Skip to main content
x

लोणकर, प्रतीक्षा प्रभाकर

     नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून अत्यंत यशस्वी कारकिर्द असणार्‍या अभिनेत्री प्रतीक्षा प्रभाकर  लोणकर यांचा जन्म औरंगाबादचा. तेथेच सर्व शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नाट्य विषयातली पदविकाही प्राप्त केली आणि अभिनयातच  कारकिर्द करायची, या उद्देशाने त्या मुंबईला आल्या.

     ‘लग्न’ या जयवंत दळवी लिखित नाटकातून प्रतीक्षा लोणकर यांना व्यावसायिक नाट्यक्षेत्रात प्रवेश मिळाला. नंतरच्या ‘चारचौघी’ नाटकातल्या सर्वात धाकट्या मुलीच्या-विनीच्या अभिनयाने त्यांना या क्षेत्रात ओळख मिळाली. या नाटकाचे ८०० प्रयोग झाले. ग्लॅमर, प्रसिद्धीपेक्षा कामाचा मोबदला आणि समाधान या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिले. ‘काळोख’ या मालिकेपासून त्यांचा दूरदर्शनवरील प्रवास सुरू झाला.

     ‘एक फुल चार हाफ’ या पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित चित्रपटात प्रतीक्षा लोणकर यांना अभिनयाची संधी मिळाली. लक्ष्मीकांत बेर्डे, किमी काटकर, प्रिया अरुण, दीपक शिर्के यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. नंतर ‘सुर्वंता’ या चित्रपटासाठी प्रथमच प्रतीक्षा लोणकर यांनी नायिकेची भूमिका साकारली. या चित्रपटाचे नायक होते तुषार दळवी. ‘पैज लग्नाची’ या चित्रपटात सतत पैज लावून जीव धोक्यात घालणार्‍या आपल्या बिलंदर मैत्रिणीला धडा शिकवणाऱ्या सुहृदाची भूमिका त्यांनी नेमकेपणाने साकारली आहे.

      प्रतीक्षा लोणकर यांचा अभिनय खर्‍या अर्थाने पाहता आला तो ‘भेट’ चित्रपटात. रोहिणी कुलकर्णी यांच्या ‘भेट’ या कथेवर आधारित या चित्रपटात मुलाच्या भेटीसाठी कासावीस झालेल्या आईची भूमिका त्यांनी अतिशय समरसतेने केली. या चित्रपटातल्या अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

      नागेश कुकनूर दिग्दर्शित ‘इक्बाल’ या चित्रपटातही प्रतीक्षा लोणकर यांनी आईची भूमिका केली. या चित्रपटाचे नायक होते श्रेयस तळपदे. या हिंदी चित्रपटाने त्यांना देशभर ओळख व नाव मिळवून दिले. नंतर ‘डोर’ चित्रपटातही त्यांनी श्रेयसच्या आईची भूमिका केली.

     ‘जमलं हो जमलं’, ‘सरकारनामा’, ‘थैमान’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘एवढंसं आभाळ’ यासारख्या चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. ‘सरकारनामा’ चित्रपटातल्या भूमिकेला साहाय्यक अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार, ‘इक्बाल’साठी फिल्म फेअर पुरस्कार, तर ‘भेट’साठी मटा सन्मान, स्क्रीन अ‍ॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तसेच ‘एवढंसं आभाळ’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना पुणे इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅवॉर्ड मिळालेले आहे. ‘मिसेस माधुरी दीक्षित’सारखी विनोदी मालिका व ‘येळकोट’ या ब्लॅक कॉमेडी नाटकातही त्यांनी काम केलेले आहे. प्रायोगिक रंगभूमीवरच्या या नाटकाला मोठे यश मिळाले. ‘आंगन टेढा’ या नावाने हिंदी रंगभूमीवरही हे नाटक खूप चालले.  तसेच त्यांनी ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’ या नाटकात वैदेही पटवर्धनची रंगवलेली भूमिकाही लोकप्रिय ठरली. इतर कामांबरोबरच प्रतीक्षा लोणकर यांना खास ओळख मिळवून देणारी मालिका म्हणजे ‘दामिनी’. या मालिकेच्या लोकप्रियतेचे स्थान आणि प्रतीक्षा लोणकर यांचेही स्थान त्यांच्या अभिनय कारकिर्दीत विशेष आहे. ‘मूव्ह’, ‘चहा’, ‘पॅराशूट ऑईल’, अशा विविध उत्पादनांच्या जाहिरातीमधूनही प्रतीक्षा लोणकर यांचा चेहरा झळकला होता.

     ‘तुकाराम’, ‘मोकळा श्वास’ हे त्यांचे आणखी काही यशस्वी चित्रपट आहेत. नाटककार प्रशांत दळवी यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला.

- संपादित

लोणकर, प्रतीक्षा प्रभाकर