Skip to main content
x

मेनन, बालकृष्ण

स्वामी चिन्मयानंद सरस्वती

    स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म केरळ राज्यातील एर्नाकुलम या गावात झाला. त्यांचे नाव बालकृष्ण मेनन. त्यांना बालन म्हणत. एकदा ज्योतिषाने त्यांच्या जीवनात राजयोग आहे असे सांगितले, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना वाटले, की हा निश्चितच भौतिक धनसंपदेने समृद्ध असा खूप मोठा माणूस होईल. त्यामुळे घरात बालनचे खूप लाड होऊ लागले. मात्र, घरातील कर्मकांडे व पूजा-अर्चा यांमध्ये बालन कधीच रमत नसे.

दुर्दैवाने, बालन चार वर्षांचा असताना त्याची आई देवाघरी गेली. त्यामुळे त्याच्या चार मावश्यांनी त्याचा अन्य भावंडांसह सांभाळ केला. लहानपणी, लाडाकोडात वाढलेला बालन खूप धडपड्या होता. एर्नाकुलमच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्याला लखनौच्या महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी धाडले. तेथे बालनच्या स्वतंत्र विचारांना मोकळे आकाश मिळू लागले. अहंकार जोपासलेल्या बालकृष्णमधील बुद्धिमान, बिनधास्त तरुण अधिकच उद्दाम बनला. ‘माणसांमुळेच देव मोठा झाला, मग त्याची पूजा का करायची?’ असा प्रश्न तो विचारत असे.

बालकृष्णचे इंग्रजी उत्तम होते. पण कायद्याच्या अभ्यासातही त्याला रस वाटेनासा झाला. वर्गात गैरहजर राहूनही, पापभीरू शिक्षकांना गोंधळात टाकून तो परीक्षेस बसू लागला. स्वातंत्र्यसंग्राम अगदी शिगेला पोहोचला होता. १९४२ ची चळवळ ऐन भरात होती. बालकृष्ण मेननही या रणधुमाळीत सामील झाले. अटकेचे फर्मान निघताच ते भूमिगत झाले. एबोटाबाद, (सध्या पाकिस्तानात असलेले) येथे भूमिगत राहिल्यानंतर, तेथेच इंग्रजांच्या छावणीत वेगळ्या ओळखीने त्यांनी नोकरीही केली.

काही काळ नोकरी केल्यानंतर बालकृष्ण पंजाबात आले आणि पुन्हा स्वातंत्र्यलढ्यात उतरले. या वेळी त्यांना अटक होऊन त्यांची तुरुंगात रवानगी झाली. परंतु तुरुंगात ते तेथील अस्वच्छ वातावरणामुळे आजारी पडले, तेव्हा त्यांना आजारी अवस्थेत रस्त्यावर फेकण्यात आले. एका ख्रिस्ती स्त्रीने त्यांना घरी नेऊन त्यांच्यावर औषधोपचार केले. बरे झाल्यानंतर मात्र बालकृष्ण बडोद्याला, आपल्या भावाकडे आले.

बडोद्याच्या वास्तव्यात बालकृष्णांच्या आयुष्याला वळण मिळाले आणि जगण्याचे प्रयोजनही सापडले. पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांनी  सामान्यातील सामान्यांचे प्रश्न , परिस्थिती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने ‘मोर्चा’ नावाचे पत्रक सुरू केले. तत्कालीन ‘माय मॅगझीन’ या नियतकालिकातून त्यांना स्वामी शिवानंद यांची माहिती मिळाली. बालकृष्णांनी स्वामी शिवानंदांची भेट घेतली.

बालकृष्णांच्या ईप्सित ध्येयासाठी या भेटीतून दृष्टी आणि दिशा मिळाली. त्यांनी ‘फ्रीप्रेस’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. पुढे त्यांनी ‘नॅशनल हेराल्ड’च्या सहसंपादक पदाचीही जबाबदारी पेलली. याच काळात बालकृष्ण यांनी, माणसाच्या जीवनव्यवहारात त्याला जगण्यासाठी करावी लागणारी कृत्रिम धडपड पाहून तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला. त्यांनी जगभरातल्या बहुतांश तत्त्वज्ञानांचा, संस्कृतींचा धांडोळा घेतला आणि त्यांना जाणवले की, परमेश्वर प्राप्तीवाचून आयुष्य कुचकामी असते.

१९४७ साली वैशाखात, बालकृष्ण हृषिकेश येथे स्वामी शिवानंदांच्या आश्रमात गेले. दोन वर्षांनंतरच्या कठोर कसोट्यांनंतर स्वामींनी बालकृष्णांना दीक्षा दिली, आणि त्यांचे ‘चिन्मयानंद सरस्वती’ असे नामकरण केले. याच काळात स्वामी शिवानंदांच्या आज्ञेवरून चिन्मयानंदांनी तेथीलच स्वामी तपोवन महाराजांकडेही अभ्यास करून गहन तत्त्वज्ञान आत्मसात केले. चिन्मयानंद १९५० साली पुणे मुक्कामी दाखल झाले व २३ डिसेंबर १९५१ रोजी त्यांनी ‘चला हिंदू होऊ या’ या विषयावर पहिल्यांदाच प्रवचन दिले. पुढे ‘ज्ञानयज्ञ’ या नावाने प्रवचनांची ही मालिका सुरू झाली. त्यांना प्रवचनांसाठी ठिकठिकाणची निमंत्रणे येऊ लागली. त्यातूनच त्यांचा एक अनुयायी वर्ग तयार झाला. त्यांच्या मद्रास येथील अनुयायांकडून ‘चिन्मय मिशन’ या संस्थेचा प्रस्ताव आला.

चिन्मयानंदांनी त्यांच्या उद्देशांना, हेतूंना नीट पारखून संकल्पित ‘चिन्मय मिशन’ची स्थापना करण्यास परवानगी दिली. ‘चिन्मय युवा केंद्रा’ची स्थापना करून त्यांनी केंद्रामार्फत तरुणांसाठी व्याख्यानमाला, शिबिरे, सहली आयोजित केल्या. त्यांनी युवाशक्तीला प्रोत्साहन देऊन, तिचा उचित उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने ‘सांदीपनी साधनालय’ सुरू केले. तेथे त्यांनी अडीच वर्षांच्या वेदान्ताच्या अभ्यासक्रमाची बांधणी केली.

‘आजचा तरुण निरुपयोगी नाही. त्याचा योग्य उपयोग केला जात नाही. तो निष्काळजीपणे वागत नाही. खरे तर, त्याची काळजी आपणच घेत नाही’, ही त्यांची आजच्या तरुणांप्रती समाजाच्या असलेल्या दृष्टीकोनाबद्दलची समीक्षा होती.

चिन्मय मिशनच्या कार्याचा प्रसार आता भारतभर झाला आहे. ‘सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्ट, चिन्मय तपोवन ट्रस्ट, सिद्ध बारी, हिमाचल प्रदेश, तारा कल्चरल ट्रस्ट, सेंट्रल तपोवन ट्रस्ट अशा संस्थांमधून वेदान्त प्रसाराचे कार्य होत असते. या संस्थांना भारतभरासह परदेशाहूनही अभ्यासक येत असतात.

आध्यात्मिक सेवा, प्रसाराबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातही चिन्मय मिशन अग्रेसर आहे. बेंगळुरू येथील चिन्मय हॉस्पिटल गरजूंसाठी वरदान ठरले आहे. आंध्र प्रदेशातील ‘चिन्मयारण्यम’ हा आश्रम, तसेच कोईंबतूर येथील सिरुवाणी येथेही वेदान्त प्रसाराचे कार्य चालते.

वृद्ध व्यक्तींसाठी कानपूर, चेन्नई, रेवा इत्यादी ठिकाणी ‘पितामह सदने’ बांधण्यात आली आहेत. स्वामी चिन्मयानंद सरस्वतींच्या इंग्रजी व्याख्यानांचा, प्रवचनांचा अनुवाद सात-आठ भाषांमधून झाला आहे आणि ती ग्रंथ आणि सीडीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. चिन्मय मिशनतर्फे ‘बालविहार’ हे मासिक प्रसिद्ध होत असते. आपल्या देशात स्वामी विवेकानंदांसारखे सत्शील युवक तयार करणे हेच चिन्मय मिशनचे ध्येय आहे. त्यासाठी ‘चिन्मय युवा केंद्र’ही स्थापन करण्यात आले आहे. स्वामी चिन्मयानंद यांनी वेदान्त अभ्यासक्रमाचा हा अनमोल ठेवा पुढील पिढ्यांकडे सोपवून जगाचा निरोप घेतला.

संदीप राऊत

मेनन, बालकृष्ण