Skip to main content
x

लोखंडे, प्रज्ञा

     प्रज्ञा लोखंडे (पवार) यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण एम.ए. पर्यंत झाले आणि त्यांचे पीएच.डी.चे संशोधन सुरू आहे. ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथे त्या व्याख्यात्या व मराठी विभागप्रमुख म्हणून काम करतात. ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकाच्या त्या संपादक आहेत.

     दलित कवितेच्या तिसर्‍या पिढीचे प्रतिनिधित्व करणार्‍या कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जातात. ‘अंतस्थ’ (१९९३), ‘उत्कट जीवघेण्या धगीवर’ (२००२), ‘मी भीडवू पाहतेय समग्राशी डोळा’ (२००७) हे त्यांचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत.

     ख्यातनाम लेखक दया पवार यांची कन्या असल्याने त्यांना लेखनाचा वारसा घरातच मिळाला. आई हिरा पवार या प्राथमिक शिक्षिका, मुख्याध्यापिका, कार्यकर्त्या होत्या. प्रज्ञा पवारांच्या अगदी पहिल्यावहिल्या ‘कोकिळा’ या कवितेतही स्त्रीचे शोषण आणि शोषणमुक्त होण्यापर्यंतचा प्रवास हे आशयसूत्र लक्षात येते.

     त्यांच्या तीन कवितासंग्रहांमध्ये दलित कवितेला सांकेतिकतेच्यापलीकडे नेण्याची शक्ती असल्याचे मत जाणकारांनी नोंदविले. वास्तवाचे अचूक भान व्यक्त करीत स्त्री आणि संस्कृती यांसंबंधीच्या प्रचलित मांडणीला त्यांनी मुळातून छेद दिला. त्यांची कविता मानवमुक्तीशी नाते सांगणारी आहे.

     त्यांना अनेक मोलाचे पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार, विशाखा पुरस्कार, आळंदी साहित्यसंमेलनातील बा.सी. मर्ढेकर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाचा महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार हे त्यांतील प्रमुख होत.

     ‘केंद्र आणि परीघ’ (२००४) हा लेखनसंग्रह, ‘धादांत खैरलांजी’ (२००७) हे नाटक ही त्यांची अन्य प्रकाशित पुस्तके. ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ हा नामदेव ढसाळ यांच्या निवडक कवितांचा संग्रह त्यांनी सतीश काळसेकर यांच्याबरोबर संपादित केलेला आहे.

     - नरेंद्र बोडके

लोखंडे, प्रज्ञा