Skip to main content
x

माळी, वसंत अनंत

व्यक्तिचित्रकार

           कुंचल्याच्या रुंद व तिरप्या फटकार्‍यांमधून प्रखर, विरोधी रंगछटांचा वापर करीत तैलरंगात प्रभावी व्यक्तिचित्रे साकारणारे चित्रकार म्हणून व्ही.ए. माळी ख्यातनाम आहेत. या सोबतच एक यशस्वी व्यावसायिक व्यक्तिचित्रकार म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.

           वसंत अनंत माळी यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील अनंत व आजोबा मल्हार हेही चित्रकारच होते. त्यामुळे लहान वयातच त्यांना आजोबा व वडील यांच्याकडून चित्रे रेखाटायची प्रेरणा लाभली. त्यांच्या आईचे नाव मुक्ताबाई होते. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरमधील न्यू हायस्कूलमध्ये झाले. माळी केवळ दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

           वडिलांचे मित्र कोलवालकर यांनी वसंत माळी यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली व त्यांना मुंबईला बोलावले. घराजवळच्याच इंपीरिअल शाळेमध्ये त्यांचे शिक्षण सुरू झाले. तेथे कलाशिक्षक असलेल्या गाडगीळ मास्तरांनी या मुलाची चित्रकलेतील प्रगती पाहून त्यांना चित्रकार केतकरांच्या वर्गाला घालण्याचा सल्ला दिला व मामांनी तशी व्यवस्था तत्परतेने केली. गिरगावातील केतकरांच्या क्लासचा माळींना फायदा झाला. चित्रकलेतील प्रगती पाहून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना एकदम तिसर्‍या वर्षाला प्रवेश मिळाला.

           जे.जे.मधील धुरंधर, तासकर, आगासकर, चुडेकर, नगरकर इत्यादी नामवंत कलाशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे माळींची कला बहरली. व्यक्तिचित्रणावर त्यांनी भरपूर मेहनत केली. खास करून चुडेकर मास्तरांच्या विरोधी रंगछटांच्या व धाडसी फटकारे असणार्‍या चित्रांचा प्रभाव त्यांच्यावर अधिक पडला. पुढे त्यांनी स्वत: विकसित केलेल्या शैलीवरही तो प्रकर्षाने जाणवतो. १९३२ मधील पदविका परीक्षेचा निकाल अतिशय कडक लागून अठरा पैकी फक्त पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यात माळी यांचेही नाव होते.

           कोलवालकर मामांनी माळी यांना छायाचित्रणाचे शिक्षण दिले होते; पण त्यांनी उत्कृष्ट चित्रकार म्हणून नाव मिळवावे यासाठी प्रोत्साहन दिले. आपल्या प्रिन्सेस स्ट्रीटवरील स्टूडिओत त्यांनी माळी यांना स्वतंत्र जागा देऊन व्यक्तिचित्रणाच्या व्यवसायासाठी व सरावासाठी सोय उपलब्ध करून दिली. माळी यांचा विवाह १९४७ मध्ये इंदिरा यांच्याशी झाला.

           वसंत माळी यांनी व्यक्तिचित्रणाच्याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला व त्यांना पहिले महत्त्वाचे काम मिळाले ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर ब्यूमाँट यांच्या व्यक्तिचित्रणाचे! त्यासाठी ठेवलेल्या स्पर्धेत त्यांचे चित्र निवडले जाऊन तेच न्यायालयात लावले गेले. सुरुवातीलाच त्यांच्या कामाला अशी पावती मिळाल्यावर माळी यांना एका पाठोपाठ एक अशी व्यक्तिचित्रणाची कामे मिळत गेली व त्यांची ख्याती दूरवर पसरली.

           त्यांनी केलेल्या व्यक्तिचित्रांत जहांगीर बोमन बेहराम, डॉ. व्ही.एन. शिरोडकर, डॉ. मुळगावकर, न्यायमूर्ती छगला, महामहोपाध्याय काणे, कन्हैयालाल मुन्शी यांची कलकत्त्याच्या व्हिक्टोरिया स्मारकासाठी केलेली लोकमान्य टिळक व गोपाळकृष्ण गोखले यांची, मुंबईच्या हरकिशनदास इस्पितळामध्ये असलेले सर पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांचे, तसेच ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयामधील डॉ. मोटवानी यांचे, अशी अनेक व्यक्तिचित्रे उल्लेखनीय आहेत.

           व्यक्तिचित्रणातील त्यांची कीर्ती ऐकून कोल्हापूरचे ज्येष्ठ व प्रसिद्ध चित्रकार बाबूराव पेंटरही एक दिवस त्यांच्याकडे आले व त्यांनी व्यक्तिचित्रण करताना माळी यांचे काम पाहण्याची इच्छा दर्शविली. माळी यांनीही ती लगेच पूर्ण केली.

           स्वत:ची स्वतंत्र शैली वापरून त्यांनी जी चित्रे काढली, त्यामुळे त्यांना अधिक प्रसिद्धी व मानाची पारितोषिकेही लाभली. विरोधी रंगछटा वापरून, शुद्ध रंगांचा अधिक वापर करून, रुंद कुंचल्याचे तिरपे, जोरकस फटकारे वापरून त्यांनी ‘पोतराज’ हे पहिले चित्र रंगवले. त्याची प्रशंसा होऊन ते विकले गेले. अशी प्रेरणा मिळाल्यावर त्यांनी रंगमंचावर जाण्यापूर्वी आपली वेशभूषा आरशात न्याहाळणार्‍या नर्तकाचे ‘रेडी फॉर डान्स’ हे चित्र रंगविले. हे सुंदर चित्र वडोदर्‍याच्या प्रादेशिक कलादालनामध्ये आहे. याखेरीज १९३९ मधील कलकत्ता ‘फाइन आर्ट’च्या प्रदर्शनात सुवर्णपदक मिळविणारे ‘शृंगार’ हे चित्र, ‘वसईची केळी’ हे ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ची सिल्व्हर ट्रॉफी जिंकणारे चित्र, १९४५ साली ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे सुवर्णपदक मिळविणारे ‘ब्यूटीज’ म्हणजे ‘मोरवाली बाई’ हे चित्र, अशी त्यांची अनेक चित्रे गाजली. ‘बसरा वुमन’, ‘माकडवाला’, ‘चिनी स्त्री’ ही त्यांची चित्रेही उल्लेखनीय आहेत. याखेरीज त्यांनी पारंपरिक भारतीय शैलीचा वापर करूनही काही व्यक्तिचित्रे केली.

           चित्रकलेबरोबरच ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेतही माळी निरलसपणे कार्यरत होते. म्हणूनच शिल्पकार करमरकर यांनी व्ही.ए. माळी यांना आपल्यानंतर या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा आग्रह केला. या संस्थेचे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. कोलवालकर मामांच्या निधनानंतर स्वत:च्या व्यक्तिचित्रणाच्या व्यवसायासोबतच त्यांचा छायाचित्रणाचा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी पडल्याने स्वतंत्र चित्रे रंगविण्याच्या कामाला मर्यादा पडल्या आणि व्यावसायिक व्यक्तिचित्रे व छायाचित्रण यांतच ते अडकले.

           महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात महाराष्ट्र सरकारने १९८५ मध्ये त्यांचा सत्कार केला. त्यांचा १९८५ मध्ये दिल्लीच्या ‘आयफॅक्स’ संस्थेतही गौरव करण्यात आला. त्यांना २००५ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचा ‘रूपधर’ हा मानाचा रु. ५०,००० चा ‘जीवनगौरव’ पुरस्कार मानपत्रासह सन्मानपूर्वक दिला गेला. मामा कोलवालकर, पत्नी इंदिराबाई व ज्येष्ठ भगिनी यांना ते आपल्या यशाचे श्रेय देतात. माळी यांना २२ ऑगस्ट २०११ या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होऊन त्यांनी एकशेएकाव्या वर्षात पदार्पण केले. या दिवशी त्यांचा बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, राजा शिवछत्रपती वस्तू संग्रहालय व व्ही.ए. माळी सेंटेनरी समितीतर्फे राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना मानपत्र आणि रुपये १० लाखांचा गौरवनिधी अर्पण करण्यात आला.

- नलिनी भागवत

माळी, वसंत अनंत