Skip to main content
x

मेहता, तय्यब

        स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात फाळणीमुळे झालेल्या रक्तरंजित घटनेचा खोलवर ठसा उमटलेले व पुढील आयुष्यात हाच आशय वारंवार व विविध प्रकारे व्यक्त करणारे चित्रकार म्हणून तय्यब मेहता ज्ञात आहेत. त्यांच्या चित्रांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता व विक्रमी किंमत मिळाली. तय्यब मेहता यांचा जन्म गुजरातमधील कापडगंज या गावात झाला. त्यांचे बालपण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटजवळील (आजची फुले मंडई) दाऊदी बोहरा जमातीची वस्ती असलेल्या गजबजलेल्या भागात गेले. कुठलीही ईश्‍वरनिर्मित वस्तू वा मानव यांचे चित्र काढणे, निषिद्ध मानले जाते अशा कर्मठ मुस्लीम बोहरा कुटुंबात त्यांचा दृश्यकलेशी संबंध येणे शक्य नव्हते. पण लहानपणापासून सिनेमाची आवड असल्यामुळे सिनेमाची मोठी पोस्टर्स रंगविणार्‍या चित्रकारांविषयी त्यांना अत्यंत आकर्षण वाटत असे. त्या काळात ते मासिकातील चित्रांच्या नकलाही करत.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर १९४४ मध्ये चित्रपटनिर्मितिकला (सिनेमॅटोग्रफी) या विषयाचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला; पण तेथील शिक्षणपद्धती न रुचल्यामुळे शिक्षण सोडून मेहता ‘फेमस सिने लॅबोरेटरी’, ताडदेव येथे गेले. तेथे तीन वर्षांसाठी त्यांनी चित्रपटांचे साहाय्यक संकलक म्हणून काम केले.

ट्राममधून प्रवास करताना मेहता यांची १९४७ मध्ये सुप्रसिद्ध सिनेकलादिग्दर्शक ए.ए.माजिद यांच्याशी गाठ पडली. तेव्हा मेहता यांनी सिनेमाचे सेट रंगविण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. माजिद यांनी मेहतांना प्रथम सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. जे.जे.मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांची प्रथम भेट झाली ती शंकर पळशीकर यांच्याशी. त्या वेळी तेही नुकतेच तिथे शिक्षक म्हणून रुजू झाले होते. पळशीकर यांनी तय्यब मेहतांना मित्र आणि शिक्षक या दोन्ही नात्यांनी फार उदारपणे व आपुलकीने मार्गदर्शन केले.

कलाशिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला असताना पळशीकर यांनी मेहता यांना ‘कन्सर्निंग स्पिरिच्युअल इन आर्ट’ हे पुस्तक वाचायला दिले. याचबरोबर मेहता पॉल क्लीच्या पुस्तकाचे वाचन करत होते. या सगळ्यांमुळे त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण लागले व चित्रपटांचा कलादिग्दर्शक होण्याचा त्यांचा विचार बदलला.

                 भारताची फाळणी होण्यापूर्वी १९४७ मध्ये अनेक ठिकाणी दंगली उसळल्या, तेव्हा मेहता यांनी एका माणसाला जमावाने ठेचून मारताना प्रत्यक्ष पाहिले. या गोष्टीचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला व तोच पुढे त्यांच्या चित्रआशयाचा गाभा राहिला.

मेहता १९५४ मध्ये कलेचा अभ्यास करण्यासाठी पॅरिस व लंडन येथे चार महिन्यांसाठी गेले होते. त्या वास्तव्यात ब्रिटिश म्यूझियममध्ये इजिप्शियन उत्थित शिल्पातील (बास-रिलीफ) ‘मुसक्या बांधलेला बैल’ (ट्रस्ड बुल) त्यांच्या बघण्यात आला. जणू ‘अत्याचार’ दाखविण्यासाठी पाहिजे असलेली प्रतिमाच त्यांना त्यात सापडली. त्यातूनच १९५६ मध्ये त्यांचे ‘मुसक्या बांधलेला बैल’ (द ट्रस्ड बुल) हे महत्त्वाचे पहिले चित्र घडले.

मेहता यांनी १९५७ मध्ये शिल्पकला शिकण्यासाठी बडोदा (वडोदरा) येथील ‘फॅकल्टी ऑफ फाइन आर्ट’मध्ये प्रवेश घेतला. तिथे चार महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी ‘टेराकोटा’ माध्यमात काही शिल्पे केली. पुढे मुंबईला परतल्यावर त्यांनी काष्ठ व प्लास्टर ऑफ पॅरिस या माध्यमांतही कामे केली. त्याच काळात चित्रकार बाळ छाबडा हे ‘गॅलरी ५९’ चालवत होते. त्या गॅलरीतर्फे मेहता यांचे जहांगीर आर्ट गॅलरीत पहिले एकल प्रदर्शन भरले. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले होते ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक, इब्राहिम अल्काझी यांच्या हस्ते. प्रदर्शनातील चित्रविक्रीच्या मिळालेल्या पैशांतून ते १९६० मध्ये पुन्हा लंडनला गेले. यापूर्वीच त्यांचा विवाह सकीना यांच्याशी झाला होता. लंडनमधील ‘बेअरलेन गॅलरी’, ऑक्स्फर्ड येथे त्यांचे एकल प्रदर्शन आणि ‘गॅलरी वन’ येथे परितोष सेन यांच्याबरोबर चित्रप्रदर्शन झाले.

लंडनमधील पाच वर्षांच्या वास्तव्यात त्यांना पुरातन व समकालीन या दोन्ही प्रकारच्या भरपूर कलाकृती बघायला मिळाल्या. या काळात त्यांच्यावर सर फ्रान्सिस बेकन या चित्रकाराचा प्रभाव पडला. त्यांनी १९६४ च्या नोव्हेंबरमध्ये भारतात परतल्यावर दिल्लीत स्थायिक व्हायचे ठरवले. तिथे पुन्हा क्रिशन खन्ना, रामकुमार, रामचंद्रन, नाट्यक्षेत्रातले इब्राहिम अल्काझी अशा जुन्या मित्रांची भेट घडू लागली. त्याच वर्षी त्यांनी ‘फॉलिंग फिगर’ हे चित्र रंगविले व त्याला ललित कला अकादमीच्या पहिल्याच त्रैवार्षिक (त्रिनाले) प्रदर्शनात ‘सुवर्णपदक’ मिळाले.

त्यांना १९६८ मध्ये एक वर्षाची रॉकफेलर फेलोशिप मिळाली. मात्र थेट अमेरिकेला न जाता ते इटली, अ‍ॅमस्टरडॅम, स्पेन आणि लंडन या मार्गे गेले. त्या वेळी त्यांची पत्नीही त्यांच्याबरोबर होती. लंडनमध्ये ‘कॉमन वेल्थ आर्ट गॅलरी’ येथे त्यांनी आपली कामे प्रदर्शित केली. अमेरिकेत भरपूर भटकून ते वेस्ट कोस्ट, जपान, हाँगकाँग या मार्गे १९६९ च्या जानेवारीत भारतात परतले. न्यूयॉर्कमध्ये त्यांना ‘मिनिमल आर्ट’ या प्रवाहातील बरीच कामे बघायला मिळाली होती. बार्नेट न्यूमनच्या प्रभावातून त्यांनी विशुद्ध रंग व त्याचे सपाट स्तर लावून रंगलेपन करण्याची पद्धत अनुसरली. पण त्यामध्ये प्रतिमा कशी गुंफायची अशी समस्या उभी राहिली.

एकदा चित्र रंगवत असताना ते समाधानकारक न वाटल्यामुळे मेहता यांनी वैतागून त्यावर काळ्या रंगाचे फराटे मारले. चित्र बाद करण्यासाठीच ते होते. पण त्यामुळे ते चित्र कर्णरेषेत (डायगोनली) विभागले गेले. त्यावरूनच त्यांना ‘कर्णरेषा’ (डायगोनल) हा घटक मिळाला, तो १९७६ पर्यंतच्या त्यांच्या चित्रांचे एक व्यवच्छेदक लक्षण बनला.

फिल्म्स डिव्हिजनने १९७० मध्ये त्यांना फिल्म बनविण्यासाठी आमंत्रित केले. त्या वेळी त्यांनी ‘कुडल’ हा सोळा मिनिटांचा छोटेखानी, प्रायोगिक लघुपट बनविला. ‘कुडल’ म्हणजे तामीळ भाषेत भेटण्याची किंवा एकत्रित येण्याची जागा. या चित्रपटाची संहिता व दिग्दर्शनही त्यांनीच केलेले होते. त्यात प्रतिकार व संघर्ष, जीवन व मृत्यू अशा प्रकारचा आशय होता. या चित्रपटाला ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाला.

मेहता १९७४ मध्ये पॅरिसला गेले व तिथे त्यांनी ‘कॅग्नेसर मेर आणि मेन्टॉन’ या द्वैवार्षिक (बिनाले) प्रदर्शनात सहा मोठी रंगचित्रे प्रदर्शित केली व त्यात त्यांना ‘मेरिट सर्टिफिकेट’ही मिळाले.

मेहता १९७८ च्या जुलैमध्ये कायमचेच मुंबईला राहायला आले. त्यांना १९८३ मध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातून बरे वाटल्यावर म्हणजे त्याच वर्षाच्या अखेरीस ‘विश्‍व भारती विद्यापीठ’, शांतिनिकेतन येथून निवासी चित्रकार म्हणून त्यांना दोन वर्षांसाठी आमंत्रण आले. तिकडे गेल्यावर त्यांची डॉ. रामचंद्र गांधी, मणी सुब्रमणियम, शर्वरी राय चौधरी व सोमनाथ होर यांच्याशी मैत्री झाली. ती जागा त्यांच्या प्रकृतीस अनुकूल ठरली. तिथे त्यांनी ‘शांतिनिकेतन तिहेरी चित्र’ (ट्रिप्टिक) व इतर चित्रे व काही रेखाचित्रेही काढली. शिवाय आधीच्या काही शिल्पांचे ब्राँझमध्ये ओतकाम केले, ‘बैलाचे धड’ हे शिल्प केले. परत येण्यापूर्वी त्यांनी आपली कामे ‘नंदन’, शांतिनिकेतन येथे प्रदर्शित केली.

शांतिनिकेतनमधून परतल्यावर त्यांनी ‘काली’ या विषयावर चित्रे काढली. या मालिकेतील ‘महिषासुर’ या चित्राला न्यूयॉर्क येथील ख्रिस्तीजच्या लिलावात, २००६ मध्ये विक्रमी किंमत मिळाली. तसेच ‘ट्रस्ड बुल ऑन रिक्शा’ अशासारखी चित्रे त्यांनी रंगविली. १९९० मध्ये त्यांची केमोल्ड आर्ट गॅलरी, मुंबई, आर्ट हेरिटेज, नवी दिल्ली आणि बिर्ला अकॅडमी, कोलकाता येथे १९८५-९० च्या दरम्यान केलेल्या कामाची एकल प्रदर्शने झाली.

मेहता यांना १९८८ मध्ये ‘भारत भवन’चा ‘कालिदास सन्मान’ मिळाला. पॅरिस येथे १९९४ मध्ये चित्रकार रझा यांनी ‘गॅलरी ल माँद द ल-आर्ट येथे संयोजित (क्युरेट) केलेले प्रदर्शन आणि मुंबईतील ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त बर्नार्ड स्टेनब्रुक यांनी संयोजित केलेले ‘ए ग्लोबल व्ह्यू; इंडियन आर्टिस्ट अ‍ॅट होम इन द वर्ल्ड’ हे प्रदर्शन ही मेहता यांच्या कलाकारकिर्दीचे दर्शन घडविणारी महत्त्वाची प्रदर्शने होती.

‘शांतिनिकेतन ट्रिप्टिक’वर २००२ मध्ये ‘स्वराज’ हे रामचंद्र गांधी यांनी लिहिलेले पुस्तकही महत्त्वाचे आहे. २००४ मध्ये मेहता यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ललित कला अकादमीच्या सुवर्ण-जयंतीनिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदकही मिळाले. अखेरच्या काही वर्षांत त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती, तरीही जमेल त्याप्रमाणे ते काम करीत होते.

- दिलीप रानडे

संदर्भ
१. गांधी, रामचंद्र ‘स्वराज’; २००२. २. अजानिया, नॅन्सी; ‘टोनॅलिटिज: अ कॉन्व्हर्सेशन विथ तय्यब मेहता’.
मेहता, तय्यब