माळी, गजमल नारायणराव
गजमल नारायणराव माळी यांनी मराठी विषय घेऊन एम.ए. ही पदवी मिळवली. त्यांनी अनेक संस्थांमधून उपाध्यक्ष, अध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत. प्रारंभी ते एस.एस.सी. बोर्डात क्रमिक पुस्तक मंडळाचे सदस्य होते. पुढे ते महाराष्ट्र राज्य तमाशा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, म.जोतिबा फुले शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष, औरंगाबाद येथील सत्यशोधक समाजसंस्थेचे अध्यक्ष, सावित्रीबाई फुले ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष; औरंगाबादच्या पं. जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य अशा पदांवर राहून त्यांनी कार्य केलेले आहे.
साहित्यिक म्हणून त्यांचे लेखन थोडे असले, तरी लक्षणीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे निवडक असे शंभर अभंग नेमले होते. त्या अभंगांचा अर्थ, त्यांचे विवेचन आणि तुकोबांचे चरित्र देऊन ‘तुकारामांचे निवडक शंभर अभंग’ या नावाचे पुस्तक माळींनी संपादित केले.
‘गंधवेणा’ हा प्रा. माळी यांचा कवितासंग्रह आणि ‘कामायनी’ ही लघुकादंबरी आहे. ‘राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज’ हा त्यांचा समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील ग्रंथ आहे. याशिवाय त्यांनी ‘लोकसाहित्य शब्दकोश’ही तयार केलेला आहे.
त्यांची मनाला चटका लावणारी कृती म्हणजे ‘नागफणा आणि सूर्य’ हे दीर्घकाव्य! कवीने आपल्या मनात सामाजिक विषमतेमुळे झालेला अन्याय त्याच्या ओल्या जखमा जाणल्या होत्या. आपल्या तीसएक वर्षांच्या परीटघडीच्या जीवनात झाकून ठेवल्या होत्या. पण मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या वेळी जे आंदोलन झाले; त्यामुळे त्या जखमा उघड्या झाल्या. कवीच्या गरीब पित्याचे शेतीतील आणि आईचे घरातील कष्ट, आंदोलनकाळात दलितांवर झालेले अत्याचार यांतून कवीच्या मनात साठलेले दुःख बाहेर पडले.
या दीर्घ काव्याचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात मराठवाड्याची परंपरा सांगितलेली आहे. दुसर्या भागात कवीच्या आईवडिलांचे आणि एकंदरच दलितांचे अंधारलेले कष्टमय जीवन यांचे वर्णन आलेले आहे, आणि तिसर्या भागात मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या वेळी दलितांवर झालेल्या अत्याचारांचे वर्णन आलेले आहे. कवीला या सर्वांचे कमालीचे दुःख आहे. पण त्याच्या मनात प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध विद्रोह करावा, अशी भावना नाही. कारण सामाजिक संघर्षाची परिणती मानवतेत व्हावी, असे त्यांना वाटते. अशा रितीने आपल्या मर्यादित साहित्यसंपदेद्वारा प्रा. माळी यांनी मनावर ठसा उमटविला आहे.
- शशिकांत मांडके