Skip to main content
x

मेन्डोन्सा, रोनाल्ड हॅसिंथ

रॉनी मेन्डोन्सा

         रोनाल्ड हॅसिंथ मेन्डोन्सा उपाख्य रॉनी मेन्डोन्सा यांचा जन्म कर्नाटकात झाला. एका ख्रिश्चन घराण्यात त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांना त्यांच्या मातृभाषेबरोबरच मराठीही उत्तम बोलता येते. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कालियनपूर येथे त्यांचे शालेय शिक्षण पार पडले.

         मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयातून त्यांनी प्राणीशास्त्रात बी.एस्सी.ची पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली. शांताराम दाभोळकर हे पारितोषिकही त्यांनी मिळवले. १९६६ मध्ये त्यांनी एम.एस्सी.ची पदवी मिळवली. त्याच वर्षी भारतीय पोलीस सेवेतही त्यांची निवड झाली. त्यांना ठाणे येथे त्यानंतर वर्षभराचे प्रशिक्षण मिळाले. पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांना त्यांची पहिली नियुक्ती अहमदनगर येथे मिळाली.

        अहमदनगर जिल्ह्याचे सहअधीक्षक म्हणून पोलीस सेवेत दाखल झाल्यावर त्यानंतर त्यांनी नागपूर जिल्ह्याचे ग्रामीण अधीक्षक, तर यवतमाळ, मुंबई, सातारा, नाशिक, ठाणे ग्रामीण आणि मुंबई जिल्ह्याचे अधीक्षक म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर मुंबई व नागपूरचे अतिरिक्त आयुक्त, ‘रॉ’ विभागाचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काम केले. काही काळ ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

       प्रत्येक नियुक्तीच्या वेळी पोलीस खात्यात काही नवीन करता येईल का, पोलिसांच्या दैनंदिन कामात काय बदल करता येऊ शकतील, याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केला.

       पुण्याच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून आणि मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम करताना गुन्हे शाखेचे प्रश्न, सायबर क्राइम यांसारखे प्रश्न सोडविण्यावर त्यांनी भर दिला. मोक्का (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइझ्ड क्राइम अ‍ॅक्ट) राबवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

        त्यांच्या विशेष व महत्त्वपूर्ण सेवेसाठी त्यांना भारतीय पोलीस पदक व राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे. १९९८ मध्ये नेदरलँड येथे झालेल्या इंटरनॅशनल पोलीस वीक परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.

         महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे महासंचालक या पदावरून ते ३० सप्टेंबर २००१ रोजी निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही त्यांनी स्वत:ला सामाजिक संस्थांशी जोडून घेतले आहे. मोहल्ला कमिटी मूव्हमेंट ट्रस्टचे ते विश्वस्त आहेत. तसेच सरकारी कामकाजात पारदर्शकता, प्रामाणिकपणा यावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्टचेही ते विश्वस्त आहेत.

- वर्षा फडके-आंधळे

मेन्डोन्सा, रोनाल्ड हॅसिंथ