Skip to main content
x

माचवे, प्रभाकर बळवंत

     महाराष्ट्राबाहेर राहून तेथील भाषेसह मराठी भाषेची ज्यांनी सातत्याने सेवा केली त्यामध्ये डॉ. प्रभाकर माचवे हे एक प्रमुख नाव आहे. काव्य, समीक्षा आणि भाषांतर या क्षेत्रांत त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. ग्वाल्हेर येथे जन्मलेले माचवे यांचे शिक्षण रतलाम व इंदूर येथे झाले. तत्त्वज्ञान आणि इंग्रजी साहित्य या दोन विषयांत आग्रा विद्यापीठाची एम.ए.ची पदवी त्यांनी संपादन केली. ‘हिंदी व मराठी के निर्गुण काव्य का तुलनात्मक अध्ययन’ या विषयावर १९५८मध्ये त्यांना डॉक्टरेट मिळाली. १९३८ ते १९४८ या काळात उज्जैनला तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग, साहित्य अकादमी, अमेरिका, श्रीलंका आणि जर्मनी येथील विद्यापीठे, भारतीय भाषा परिषद कलकत्ता इत्यादी अनेक संस्थांत त्यांनी प्रशासकीय व प्राध्यापक आदी विविध पदे साधारणतः १९५४ ते १९७५ या काळात भूषवून प्रत्येक ठिकाणी आपल्या विद्वत्तेची व प्रशासकीय कौशल्याची छाप पाडली.

     त्यांनी विविध प्रकारचे ऐंशीपेक्षा जास्त ग्रंथ लिहिले असून त्यांत कादंबरी, कविता, समीक्षा, एकांकिका, निबंध, चरित्र इत्यादी अनेक आकृतीबंधांचा समावेश असून त्यांत भाषांतरित ग्रंथांचाही समावेश आहे. त्यांच्या ग्रंथांचे अन्य भाषांमधून अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. हिंदीतून त्यांचे विपुल लेखन झाले असून प्रामुख्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली येथील अनेक साहित्यविषयक नियतकालिके व दैनिके-साप्ताहिके यांमधून प्रभाकर माचवे हे नाव आघाडीवर असे.

     माचवे यांचे वाचन चौफेर होते. इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषांमधील साहित्यविषयक वाचन अद्ययावत व सर्व प्रकारांतील होतेच; पण अन्य भारतीय भाषांतील प्राचीन ते समकालीन वाङ्मयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ‘जगजीवनराम : व्यक्ती आणि विचार’ या १९७७मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ग्रंथातून तत्कालीन एका प्रमुख मागासवर्गीय राजकीय नेत्याचा जीवनप्रवास स्पष्ट झाला असून काळाच्या दृष्टीनेही पुस्तकप्रसिद्धीचा कालखंड ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. मराठी साहित्य अनुवादित करून भारतीय स्तरावर तत्कालीन परिप्रेक्ष्यात नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

- मधू नेने

माचवे, प्रभाकर बळवंत