Skip to main content
x

लिमये, उपेंद्र मधुकर

     उत्स्फूर्त अभिनय व भारदस्त आवाजाची देणगी लाभलेला अभिनेता म्हणून उपेंद्र लिमये यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवला आहे. उपेंद्र लिमये यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव वसुधा. भारती विद्यापीठातून उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यावर पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राची नाट्यशास्त्रातील पदवी त्यांनी मिळवली. यानंतर त्यांनी मास कम्युनिकेशन या विषयात एम.ए.ची पदवीही पुणे विद्यापीठातून प्राप्त केली. उपेंद्र यांच्या अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात नाटकांपासून झाली. ‘कोण म्हणतं टक्का दिला’ या अत्यंत गाजलेल्या नाटकातील भूमिकेमुळे ते प्रकाशात आले. करिअर मार्गी लागलेले नसताना, स्वाती या वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी त्यांचा प्रेमविवाह झाला. नाटकांतील अनुभवानंतर चित्रपटांमध्ये भूमिका करण्यासाठी उपेंद्र लिमये मुंबईमध्ये दाखल झाले. ‘मुक्ता’ या १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासूनच त्यांची अभिनय कारकिर्द सुरू झाली.

     मराठी चित्रपटांमध्ये त्यांच्या वाट्याला दुय्यम भूमिका येत होत्या, मात्र छोट्या भूमिकांमध्येही त्यांच्या अभिनयाची छाप पडत होती. ‘बनगरवाडी’, ‘सरकारनामा’, ‘कैरी’ आदी चित्रपटामध्ये त्यांनी या काळात काम केले. मात्र, मधुर भांडारकर यांनी त्याला ‘चांदनी बार’मध्ये महत्त्वाची भूमिका दिली व त्यांच्या करिअरने मोठी झेप घेतली. मराठीमध्ये ‘सावरखेड ः एक गाव’ या व्यावसायिक चित्रपटामध्ये काम करीत असतानाच मधुर भांडारकर यांच्याच ‘पेज ३’ या चित्रपटातील त्याची इन्स्पेक्टर भोसलेची भूमिका खूप गाजली. त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले व हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही त्याचा जम बसला.

     मराठीमध्ये ‘जत्रा’, ‘ब्लाइंड गेम’, ‘उरुस’सारखे चित्रपट गाजत होते, तर हिंदीमध्ये ‘ट्रॅफिक सिग्नल’ व थेट अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अभिनयाची जुगलबंदी असलेला ‘सरकार राज’ हा चित्रपटही चर्चेत होता. ‘उरुस’मधील त्यांचा मुलीला जत्रेत सोडून येणारा व नंतर मोडून पडलेला बाप वाहवा मिळवत होता, तर ‘सरकार राज’मधील छोटी भूमिका अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुक मिळवून जात होती. या काळात करिअर एका टप्प्यावर असताना उपेंद्र यांना राजीव पाटील दिग्दर्शित ‘जोगवा’ या चित्रपटामध्ये स्त्री-वेषातील जोगत्याची भूमिका मिळाली. या चित्रपटातील बोलक्या अभिनयाच्या जोरावर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे त्यांना अनेक चित्रपटांसाठी विचारणा होऊ लागली. मात्र, भूमिकांच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असलेल्या उपेंद्र यांनी त्यानंतरही ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘धूसर’, ‘तुह्या धर्म कोंचा?’ व राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ठसा उमटवलेल्या ‘धग’सारख्या निवडक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 'मूळशी पॅटर्न'मधली त्यांची इन्सपेक्टरची भूमिकाही गाजली. भूमिका स्वीकारताना सामाजिक भान जपणारा व झोकून देत भूमिकेचे सोने करणाऱ्या या अष्टपैलू अभिनेत्याकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा आहेत.

- महेश बर्दापूरकर

लिमये, उपेंद्र मधुकर