तसेच अमेरिकेतील एका सुप्रसिद्ध विद्यापीठात प्रवेशही मिळाला. परंतु शशिकांत यांनी ही संधी ठामपणे नाकारून भारतीय रेल्वेमध्येच देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. १९७१ मध्ये पश्चिम रेल्वेमध्ये त्यांची प्रथम नियुक्ती साहाय्यक अभियंता या पदावर करण्यात आली.

           १९७७ ते १९७९मध्ये लिमये प. रेल्वेमध्ये सवाई माधोपूर येथे साहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. त्या वेळी त्यांनी सवाई माधोपूर जंक्शन व बाजार यांमध्ये असलेल्या सामाईक ड्रेनेजच्या आमूलाग्र सुधारणेची योजना अमलात आणली.       

           संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्पाचा (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) ‘इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिज इंजिनिअरिंग’ या संस्थेत पुणे येथे राष्ट्रीय उपप्रकल्प निर्देशक या पदावर त्यांनी काम केले. या प्रकल्पात लिमये यांच्यासह बारा रेल्वे अभियंत्यांना अमेरिका व इंग्लंडमध्ये वर्षभरासाठी आधुनिक पूल विज्ञानावर अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यानंतरही त्यांनी पाश्चात्त्य पूल तज्ज्ञांकडून पुण्यात विविध अभ्यासक्रम राबवून घेतले. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लिमये आणि त्यांच्या गटाने अविरत कष्ट घेतले. या प्रकल्पानंतर काही वर्षांनी त्यांची कोकण रेल्वेच्या मुख्य अभियंता पदावर नेमणूक झाली. १९९० ते १९९८ या कालावधीत लिमये यांनी कोकण रेल्वेत काम केले.

           कोकण रेल्वे मार्गावरील सर्व पूल, बोगदे, खडीविरहित लोहमार्ग, यार्ड्स यांचे डिझाइन शशिकांत लिमये यांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण झाले. या वेळी ज्येष्ठ अभियंता ई. श्रीधरन यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. कोकण रेल्वेच्या ७४० कि.मी. मार्गाच्या सर्वेक्षणापासून ते पूर्णत्वापर्यंत संपूर्ण बांधकामामध्ये लिमये यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पूल अभिकल्प व बांधकामातील अनेक नवीन कल्पना सत्यात उतरण्याची संधी लिमये यांना कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये मिळाली. यांतील बऱ्याच कल्पना पुढे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, दिल्ली मेट्रो या ठिकाणी वापरण्यात आल्या. कोकण रेल्वेच्या कार्यकाळातील लिमये यांची अभिनव आणि सर्वोत्तम कामगिरी म्हणजे गोव्यातील मांडवी नदीवरील काम होय. मांडवी पुलाच्या आरेखन आणि नियोजनापासून ४०० मीटर लांबीचा अजस्त्र गर्डर ‘बार्ज माउण्टेड क्रेन’ वापरून, उचलून ‘लॉन्च’करण्यात आला. स्वत: लिमये ही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी मानतात.

            १९८० मध्ये लिमये पश्चिम रेल्वेचे मुख्य अभियंता या पदावर काम करत होते. त्या वेळी पावसाळ्यात कोटा व मथुरेवरील एक पूल पुरात वाहून गेला व लोहमार्ग अवरुद्ध झाला. गाडीच्या लोहमार्गावरची खडी पुराने वाहून गेल्याने कोट्याहून दिल्लीकडे जाणारी  फ्रँटिअर मेल कोटा-बीना-भोपाळ मार्गावर वळवली. परंतु दुर्दैवाने ती गाडी कोटागुणा सेक्शनमध्ये अडकली. रेल्वेच्या पुढील व मागील लोहमार्गावरची खडी पुराने वाहून गेली व मार्ग खचला. अशा आणीबाणीच्या प्रसंगी लिमये यांनी तातडीने सर्व  सूत्रे हाती घेतली. लिमये स्वत:, वरिष्ठ रेल्वे-पथनिरीक्षक व सात-आठ गँगमनना घेऊन मोटर ट्रॉलीने सेक्शनमध्ये गेले. लोहमार्गाखाली खडी भरून लोहमार्ग सुरळीत केला गेला.

             १९९८ ते १९९९ मध्ये शशिकांत लिमये द.पू. रेल्वेमध्ये कोलकाता येथे मुख्य रेल्वे पथ-अभियंता होते. १९९९ ते २००१ या काळात लिमये यांची नियुक्ती प. रेल्वेमध्ये अजमेर येथे ‘मंडळ रेल्वे प्रबंधक’ या पदावर झाली होती. याच वेळी त्यांच्यावर रेल्वे मंत्रालयात सहसचिव जबाबदारीदेखील होती.

             अजमेर शहरातील जवळजवळ २५% जमीन रेल्वेच्या अखत्यारीत आहे. अजमेर शहराच्या विकास नियोजनामधील रस्ते व सांडपाण्यासंबंधीच्या योजना अमलात आणताना अजमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या साहाय्याने रेल्वे मंडळ प्रबंधक या नात्याने त्यांनी रेल्वेसंबंधीच्या अडचणी तातडीने दूर केल्या.

             आपले काम सचोटीने करणाऱ्या शशिकांत लिमये यांना कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच स्वत्त्वाची कसोटी घेणारा अनुभव आला. सवाई माधोपूर येथे साहाय्यक अभियंता असताना कंत्राटदाराचे काम तपासून बिले देण्याची जबाबदारी लिमये यांच्यावर होती. एक बिल पास केल्यावर एका कॉन्ट्रॅक्टरने लिमये यांना काही रक्कम देऊ केली. परंतु लिमये यांनी आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून ती नाकारली. यामुळे ही बातमी सर्व कॉन्ट्रॅक्टरांमध्ये पसरून पुन्हा त्यांना लाच देण्यास कोणीही धजले नाही. सरकारी सेवेत काम करताना तुम्हांला भ्रष्ट बनवण्यासाठी अनेक लोक टपलेले असतात; परंतु आपण आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही, उलट आपल्याबद्दलचा आदर अधिक वृद्धिंगत होतो याचे उदाहरण लिमये यांनी घालून दिले. २००१मध्ये शशिकांत लिमये वयाच्या एकावन्नाव्या वर्षी ‘मंडळ रेल्वे प्रबंधक’ ह्या पदावरून निवृत्त झाले. २००१ ते २००६ या कालावधीत त्यांनी ‘ओवन विल्यम्स’ या ब्रिटिश फर्ममध्ये लंडन-ग्लासगो रेल्वेमार्गाच्या सुधारित डिझाइनचे काम केले.

             २००६ पासून आतापर्यंत ते ‘स्तूप कन्सल्टंट’ या सुप्रसिद्ध इंडो- फ्रेंच कंपनीत कार्यकारी निर्देशक या पदावर कार्यरत आहेत. त्या योगे नवीन पिढीतील अभियंत्यांना त्यांच्या पुलाचे डिझाइन या क्षेत्रातील अनुभवांचा फायदा होत आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेमध्येदेखील अनेक समित्यांवर ते मार्गदर्शक म्हणून काम करत असून आपल्या ज्ञानाचा उपयोग करीत आहेत. सध्या ते एम.एम.आर.डी.ए.च्या ‘मोनोरेलसाठीच्या’ तांत्रिक सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.

             शशिकांत लिमये यांच्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. १९९६ मध्ये त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे ‘एस.बी.जोशी स्मृती पारितोषिक’ देण्यात आले. २००० मध्ये मुंबई आय.आय.टी.चा सन्माननीय वैशिष्ट्यपूर्ण ‘माजी विद्यार्थी पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवण्यात आले. १९९८ मध्ये कोकण रेल्वे उभारणीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘कोकण रेल्वे प्रॉजेक्ट पदक’ देण्यात आले. लिमये यांना पर्यटनाची आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्याची आवड आहे. सध्या ते मुंबई येथे स्थायिक झाले आहेत.

- संध्या लिमये

लिमये, शशिकांत दत्तात्रेय