Skip to main content
x

मांडे, शेखर चिंतामणी

     डॉ. शेखर चिंतामणी मांडे यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे एम.एस्सी. पर्यंतचे शिक्षणही नागपूर येथे झाले. शांत, प्रसन्न, हसतमुख स्वभावाच्या डॉ. मांडे यांनी अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळूनही संशोधनात विशेष रस असल्यामुळे विज्ञान शाखेला अग्रक्रम दिला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून १९८२ साली बी.एस्सी. तर १९८४ साली एम.एस्सी. भौतिकशास्त्र या विषयात विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली.

     आपले पीएच.डी. संशोधनाचे ध्येय साध्य करण्यास ते बंगळुरू येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या मॉलिक्युलर बायोफिजिक्स विभागात रुजू  झाले. तेथे त्यांनी प्रा. एम. विजयन यांच्याबरोबर ‘पिनट लेक्टिन’ या संयुगाच्या स्फटिकी संरचनेचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी नेदरलॅन्ड राइक्स युनिव्हर्सिटी ग्रेनिन्गन येथे प्रा. व्हीम होल यांच्याबरोबर अनेक ट्रायफॉस्फेट समस्थानिकांच्या गुंतागुंतीच्या संरचनेचे अभ्यासपूर्वक संशोधन केले. या संशोधनाद्वारे त्यांनी असे सिद्ध केले की, या प्रथिनांची स्थिरता आणि त्यांची त्रिमितीय रचना यांमध्ये आश्चर्यकारक सहसंबंध आढळून येतो.

     त्यानंतर अमेरिकेतील सिएटल येथील युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन येथे प्रा. होल यांच्याबरोबर त्यांनी मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या कुष्ठरोगकारक जीवाणूमधील ‘कॅपरोनिन-१०’ या रसायनाच्या स्फटिकी रचनेचे संशोधन केले. १९९१ ते १९९५ अशी चार वर्षे संशोधन केल्यानंतर त्यांनी १९९५ ते २००१ सालापर्यंत इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी, चंदिगड येथे संशोधक म्हणून कार्य केले. चंदिगड येथे त्यांनी व त्यांच्या चमूने जे क्षयरोग जीवाणू प्रथिन निर्माण करतात, त्यांवर संशोधन केले. क्षयरोग जीवाणूंविषयी संशोधन करताना क्ष-किरण स्फटिक शास्त्राच्या साहाय्याने असे सिद्ध केले की, क्षयरोग होऊन गेलेल्या माणसाच्या शरीरात हे जीवाणू सुप्तावस्थेत असतात. शरीराची प्रतिकारशक्ती कमी होताच ते जागृत होतात. दरम्यानच्या काळात ते रोग्यांच्या शरीरातून शक्ती साठवून ठेवतात व संधी मिळताच डोके वर काढतात. त्यासाठी शरीर सुदृढ आणि प्रतिकारक्षम राखणे जरूर आहे.

     क्षयरोगी माणसांच्या शरीरातील प्रथिने आणि सुदृढ माणसाच्या शरीरातील प्रथिने यांचा तुलनात्मक अभ्यास करून प्रभावी औषध तयार करण्याचे संशोधन सुरू आहे. २००१ सालापासून डॉ. मांडे हैदराबाद येथील ‘सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिंटिंग अ‍ॅन्ड डायग्नोस्टिक्स’ येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत.

     डॉ. मांडे यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच त्यांनी विविध संस्थांमध्ये उच्चपदेही भूषविली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

     नुकताच २००० साली भारत सरकारतर्फे संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यासाठी देण्यात येणारा सर्वोच्च ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला. त्याखेरीज ‘बी.एम. बिर्ला युवा शास्त्रज्ञ पुरस्कार’ (१९९९), ‘फेलो ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस’, बंगळुरू (२००३),  ‘फेलो ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’, अलाहाबाद (२००३) आणि ‘सीनियर रिसर्च फेलो’- वेलकम ट्रस्ट इंटरनॅशनल, अशा अनेक सन्मानांनी त्यांना अलंकृत करण्यात आले आहे.

मृणालिनी साठे

मांडे, शेखर चिंतामणी