Skip to main content
x

लक्ष्मणप्रसाद, जयपूरवाले

गुणी गंधर्व 

          क्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांचा जन्म गुजरातमधल्या धांग्रधा या संस्थानात, जयपूर-बिकानेरच्या राजभट्ट घराण्यात झाला. त्यांचे वडील पंडित बलदेवप्रसाद हे इंदूर संस्थानात दरबार गायक होते. लक्ष्मणप्रसाद सात ते आठ वर्षांचे असताना त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. नंतर त्यांचा सांभाळ त्यांचे वडील बंधू पंडित मुरलीप्रसाद यांनी केला. घरातील संगीत वातावरण, वडिलांकडून मिळालेले प्राथमिक शिक्षण, स्वत:च्या आवाजाची आणि बुद्धीची जोड या शिदोरीवर ते कानपूरला ‘श्रीकृष्ण थिएटर कंपनी’ या नाट्यसंस्थेत कामाला लागले.

          उत्तम अभिनय आणि तिन्ही सप्तकांत सहजतेने संचार करणारा सुरेल आणि पल्लेदार आवाज यांच्या बळावर त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. त्यांना भरपूर पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. पुढे त्यांनी नाटक कंपनी विकत घेतली. त्यांचा विवाह जयपूर दरबारातले नर्तक पंडित बद्रीप्रसाद यांच्या कन्येशी झाला.

           लक्ष्मणप्रसाद यांचा मूळ पिंड गायकाचा असल्यामुळे नाट्य व्यवसायात त्यांचे मन रमत नव्हते. त्यांनी पुढे कुट्टू गोपालजी यांचे शिष्यत्व पत्करले. कुट्टू गोपालजी हे लाडली महाराज ऊर्फ कुंवर श्याम यांचे शिष्य होते. ते हरिदास गोस्वामी (गुंसाई) परंपरेतील होते. गोपाल गायक, गुंसाई गोस्वामी पन्नालालजी आणि लाडली महाराज अशी ही ४०० ते ४५० वर्षांची परंपरा होय. याच परंपरेतील ‘सेनिया’ ही मुस्लीम शाखा मियाँ तानसेन यांच्यापासून निर्माण झाली आहे. या गुंसाई परंपरेतील कुंवरश्यामजींचे घराणे राधागोविंद मंदिरात संगीत भक्ती करीत असे.

           गुरू कुट्टू गोपालजी यांच्याकडून लक्ष्मणप्रसाद यांनी धृपद, धमार, ख्याल, ठुमरी, होरी या विविध अंगांच्या गायकीचे शिक्षण घेतले. या सकस तालमीमुळे वयाच्या सत्तावीस-अठ्ठाविसाव्या वर्षी पंडितजींची त्या वेळच्या प्रसिद्ध गवयांत गणना झाली. उत्स्फूर्त काव्यरचना करण्याचा भट्ट घराण्याचा वारसा आणि योग्य स्वरलयीच्या योजनेने त्यांनी आपली एक स्वतंत्र शैलीच बनविली होती.

           त्यांची १९४४च्या सुमारास दिल्ली आकाशवाणीवर म्युझिक सुपरवायझर म्हणून नियुक्ती झाली. पुढे १९५०च्या सुमारास त्यांचे मेहुणे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पंडित खेमचंद प्रकाश यांनी त्यांना मुंबईला आणले. त्यानंतर त्यांनी आपले जीवन भारतात सर्वत्र मैफली करणे, आपल्या काव्यप्रतिभेने वेगवेगळ्या बंदिशी तयार करणे यात व्यतीत केले. ‘आत्मज्ञान’ व ‘कुंवर श्याम घराणा’ ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. राजस्थान सरकारने त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. जालंधर येथे झालेल्या हरवल्लभ परिषदेमध्ये ‘गुणी गंधर्व’ ही पदवी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

           मुंबईला माटुंगा येथे राहत असलेल्या बाबा भगवानदासजी यांच्या प्रेरणेने पंडित त्यांच्या गायकीला मानमान्यता मिळाली. पंडितजी आणि त्यांचे गुरू हे कृष्णभक्त होते. रासलीला आणि कृष्णवर्णनपर बंदिशी ही घराण्याची खासियत. रागांच्या नावांवरही त्यांनी बंदिशी केल्या. छंद प्रबंध, धृपद अंगाचे आलाप, सुसंगत बढत, वक्र गतीतल्या टप्पा अंगाच्या ताना, दुप्पट-चौपट लयीची सरगम आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या बंदिशी ही कुंवर श्याम घराण्याची वैशिष्ट्ये होत. मुंबईच्या जसलोक रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाले.

            - सुनंदा आपटे

लक्ष्मणप्रसाद, जयपूरवाले